आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियंत्रण:कळंबमध्ये 36 गावांतील ‘किसान सन्मान’च्या लाभार्थींची तपासणी पूर्ण ; बोगस लाभार्थींनी फायदा उचलला

कळंब24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत अनेक बोगस लाभार्थींनी फायदा उचलला आहे. याला आळा घालण्यासाठी पात्र लाभार्थींच्या विविध बाबींची तपासणी तलाठी करत आहेत. त्यानुसार आतापर्यंत कळंब तालुक्यातील ३६ गावांमधील किसान सन्मान योजनेतील लाभार्थींची तपासणी पूर्ण करण्यात आली असून उर्वरित काम सुरू आहे.

या योजनेंतर्गत पात्र लाभार्थीं शेतकऱ्याला वर्षाकाठी सहा हजार रुपये देण्यात येतात. ठरावीक टप्प्यांमध्ये ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होते. या योजनेसाठी शासनाने ऑनलाइन पद्धतीने नोंदणी केली होती. या योजनेचा लाभ कोणते घटक घेऊ शकतात, ही नियमावली तयार करण्यात आली होती. अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर सन्मान योजनेचे हप्ते टप्प्यात-टप्प्यात जमा झाले होते. त्यामुळे या योजनेचा चांगलाच फायदा शेतकऱ्यांना झाला आहे. परंतु या योजनेचा अनेक अपात्र (आयकरदाते) लाभार्थींनी फायदा घेतला होता. या गोष्टीचा विचार करत शासनाने या योजनेत काही बदल केले आहेत. त्या अनुषंगाने कळंब तालुक्यातील सर्व सज्जांचे तलाठी मागील काही दिवसांपासून किसान सन्मान योजनेतील लाभार्थींच्या विविध बाबींची तपासणी करत आहेत. त्यामुळे बोगस लाभार्थी हटून योग्य लाभार्थ्यांना लाभ मिळण्यास मदत होईल.

या बाबींची पडताळणी
आठ-अ नुसार नाव व क्षेत्र आहे का, १ फेब्रुवारी २०१९ पूर्वीचा खातेदार आहे का, लाभार्थी शेतकरी हा आयकरपात्र किंवा अपात्र आहे का, नोकरदार, मृत, तसेच पती-पत्नी दोघेही लाभार्थी आहेत का, या बाबींची पडताळणी करण्यात येत आहे.

१८ कॉलममध्ये माहिती
किसान सन्मान योजनेत एकुण १८ कॉलममध्ये माहिती भरावी लागते. त्यातील १३ कॉलमची माहिती जुन्या किसान सन्मान योजनेवरुन घ्यायची आहे. पाच कॉलम जमिनीच्या रेकॉर्ड वरुन भरण्याचे काम सुरू आहे. ही माहिती पूर्ण झाल्यावर किती लाभार्थी अपात्र होतात, हे समजणार आहे.

नवीन बदलानुसार काम
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेत बोगसगीरीला आळा घालण्यासाठी शासनाने महत्वाचे पाऊल उचलले आहे. यात आणखी नवीन माहिती अपलोड करण्याची सूचना आहे. त्यानुसार काम सुरू आहे. कळंब तालुक्यातील ३६ गावातील किसान सन्मान योजनेतील लाभार्थींची तपासणी पूर्ण झाली आहे.
- मुस्तफा खोंदे, तहसीलदार, कळंब.

ज्यांच्या नावे शेत त्यांनाच लाभ
मागील काही दिवसांपासून यामध्ये अनियमितता आढळून येत आहे. त्यामुळे आता ज्या शेतकऱ्यांच्या नावावर शेत असेल त्यांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ मिळणार आहे. म्हणजे पूर्वीप्रमाणेच वडिलोपार्जित जमिनीत ज्यांचा वाटा आहे, त्यांना आता या योजनेचा लाभ मिळणार नाही. तुमच्या नावावर शेती करून घ्यावी लागणार आहे.

बातम्या आणखी आहेत...