आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळेचा पहिला दिवस:उस्मानाबादसह उमरगा तालुक्यातील कोरेगाव; कडदोरा येथे नवागत विद्यार्थी विद्यार्थिनींचे उत्साहात स्वागत

उस्मानाबाद18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली असून बुधवार (दि.१५) पासून शाळेची घंटा वाजली आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले असून शाळेच्या परिसरात किलबिलाट सुरू झाला आहे. कोविडमुळे जवळपास सर्वच बालकांनी दोन वर्षानंतर शाळेत पाऊल ठेवले. यामुळे अनेकांच्या डोळ्यात पाणी आले होते तर काही बालक शाळेत बसत नसल्यामुळे आई, वडिल, आजी शाळेत ठाण मांडून बसले होते. उस्मानाबाद शहरातील यशराज पब्लिक स्कूलसह अन्य शाळेत नवागत विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देवून स्वागत करण्यात आले.

कोरोनामुळे काही काळ वगळला तर सलग दोन वर्षापासून शाळा बंद होत्या. यामुळे बहुतांश विद्यार्थी दोन वर्षापासून शाळेची पायरी चढले नाही. काही चिमुकले थेट पहिलीच्या वर्गात बसले आहेत. शाळेत येण्याची सर्वांनाच गोडी असते, मात्र, शाळेत आल्यावर बंधनाचे वातावरण दिसताच अनेकांच्या डोळ्याला पाणी येते.

काही शाळेत नको म्हणून घरी परतण्याचा हट्ट करतात. मात्र, पालक मुलाला शाळेची गोडी लागावी म्हणून त्यांच्यासोबतच शाळा सुटेपर्यंत थांबतात. बुधवारी उस्मानाबाद शहरातील यशराज पब्लिक स्कूलमध्येही असाच प्रसंग अनुभवायला मिळाला. परिणामी मुलांसोबत आजीला शाळेत थांबावे लागले. दरम्यान शाळेतील शिक्षकांनी मुलांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. तसेच विद्यार्थ्यांना खावू वाटप करून वर्गात बसवले. अनेक विद्यार्थ्यांनी शाळेच्या पहिल्या दिवसाचा आनंद घेतला. उस्मानाबाद शहरातील सर्वच शाळेत विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्पाने स्वागत केले.

उस्मानाबाद शहरातील प्रियदर्शनी मराठी प्राथमिक शाळेत पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले. तसेच शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. ए. एस. राजगुरु तर प्रमुख पाहुणे संजय मुंडे, अभय इंगळे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक बी. एफ. इनामदार तर डी. पी. मोहिते यांनी आभार मानले.

कोरेगाव जि. प. शाळा
उमरगा तालुक्यातील कोरेगाव जिल्हा परिषद शाळेत पहिलीच्या विद्यार्थ्यांची ट्रॅक्टरमधून भव्य मिरवणूक काढून बुधवारी (१५) पहिला दिवस जल्लोषात प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला.

भव्य मिरवणुकीचे हणमंत डावरगे यांच्या हस्ते श्रीफळ फोडून उदघाटन झाले. गटशिक्षणाधिकारी शिवकुमार बिराजदार यांनी शाळेच्या या नावीन्यपूर्ण उपक्रमाबद्दल शाळेचे व नेहमी सहकार्याबद्दल गावकरी मंडळींचे कौतुक केले. मिरवणुक वेळी गावातील पालकांनी विद्यार्थ्यांचे पुष्पवृष्टी करून स्वागत केले तसेच पालक महेश खटके यांनी सर्व विद्यार्थ्यांना साखर वाटून शाळेचा पहिला दिवस साजरा केला.

यावेळी सरपंच संजय पाटील, उपसरपंच तथा शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विश्वजीत खटके यांच्यासह गट शिक्षणाधिकारी शिवकुमार बिराजदार, केंद्रप्रमुख प्रकाश मुळे, मनोहर बंडगर, कोंडीबा पांगे, विशाल खटके, अतुल बंडगर, उपस्थित होते. उमरगा तालुक्यातील कडदोरा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ, फळे, पुस्तके देवून मान्यवरांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले. मुख्याध्यापक देविदास पावशेरे यांनी प्रास्ताविकात शाळेच्या सुविधा आदीची माहिती सांगितले. यावेळी गावच्या सरपंच सुनंदा रणखांब, सुजाता शिंदे, उपाध्यक्ष सचिन रणखांब, उपसरपंच खंडू बालकूंदे आशा वाघमोडे, वंदना माडजे, मंजूर शेख, गंगूबाई शिंदे, यासीन शेख, मदिना शेख,सहशिक्षक ऊर्मिला मुसळे उपस्थित होते.

उमरगा बसवेश्वर विद्यालय
उमरगा शहरात महात्मा बसवेश्वर विद्यालयात पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके वाटप संस्थेचे संचालक प्रा शिवाजीराव वडणे, मुख्याध्यापक नेताजी गायकवाड यांच्या हस्ते करत विद्यार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.मुख्याध्यापक गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना अभिभाषण व मार्गदर्शन झाले.. प्रा. वडणे यांनी कोरोनाचे नियम पाळण्याच्या सूचना दिल्या. रामदास कुलकर्णी यांनी सुत्रसंचलन केले. शिक्षक माधव माने यांनी आभार मानले.

ईट, ज्योतिबाची वाडी
ज्योतिबाची वाडीच्या शाळेमध्ये नवागतांचा स्वागत सोहळा रंगला.उन्हाळी सुट्टीच्या प्रदीर्घ कालावधीनंतर चिमुकल्यांच्या किलबिलाटाने जोतिबाचीवाडी येथील जिल्हा परिषद शाळेचा आवार गजबजला आणि पुन्हा एकदा शाळा सुरू झाल्या. शाळेत पहिले पाऊल ठेवलेल्या चिमुकल्यांना शाळेची गोडी निर्माण व्हावी यासाठी खाऊ,गुलाबपुष्प आणि चॉकलेट देत मुलांचा शाळेचा पहिला दिवस अविस्मरणीय करण्यासाठी भव्य स्वरूपात ट्रॅक्टरमधून नव विद्यार्थ्यांची गावातुन मिरवणूक काढण्यात आली.शाळेच्या आवारात काढलेल्या रांगोळ्या,तोरण, फुलांनी सजविलेले वर्ग आणि संगीताच्या सुरावटीने मुलांचे स्वागत करण्यात आले.

नवागतांचा हा स्वागत सोहळा उत्सहात रंगला. तसेच सर्व शिक्षा अभियानांतर्गत मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप केले.यावेळी शालेय व्यवस्थापण समिती अध्यक्ष दादासाहेब भगत,केंद्र प्रमुख आर. एस. राऊत शाळेचे मुख्याध्यापक मारुती कोकाटे शाळेतील शिक्षक एस डी भगत,ए. एम. चव्हाण, डी. डी. दहातोडे, एम. यू. मुंढे, एन. एच. यादव, अंगणवाडी सेविका पालक उपस्थित होते.

उमरगा जि. प. प्रशाला
शहरातील जिल्हा परिषद प्रशालेत शाळेच्या प्रथम दिनी पहिलीच्या व पाचवीच्या विद्यार्थ्यांचे स्वागत लेझीम पथक, झांज पथक, रांगोळी व तोरण बांधून सजावट करत मुलांना गोड पदार्थ खाऊ घालून स्वागत करण्यात आले.शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा शकुंतला मोरे, माजी विशेष पोलीस महानिरीक्षक विठ्ठलराव जाधव, उद्योजक व माजी नगरसेवक विवेक हराळकर, विद्याताई जाधव, पंसचे गटशिक्षण अधिकारी शिवकुमार बिराजदार, शिक्षण तज्ञ सदानंद शिवदे, प्रा गुणवंत जाधवर, के डी खंडागळे, दीपक मदनसुरे, मुख्याध्यापक पद्माकर मोरे उपस्थित होते.यावेळी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व गणवेशाचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

घोड्यावर बसवून प्रवेश दिला

कळंब शैक्षणिक वर्षांच्या पहिल्या दिवशी हासेगाव (के)येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना घोड्यावर बसवून प्रवेश घेण्यात आला त्याच बरोबर गावातून भजनी मंडळास शालेय प्रवेश दिंडी काढण्यात आली आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हासेगाव (के) येथे पहिलीत प्रवेशित मुलांचे घोड्यावरुन व सुशोभित ट्रॅक्टर मधून प्रवेश दिंडी काढण्यात आली. या प्रवेश दिंडी मध्ये माता पालक,भजनी मंडळ,विद्यार्थी शिक्षक यांनी केलेली वारकरी संप्रदायाची पारंपरिक वेशभूषा हे खास आकर्षण ठरले.

याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य श्री भालेराव महाराज व त्यांच्या चमूने मृदंग वीणा व टाळाच्या गजरातने या मिरवणुकीची शोभा वाढवली. त्याच बरोबर मुलांना गुलाब पुष्प व नवीन पुस्तक देऊन शाळेत स्वागत करण्यातआले. या कार्यक्रम प्रसंगी शिक्षण विस्ताराधिकारी सुशील फुलारी, केंद्रप्रमुख सोमनाथ चंदनशिव व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष भिकाजी जाधव यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत घुटे यांनी केले या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व मुख्याध्यापक रामेश्वर जगदाळे, शिक्षक अमोल बाभळे, विकास खारके, राजाभाऊ गुंजाळ, समाधान भातलवंडे, लक्ष्मी कोकाटे, विद्या मनगिरे, प्रतिभा बिडवे, कालींदा समुद्रे आदींनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी जिल्हा परिषद शाळेतील प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...