आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्येचा प्रयत्न:सावकाराचा त्रास; आत्महत्येचा प्रयत्न

परंडाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील सोनारी येथील एका तरुण शेतकऱ्याने सावकाराच्या त्रासाला कंटाळून विषारी औषध प्राशन करुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. माहितीनुसार, सोनारी येथील खासगी सावकाराचा त्रास व दिलेली शेत जमीन परत मिळत नसल्याने हताश झालेला शेतकरी गणेश नागेश कुळधर्मे (२५) याने विष घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली.

गणेश याने विष घेतल्यावर त्रास होऊ लागल्याने येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्याच्यावर प्राथमिक उपचार करून प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवले. गणेश यांनी सोनारीचे सावकार अण्णा प्रभू राऊत यांच्याकडून सन २०१७ साली व्याजाने चार लाख रुपये घेतले होते. त्या बदल्यात एक एकर जमीन खरेदी देऊन पैशांची परतफेड केल्यावर जमीन परत देण्याचे ठरले होते.

जमीन परत मागितली परंतु दोन वर्षांपासून जमीन परत देण्यास सावकार टाळाटाळ करत असल्याने गणेश सोमवारी परंडा पोलिस ठाण्यात राऊत यांच्या विरोधात तक्रार देण्यासाठी आले होते. निराश झालेल्या गणेशने सोनारी येथे जाऊन विष घेत जीवन संपवण्याचा प्रयत्न केल्याची माहिती त्यांच्या नातेवाइकांनी दिली.

अवैध सावकार वाढले
तालुक्यात अवैध व खासगी सावकारांचा सुळसुळाट वाढला. अनेक सावकारांविरुद्ध परंडा येथील सहायक निबंधकांकडे तक्रारी दाखल आहेत. मात्र, वर्षानंतरही कारवाई होत नसून चौकशीची मागणी नागरिकांमधून होत आहे.

बातम्या आणखी आहेत...