आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनास्था:तज्ञ कर्मचाऱ्यांचा अभाव, उमरगा येथे पावसाळ्यातही 12 दिवसाआड पाणी

उमरगाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहराला कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होऊनही सक्षम व तज्ञ कर्मचाऱ्यांअभावी पाण्याचे योग्य नियोजन होत नसल्याने पावळ्यातही १२ दिवसाआड पाणी मिळत आहे. व्हॉल्व गळती व जलवाहिनीच्या फुटीची समस्या अद्यापही कायम असून शहरात दोन दिवसांपूर्वी मुगळे हॉस्पिटलजवळ फुटलेली जलवाहिनी गुरुवारी (दि.१) दुरुस्त करण्यात येत होती.

पालिका प्रशासन उपाययोजना करत नसल्याने लाखो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. त्यामुळे जार व बाटलीबंद पाण्याच्या मागणीत वाढ झाली आहे. उमरगा शहराची लोकसंख्या ६० हजारांवर आहे. शहरासाठी आठ वर्षांपूर्वी माकणीच्या निम्न तेरणा धरणातून कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाली. परंतु हद्दवाढ भागात अद्याप पूर्णतः पाणी पोहोचले नाही. ही योजना टंचाईच्या काळात उपयुक्त ठरली मात्र निकृष्ट कामामुळे जलवाहिनी कायम फुटते. आठ वर्ष होऊनही जलवाहिनीची समस्या सुटली नाही. सतत जलवाहिनी फुटणे व व्हॉल्व गळतीमुळे पाण्याचा अपव्यय होत आहे. पाण्याची नासाडी होत असून शहरवासीयांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पालिकेकडे तज्ञ व प्रशिक्षित कर्मचारी नाहीत, तसेच पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन नाही, त्यामुळे नागरिकांना दहा-बारा दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. भारनियमन व रात्रीच्या वेळी कमी दाबाने होणारा वीजपुरवठाही अडचणीचा ठरत असून नागरिकांना पाण्याची साठवणूक करावी लागत आहे.

माकणीपासून शहरापर्यंत अनेक व्हॉल्व्हला गळती
माकणी निम्न तेरणा धरणातून उमरगा शहरापर्यंत आलेली जलवाहिनी कायम फुटते. तसेच माकणीपासून उमरग्यापर्यंत जलवाहिनीच्या व्हॉल्व्हला अनेक ठिकाणी गळती लागली आहे. परंतु दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असून दररोज लाखो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. यामुळे पाणीपुरवठ्यासाठी अडचणी येत आहेत. राष्ट्रीय महामार्ग व अंतर्गत रस्ता खोदकाम व चौपदरीकरणाचाही अधून-मधून अडथळा येत आहे. पाणीपुरवठा योजना सुरू झाल्यानंतर जलवाहिनी फुटणे व गळतीची समस्या वारंवार येत आहे. त्यामुळे सध्या १२ ते १२ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे.

पाणी साठून डासांचा प्रादुर्भाव
जलवाहिनीची गळती व नादुरुस्त व्हॉल्वमुळे जागोजागी खड्डे पडल्याने सांडपाणी साचून अंतर्गत जलवाहिनीद्वारे घरघरांपर्यंत अशुद्ध पाणी पोहचते. डासांचा उपद्रव वाढल्याने विषाणुजन्य व साथीचे आजार होण्याची शक्यता बळावली आहे. दरम्यान, नादुरुस्त जलवाहिनीची दुरुस्ती करण्याचे काम सुरू असून सायंकाळपर्यंत दुरूस्ती होणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाचे करबस शिरगुरे यांनी सांगितले.

पाण्याचा व्यवसाय तेजीत
तालुका व शहरात पाण्याचे अंदाजे ३० हून अधिक उद्योग आहेत. सर्वच प्लांटधारक आयएसओ मानांकन असल्याचे सांगत आहेत. अन्न व औषधी प्रशासनाने आतापर्यंत या पाण्याची तपासणी केल्याची माहिती उपलब्ध नाही. व्हॉल्व गळती, जलवाहिनी फुटीने वैतागलेल्या नागरिकांना घरात वापरासाठी व पिण्यासाठी जार व बाटलीबंद पाणी खरेदी करावे लागत आहे. जार व टँकरद्वारे पाणीपुरवठ्याचा व्यवसाय मात्र तेजीत आहे.

बातम्या आणखी आहेत...