आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुहेरी संकट:पावसासह पाने, शेंगा पोखरणाऱ्या अळ्यांमुळे खरीप हंगाम धोक्यात ;सोयाबीनचा सर्वाधिक पेरा

उमरगा23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात सोयाबीन फळधारणेच्या अवस्थेत असताना पावसाने पुन्हा सुरुवात केली. दुसरीकडे सोयाबीनसह अन्य पिकांवर अळ्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. पावसाने सुरुवातीला ओढ दिल्याने जूनमध्ये होणाऱ्या पेरण्या जुलैमध्ये झाल्या. पेरणी होताच तब्बल महिनाभर सतत पाऊस झाला. या नैसर्गिक संकटातून खरिपातील सोयाबीन, उडीद, मूग पिके सावरत असतानाच पुन्हा भाग बदलून पाऊस होत आहे. सोबतच पिके फळधारणेच्या अवस्थेत असतानाच पिकांवर अळ्यांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे थेट उत्पादनावर परिणाम होणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत. शिवाय गरजेच्या वेळी पावसाने पाठ फिरवल्याने उत्पन्न वाढवण्याचे प्रयत्न यशस्वी होणार, की नाही याबाबत शंका उपस्थित होत आहे. सोयाबीन हे खरिपातील मुख्य पीक आहे. सोयाबीन पिकातून चार पैसे पदरी पडतात म्हणून सोयाबीनचे क्षेत्र वाढत आहे. मध्यंतरी पावसाचा धोका होता. आता पावसाने उघडीप दिली तर सोयाबीन, उडीद, मूग, तूर या पिकांवर अळीचा प्रादुर्भाव वाढला आहे. खरीप हंगामात सर्वाधिक पेरा सोयाबीनचा झाला असून याच पिकाला अधिकचा धोका निर्माण झाला आहे. शेतकरी पीक वाचवण्यासाठी धडपडताना दिसत आहे. परंतु निसर्गासमोर तो हतबल ठरत आहे.

रोगांवर नियंत्रणासाठी पिकात पक्षीथांबे, कामगंध सापळे लावा रोगांवर नियंत्रणासाठी पिकात हेक्टरी २० ते २५ पक्षीथांबे उभारावे, यामुळे प्रादुर्भाव वाढणार नाही, पाने खाणाऱ्या अळीसाठी हेक्टरी १० ते १२ कामगंध सापळे लावावे. सापळ्यात जमा झालेले पतंग रॉकेल मिश्रित पाण्यात टाकून नष्ट करावेत. पाने खाणाऱ्या अळ्या, खोडमाशी, चक्रीभुंगा या किडींनी अंडी घालू नये यासाठी सुरुवातीला पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. अळ्यांचा प्रादुर्भाव वाढणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन मंडळ कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे.

सोयाबीनवर तांबेरासह बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव तालुक्यातील इटकूर, कोठाळवाडी, मस्सा (खं) यासह काही गावात तांबेरा रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. सोयाबीनवर सुरुवातीला गोगलगायींचा हल्ला, त्यानंतर येलो मोझॅकची लागण व आता तांबेरा व बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे उत्पन्नात घट होणार असून एकाच हंगामात सलग तीन संकटे सोयाबीनवर आल्याने शेतकरी धास्तावला आहे.

कळंब तालुक्यात साधारण ८० हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी होते. त्यापैकी ४८ हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली. परंतु गोगलगाईंनंतर येलो मोझॅकने सोयाबीनवर हल्ला चढवला. शेतकऱ्यांनी नियंत्रणासाठी महागड्या औषधांची फवारणी केली. दरम्यान, पावसाने पाठ फिरवल्याने सोयाबीनने माना टाकल्या व फुलगळती झाली. त्यातून बाहेर येत असताना आता तांबेरा या बुरशीजन्य रोगाने तोंड वर काढले.

बातम्या आणखी आहेत...