आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमा:तेरणाच्या जमिनीवर बोगस कागदपत्रांद्वारे उचलला विमा

ढोकीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद तालुक्यातील ढोकी येथील तेरणा कारखान्याच्या जमिनीवर बोगस कागदपत्रांच्या आधारे विमा उचलण्याचा गंभीर प्रकार घडला आहे. या प्रकरणी तक्रारीवरून दोघांविरोधात ढोकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार तेरणा साखर कारखान्याची उभारणी होत असताना ढोकी येथील अनेकांच्या जमिनी संपादन करण्यात आल्या होत्या. त्यापैकी वक्फ बोर्डाच्या गट नं. ७९५ मधील २९ हेक्टर ४७ आर व गट नं.७९६ मधील ३२ हेक्टर ९१ आर जमिनीचे संपादन तेरणा कारखान्याच्या नावे करण्यात आले. फिर्यादी इरफान अब्बास अली काझी यांनी ढोकी पोलिस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, या गट नंबरमध्ये वाजिद खुद्दस काझी व शोएब शफियुद्दीन काझी यांची कोणतीही जमीन नाही.

तसेच या गट नंबरमध्ये कोणत्याही प्रकारचे पीक घेतले जात नाही. तरीही या दोघांनी संगनमत करुन बोगस कागदपत्र तयार करून सोयाबीन व तूर या पिकांचा पीकविमा भरला व त्या पीक विम्यापोटी आलेले १८ हजार ५०० रूपये उचलून शासनाची फसवणूक केली. तसेच या प्रकारची कुणकुण लागताच बुरानोद्दीन जहिरोद्दीन काझी (रा. ढोकी) यांनी दि.०९/०८/२०१६ मध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे माहिती घेतली असता, बँकेचे मॅनेजर यांनी वरील दोघांनी विम्याची रक्कम उचलल्याची माहिती दिली. या प्रकारामुळे काझी यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत केला आहे.

या सर्व गंभीर प्रकाराची चौकशी करून आरोपी विरोधात कडक कारवाई करण्याची मागणी इरफान काझी यांनी केली आहे. काझी यांच्या फिर्यादीवरून ढोकी पोलिस ठाण्यात वाजिद काजी व शोएब काझी यांच्या विरोधात ढोकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक कपील बुद्धेवार करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...