आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:खंडोबाची यात्रा, शुक्रवारी नळदुर्गमध्ये आगमन; अणदूरमध्ये गुरुवारी यात्रोत्सव

उस्मानाबाद16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अणदूर येथील कुलदैवत श्री खंडोबाची यात्रा गुरुवारी भरत आहे. यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, यात्रेची जय्यत सुरु असल्याची माहिती श्री खंडोबा मंदिर समितीच्या वतीने देण्यात आली आहे.अणदूरच्या यात्रेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ९.३० वाजता श्री खंडोबाची महापूजा होईल. दिवसभर भंडारा-खोबरे उधळणे, महानैवेद्य दाखवणे आदी कार्यक्रम पार पडतील. रात्री दहा वाजता श्रींची छबीना मिरवणूक काढण्यात येईल. रात्री १२ वाजता नळदुर्गच्या मानकऱ्यांचे आगमन, त्यानंतर मानपानाचा कार्यक्रम होईल.

त्यानंतर अणदूर-मैलारपूरच्या (नळदुर्ग) मानकऱ्यांत खंडोबाची मूळ मूर्ती नेणे व आणण्याचा लेखी करार होईल. मध्यरात्री २.३० वाजता खंडोबाच्या मूर्तीच्या पालखीचे मैलारपूरकडे प्रस्थान होईल. शुक्रवारी पहाटे ५ वाजता मैलारपूर (नळदुर्ग) मंदिरात खंडोबा आगमनानंतर विधीवत प्रतिष्ठापना केली जाईल. अणदूरच्या यात्रेनिमित्त श्री. खंडोबाच्या मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे, तसेच भाविकांसाठी विविध सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. श्री खंडोबा मंदिर समिती व श्री खंडोबा यात्रा कमिटी यात्रा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेत असल्याची माहिती श्री खंडोबा मंदिर समितीचे सचिव सुनील ढेपे यांनी दिली.

श्री खंडोबा आणि बाणाई विवाहस्थळ
श्री खंडोबा हा महादेवाचा अवतार असून खंडोबाची महाराष्ट्रात आठ प्रमुख ठिकाणे आहेत. पैकी अणदूर-मैलारपूर (नळदुर्ग) महत्वाचे स्थान म्हणून ओळखले जाते. दमयंती राणीच्या भक्तीसाठी श्री खंडोबा नळदुर्ग येथे प्रकट झाले, अशी आख्यायिका सांगितली जाते.

श्री खंडोबा आणि बाणाई यांचा विवाह नळदुर्ग येथे झाला होता म्हणून या स्थानाला अन्यन्यसाधारण महत्त्व आहे. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अणदूर व मैलारपूर (नळदुर्ग) या दोन्ही ठिकाणी खंडोबाची मंदिरे असून दोन्ही ठिकाणचे अंतर चार किलोमीटर आहे. खंडोबाचे अणदूर येथे सव्वा दहा महिने व मैलारपूर (नळदुर्ग) येथे पावणेदोन महिने वास्तव्य असते. अणदूरच्या यात्रेनंतर खंडोबाचे मैलारपूरकडे (नळदुर्ग) प्रस्थान होणार आहे.

बातम्या आणखी आहेत...