आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशीही कृतज्ञता...:लाखोंची बक्षिसे मिळवून देणाऱ्या रेड्याला वाजतगाजत शेवटचा निरोप; मालकाचे 100 नातेवाईकही सहभागी

भूम6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भूम शहरात फुलांनी सजवलेल्या वाहनामध्ये पारितोषिके ठेवून 3 किमीपर्यंत निघाली अंत्ययात्रा

टकरींच्या माध्यमातून चांदीसह लाखो रुपयांची बक्षिसे मिळवून देणाऱ्या रेड्याच्या मृत्यूनंतर कुटंुबाने रेड्याची चक्क फुलांनी सजवलेल्या वाहनातून वाजतगाजत अंत्ययात्रा काढली. तीन किलोमीटरपर्यंत काढलेल्या या अंत्ययात्रेत रेड्याच्या मालकाचे १०० हून अधिक नातेवाईक सहभागी झाले. चोवीस वर्षांनंतर रेड्याचा वृद्धापकाळाने मृत्यू झाला.

भूम शहरातील बसस्थानकाजवळ पारधी पेढीवरील किसन ऊर्फ गंुडू काळे यांच्याकडील राजा नावाच्या रेड्याचा बुधवारी (दि.२०) रात्री ९ वाजेच्या दरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर काळे कुटुंबात शोककळा पसरली. काळे यांच्यासह त्यांचे नातेवाईकही शोकसागरात बुडाले. त्यांनी रातोरात तयारी करून गुरुवारी (दि.२१) सकाळी ११ वाजता राजाची भव्य अंत्ययात्रा काढली. फुलांनी सजवलेल्या ट्रॉलीमध्ये राजाला ठेवण्यात आले. त्याच्याभोवती राजाने मिळवलेली पारितोषिके ठेवण्यात आली. फुलांचा, गुलालाचा वर्षाव करत हलग्यांच्या कडकडाटात व फटाक्यांच्या आतषबाजीत राजाची अंत्ययात्रा निघाली. गुंडू काळे यांच्या घरापासून संपूर्ण भूम शहरातून काळे यांच्या शेतापर्यंत म्हणजे ३ किलोमीटरपर्यंत ही अंत्ययात्रा काढण्यात आली. काळे यांच्या कुटंुबासह १०० हून अधिक नातेवाईक या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते. यामध्ये महिला, लहान मुलांचाही सहभाग होता. काळे यांच्यासह नातेवाइकांना राजाचे मरण जिव्हारी लागले आहे. कारण, राजा नावाचा हा भारदस्त रेडा काळे यांच्या कुटंुबाला संपन्नता मिळवून देणारा ठरला होता. राजाने काळे यांना मान-सन्मान, प्रतिष्ठा मिळवून दिली होती. राजाने महाराष्ट्रभरातील पशू प्रदर्शनात आणि टकरींच्या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवून विविध पारितोषिके पटकावली होती. बीडमधील स्पर्धेत पाव किलो चांदी, उस्मानाबादेत एक लाख रुपये, पटवर्धन कुरवली येथे ५१ हजार रुपये, बार्शी येथील स्पर्धेत २१ हजार रुपये, लातूर, कोल्हापूर, पंढरपूर, अकलूज अशा अनेक गावांतील स्पर्धेत लाखो रुपयांची बक्षिसे मिळवून देणारा राजा आता या जगात राहिला नव्हता. त्यामुळे कुटुंबाला अपार दु:ख झाले. काळे यांचा राजा रेडा अत्यंत प्रसिद्ध होता. कुठल्याही स्पर्धेत तो यशस्वी होऊन मालकाचे नाव करत होता. स्पर्धा खेळत खेळत वय वाढत गेले आणि बऱ्याच दिवसांपासून तो जमिनीवरच पडून होता. राजावर साश्रुनयनांनी गुंडू काळे यांच्या शेतात मानवाच्या अंत्यविधीप्रमाणेच मातीत खड्डा खोदून अंत्यविधी करण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...