आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रतिकुलतेवर मात करत विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या राज्यातील विविध शाळांची माहिती असलेली प्रेरणादायी संग्रह पुस्तिका महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेने प्रकाशित केली आहे. यात तुळजापूर तालुक्यातील काटगाव येथील जिल्हा परिषद शाळेला स्थान मिळाले आहे. येथील शिक्षकांनी शैक्षणिक उपक्रमांतून राज्यस्तरावर शाळेचा ठसा उमटवला आहे.
समग्र शिक्षा अभियानातून ‘गुणी शिक्षक, गुणवंत शाळा’ नावाची पुस्तिका शिक्षण परिषदेने नुकतीच प्रकाशित केली. राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शालेय शिक्षण मंत्र्यांसह राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे यांनी या उपक्रमाचे केले. राज्यातील निवडक ३५ सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषद शाळांना या पुस्तिकेत स्थान दिले. काटगाव शाळेने राबवलेल्या शैक्षणिक उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाल्याचे आढळल्याने शाळेची निवड झाली.
शाळेचे मुख्याध्यापक भीमाशंकर सकपाळे यांनी शाळेची माहिती पुस्तिकेत दिली. उपक्रमशील शिक्षिका रंजना स्वामी, राजेंद्र लोहार, शुभांगी बडूरे, कृष्णाथ भास्करे, राजाभाऊ क्षीरसागर, एकनाथ नैताम, अंजली कासार, शीतल होमकर, सारिका कदम यांच्या परिश्रमामुळे शाळा क्रमांक एकवर आहे. शालेय समितीचे सहकार्य शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बालाजी बेटकर, उपाध्यक्ष सूर्यकांत कांबळे व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यामुळे शिक्षकांना नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी बळ मिळते.
मंगरूळ बीटचे विस्ताराधिकारी मल्हारी माने, केंद्रप्रमुख संजय वाले यांनीही शिक्षकांना प्रोत्साहित केले.
शाळेतील शिक्षकांची मेहनत पाहून नागरिकांकडून शाळेला मदत मिळते. शिक्षकांनी ग्रंथालयासाठी आर्थिक मदतीची मागणी केल्यावर तब्बल एक लाख रुपये वर्गणी संकलित झाली. ज्ञानवर्धक पुस्तके आणून विद्यार्थ्यांना वाचण्यासाठी उपलब्ध करण्यात आली. तसेच विद्यार्थी भाषण, निबंध स्पर्धा आणि महापुरुषांच्या माहितीचे लेखन करण्यासाठीही या पुस्तकांचा वापर करतात.
किरकोळ साहित्याचा उपयोग
खडे, माती, मणी, चिंचोके, बिया, काड्या, अंक कार्ड, शब्द पट्ट्या आदी साहित्याचा उपयोग करून विद्यार्थ्यांना गणित, वाचन, एकाग्रता निर्माण करण्यास शिकवले जाते. धुळपाटी, शब्द कार्ड, चार्टही प्रत्येक घरात लावले आहेत. एक तास मोबाइलचा कोरोनात विद्यार्थी मोबाइलशी जोडले गेले. आता दर शनिवारी एक तास मुलांना मोबाइलचा वापर करण्याची मुभा दिली जाते.
यातून दीक्षा ॲप, रीड टू मीटॲप, शिकू आनंदे असे उपक्रम वापरून विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पाडली जाते. वुई मीट बाय गुगल मीट कोरोना काळात हा उपक्रम शिक्षकांनी राबवला. यामध्ये गुगल मीटच्या माध्यमातून दररोज प्रत्येक विद्यार्थ्यांशी संपर्क ठेवण्यात आला. यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात व त्यांच्या घरात शैक्षणिक वातावरण ठेवण्यात यश आले.
आनंददायी शनिवार
प्रत्येक शनिवारी परिपाठाच्या वेळी कार्यानुभव, कला संबंधित घटक घेण्यात येतात. गोष्ट स्वतःच्या भाषेत कथन करण्याची संधी विद्यार्थ्यांना देण्यात येते. बडबड, कृतीयुक्त गीतांते गायन केल्यानेही व्यक्तिमत्व विकासास मदत झाली. सांस्कृतिक कला महोत्सव सांस्कृतिक कार्यक्रमांचे उत्कृष्ट नियोजन केले जाते. नृत्य, नाटिका, चित्रपट गीते, प्रबोधनात्मक भारुड, कव्वाली आदी बसवले जातात. विद्यार्थ्यांमधील कलागुणांच्या सादरीकरणाची संधी दिली जाते.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.