आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभ्यासातील अडचणींबाबत मार्गदर्शन:जवाहर विद्यालयात विद्यार्थ्यांच्या अडचणी, उपायांवर व्याख्यान

अणदूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

येथील जवाहर विद्यालयात शनिवारी ‘विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील अडचणी व उपाय’ विषयावर राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षिका तथा सेवानिवृत्त मुख्याध्यापिका आशालता हणुमंत जगताप यांनी मार्गदर्शन केले. येथील जवाहर विद्यालयात गणेशोत्सवानिमित आयोजित व्याख्यानमालेत दुसरे पुष्प गुंफताना त्या बोलत होत्या. शिक्षण पद्धतीत झालेल्या बदलांवर प्रकाश टाकताना त्या म्हणाल्या की, आजचे विद्यार्थी सतत तणावात दिसत आहेत. पालकांकडून विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबाबत खूपच अपेक्षा बाळगल्या जात असून त्यात विद्यार्थी भरडला जात आहे, हेच ताणाचे प्रमुख कारण वाटते. विद्यार्थ्यांनी तणावात न राहता नियमित अभ्यास करावा. विद्यार्थ्यांचे वाचन कमी झाले आहे. गाईडचा वापर वाढल्याचे दिसून येत आहे. नियमित वाचन, लेखन, चिंतन करावे. वाचन करताना काही मुद्दे अधोरेखित करावेत व त्यातूनच रिकाम्या जागा भरा, जोड्या लावा, चूक की बरोबर, व्याकरणातील प्रश्न पक्के करावेत.

अध्यक्षीय समारोपात रामचंद्र आलुरे यांनी जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर अभ्यासाशिवाय पर्याय नसल्याचे स्पष्ट केले. गणेशोत्सवानिमित्त संपन्न झालेल्या चित्रकला, रांगोळी स्पर्धेतील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक सुरेश ठोंबरे, कल्याणी मुळे, आप्पासाहेब शेटे, सत्तेश्वर पाटील यांच्यासह शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.

अवांतर वाचन करावे
निबंध, पत्रलेखन या प्रश्नांसाठी अवांतर वाचन, साहित्याचे वाचन करावे. शिक्षकांनी सांगितलेले गृहपाठ, स्वाध्याय, लेखन कौशल्य वेळच्या वेळी पूर्ण करावे. पूर्वीची व आताच्या शिक्षण प्रणालीची सांगड घालून अभ्यासातील अडचणींवर कशी मात करावी, याचा कानमंत्र त्यांनी दिला.

बातम्या आणखी आहेत...