आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जांभूळ आख्यान:बाजारपेठेत रानमेवा दाखल; परंतु झाडे कमी झाल्याने भावही वाढले

उमरगाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • वृक्षतोडीमुळे वाढ खुंटली, अवर्षणाचाही परिणाम, मोहर उशिरा आला

निसर्गाचा लहरीपणा आणि दिवसेंदिवस कमी होत चाललेला पाऊस सद्यस्थितीत कोरोनाचे संकट शिवाय वातावणात बदलाचा परिणाम रानमेवा असलेल्या जांभळांवरही झालेला असून, बाजारात गावरान जांभळाची आवक कमी झाली आहे. बाजारात दाखल झालेली जांभळे महाग झाली असून, वृक्षतोडीने जांभळाची झाडे दुरापास्त झाली आहेत.

सततच्या अवर्षणग्रस्त स्थितीमुळे यंदा जांभुळ उत्पादनात बरीचशी घट झाली आहे. सतत बदलणाऱ्या वातावरणामुळे जांभूळ उत्पादनास पोषक वातावरण मिळत नसल्याने गावरान जांभूळ दुर्मिळ झाले आहेत. गेल्या चार वर्षांपासून होत असलेल्या वृक्षतोडीने जुनी जांभळाची झाडे कमी झालेली आहेत. नवीन जातीच्या झाडांना फारशी वाढ नाही. त्यामुळे गावरान जांभळाचा आस्वाद दुर्मिळ झाला. हवामानातील बदलाने आंबा, काजू उत्पादनाप्रमाणे जांभळाला उशिराने मोहर येऊन हंगाम उशिरा सुरू झाल्याने जांभळाचे उत्पादन व मिळणारा पैसा कमी मिळणार आहे. सततच्या बदलामुळे जूनच्या सुरुवातीला बाजारात जांभूळ दाखल झाला आहे. सध्या उत्पादीत जांभूळ पिकाला मागणी असून, महाग का होईना, पण ग्राहक खरेदी करत आहेत. सद्यस्थितीत ग्रामीण भागात खेड्यापाड्यांतील जंगल भागातील, कर्नाटकातील सीमेवरील महिला भरलेल्या जांभळाच्या टोपल्या विकून महिन्यांत वीस ते तीस हजार रुपये कमवत असतात.

जांभळामध्ये लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस, क जीवनसत्व यांचे प्रमाण अधिक असते. शिवाय किंचित प्रमाणात ब जीवनसत्व असते तर प्रथिने, खनिजे, तंतूमय, पिष्टमय पदार्थ व थोड्या प्रमाणात मेद हि असतो. जांभळाच्या कोवळ्या पानात ई-जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असतात. जांभळाच्या बियांत ग्लुकोसाईड जांबोलिन हा ग्लुकोज प्रकार असल्याने साखर वाढल्यावर हा घटक पिष्टमय पदार्थाचे साखरेत रूपांतर करण्यावरती आळा घालतो म्हणून जांभूळ आणि त्याचे बी मधुमेह या आजारावर अत्यंत गुणकारी आहेत.

जांभळाचे अनेक उपयोग
जांभळ्या रंगाच्या फळाची चव गोड-तुरट असून, पुरातन उपयुक्त वृक्ष आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून ही फार महत्वाचा आहे. उन्हाळ्याच्या शेवटी व पावसाळ्याच्या सुरुवातीला काळसर जांभळाचे घड झाडाला लगडलेले दिसतात. याचा मोसम अतिशय कमी दिवसांचा असतो. वर्षांऋतूत जांभूळ हे अमृत फळ असते. लांबट आकाराची जांभळे खरोखरच चवीला आंबट-गोड रसरशीत असतो. जांभळां चा आस्वाद हा तृप्तीदायक, आल्हाददायक असतो. दिवस उगवला की पहाटे ग्रामीण भागात महिला जांभळे करंड्यात (टोपलीत) भरून विकण्यासाठी शहरांकडे येत असतात. सध्या बाजारात लहान जांभूळ ८० रुपये तर मोठे जांभूळ (राई जांभूळ) शंभर ते १२० रुपये किलोप्रमाणे विकले जात असल्याचे जांभूळ विक्री करणाऱ्या महिलेने सांगितले.

बातम्या आणखी आहेत...