आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अडचणींचा पाढा:पुण्यात केवडा विक्रीला आडकाठी; उत्पादकांना यंदा 75 टक्के फटका

चंद्रसेन देशमुख | उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गणपती बाप्पांची मखर सजवण्यासाठी केवड्याला विशेष मान आहे. महानगरात तर केवड्याला सोन्याचा दर मिळतो. कोरोनाकाळात निर्बंध असूनही केवड्याच्या फुलाला तब्बल हजार रुपयांपर्यंत दर मिळाला. यंदा मात्र केवडा कवडीमोल दराने विकला गेला. पुणे प्रशासनाने मखरीसाठी लागणाऱ्या साहित्य विक्रेत्यांना रस्त्यालगत साहित्य विक्रीसाठी बंधने घातली. परिणामी महाराष्ट्रासह अन्य राज्यांतून आलेला कोट्यवधींचा केवडा फेकून द्यावा लागला. गेल्या वर्षी तब्बल उस्मानाबादच्या शेतकऱ्याने साडेतीन लाख कमावले. यंदा मात्र माेठे नुकसान झाले. ९० हजारांची म्हणजे अवघी २५ टक्के विक्री झाल्याचे उत्पादक सांगतात.

उस्मानाबादेत दोन ते अडीच एकरावर केवड्याचे बन आहे. महाराष्ट्रातील हे सर्वात मोठे बन असल्याचा दावा शेतकरी सचिन माळी करतात. सचिन यांच्या आजोबांनी पापनास भागात लागवड केलेल्या या बनातून त्यांना दरवर्षी श्रावण महिन्यात तसेच गणेशाेत्सव काळात लाखोंचे केवड्याचे उत्पादन मिळते. वर्षातून एकदाच मिळणाऱ्या या उत्पन्नावर त्यांचे कुटुंंब अवलंबून आहे. महाराष्ट्रात पंढरपूरसह नगर जिल्ह्यात काही ठिकाणी व कोकणात केवड्याचे उत्पादन घेतले जाते. गणेशोत्सवात केवड्याचा मान असतो. विशेषत: पुणे, मंुबईसारख्या महानगरात केवड्याला चांगला दर मिळतो. त्यामुळे दरवर्षी गणेशोत्सवापूर्वीच महानगरातील व्यापारी सचिन माळी यांच्याकडून केवड्याची मागणी करून ठेवतात. या वर्षी मात्र केवड्याचे नुकसान झाले. दरवर्षी लाखो रुपये उत्पन्न देणाऱ्या बनातून यंदा अवघे ९० हजार रुपये मिळाल्याचे सचिन माळी यांनी सांगितले. पुण्यातील व्यापाऱ्यांनी केवड्याची मागणीच केली नाही. कारण पुणे प्रशासनाने गणेशोत्सवात रस्त्यावरील साहित्य विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर निर्बंध आणले आहेत.

शेतकऱ्यांचे नुकसान कसे भरून निघणार? उत्पादकांचा प्रश्न या वर्षी राज्य शासनाने गणेशोत्सवावरील निर्बंध उठवल्यामुळे राज्यात हा उत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा होत आहे. सार्वजनिक गणेश मंडळांची संख्याही वाढली आहे. मात्र, तरीही काही शहरांमध्ये स्थानिक प्रशासनाने घातलेल्या निर्बंधामुळे उत्सवावर मर्यादा येत आहेत. शेतकरी, व्यापाऱ्यांचे हित विचारात घेतले गेले पाहिजे, अशी भावना व्यक्त होत आहे.

कोरोनात मिळाले लाखाे रुपये सचिन माळी म्हणाले, यंदा स्थानिक प्रशासनाच्या निर्बंधामुळे आमच्यासह कर्नाटकातील अनेक वाहने परत गेली. त्यामुळे कोट्यवधींचे नुकसान झाले. गेल्या वर्षी उत्सवाला मर्यादा असतानाही केवड्याच्या एका फुलाला सुमारे १ हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला. व्यापाऱ्यांनी आपल्याकडून ३०० रुपयांपर्यंत फुले खरेदी केली होती. त्यामुळे साडेतीन लाखांचे उत्पादन मिळाले होते. यंदा निर्बंधमुक्त गणेशोत्सवामुळे अधिक नफा होईल, अशी आशा होती. मात्र, केवळ ९० हजार रुपये मिळाले आहेत. सरकारने केवडा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी आमची मागणी आहे. यंदा मात्र अक्षरश: मित्राच्या आटोमध्ये केवड्याची विक्री करूनही हाती काहीच लागले नसल्याचे सचिन यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.

बातम्या आणखी आहेत...