आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:उशिरा पेरणी केलेल्या सोयाबीनला उन्हाचा फटका; बऱ्याच शेंगांवर फाफडी पडली, पाणी आणि औषध फवारणी करूनही उपयोग नाही

भूम2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या उन्हाळी सोयाबीन पिकावर उन्हाचा परिणाम झाला असून, सोयाबीनच्या झाडांना लागलेल्या फुलांची मोठ्या प्रमाणात गळती झाली आहे. त्यामुळे उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होणार आहे. तालुक्यात सोयाबीनला मिळणाऱ्या चांगल्या दरामुळे तालुका भरात रब्बी हंगामात मोठ्या प्रमाणात उन्हाळी सोयाबीनची लागवड झाली आहे.

सर्वत्र हे पीक जोमात आले ; परंतु अनेक ठिकाणी या पिकाला फुले उशिरा लागले आहेत. त्यात तापमानात प्रचंड वाढ झाल्याने सोयाबीन पिकाला लागलेली फुले गळून पडली आहेत तर सोयाबिनच्या बऱ्याच शेंगावर फाफडी पडली आहे. फळधारणाही खरीपाप्रमाणे लागली नाही.त्यामुळे लागलेल्या उत्पादनाच्या आशेवर पाणी फिरले गेले आहे. कृषी विभागाकडून फुले संगम या लागवडीसाठी नवीन वाणाच्या शिफारस करण्यात आली. ज्या शेतकऱ्यांनी लवकरच लागवड केली , त्यांचे पीक जोमात बहरले, तसेच या पिकांना चांगल्या शेंगा लागल्याचेही पाहायला मिळाले; परंतु उशिरा लागवड झालेल्या सोयाबीन पिकाला उन्हाचा मोठा फटका बसला आहे. तीन महिने उलटूनसुद्धा काही ठिकाणी झाडांना शेंगा लागल्या नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांचा खत आणि औषधांवर मोठा खर्च झाला ; परंतु वाढत्या तापमानाचा या पिकावर परिणाम होऊन फुलांची गळती झाली. त्यामुळे सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट होण्याची चिंता शेतकऱ्यांमध्ये आहे. बालाजी बोराडे म्हणाले की, आम्ही जानेवारी महिन्यात फुले संगम नावाच्या वाणाची लागवड केली होती. आता हे पीक तीन महिन्यांचे झाले आहे. वेळोवेळी पाणी आणि औषधांची फवारणीदेखील केली आहे ; परंतु सोयाबीन पिकाला शेंगा अतिशय कमी लागल्या आहेत . त्यामुळे मेहनत आणि खर्च वाया जाण्याची भीती आहे.

बातम्या आणखी आहेत...