आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासध्या जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत ग्रंथालयाची वानवा असताना धाराशिव तालुक्यातील राघुचीवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रत्येक वर्गात ग्रंथालय सुरू करण्यात आले. उपक्रमशील शिक्षकांच्या प्रयत्नामुळे हे साध्य झाले असून आता यामुळे विद्यार्थ्यांचे भाषिक कौशल्य वृद्धिंगत होत आहे. तसेच त्यांना विविध स्तरावरील अध्ययन निष्पत्तीही साध्य करता येत आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालेल्या धाराशिव जिल्ह्यात सध्या शाळेतच काय प्रत्येक गावातही ग्रंथालय सापडत नाही. यामुळे अनेक पिढ्या आता वाचनापासून दूर जात आहेत. मात्र, आजही वाचन चळवळ टिकवून ठेवण्यासाठी अनेकजण प्रयत्नरत आहेत. असाच एक यशस्वी प्रयत्न राघुचीवाडी शाळेतील शिक्षक समाधान शिकेतोड यांनी केला आहे.
येथील शाळेत पहिली ते आठवीपर्यंत वर्ग सुरू आहेत. सुरुवातीला शाळेचे एकच ग्रंथालय होते. मात्र, विद्यार्थ्यांकडून याचा उपयाेग होत नव्हता. यामुळे शिकेतोड यांनी प्रत्येक वर्गात ग्रंथालय सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला. आता समोरच पुस्तके असल्यामुळे विद्यार्थ्यांची नजर आपणहून पुस्तकांकडे वळत असून विद्यार्थी वाचण्याचा प्रयत्न करत आहे. अन्य शिक्षकांचेही सहकार्य शिकेतोड यांच्या प्रयत्नाला मुख्याध्यापक महादेव थोरात यांनी भक्कम साथ दिली. प्रमोद शिंदे, प्रेमनाथ जाधव, योगेश कपाळे, नामदेव हुंबे, कविता पांगळ आदींचेही सहकार्य असल्याने हा प्रकल्प यशस्वी ठरत आहे. अन्य शाळांनीही विद्यार्थ्यांमध्ये वाचन क्षमता वाढवण्यासाठी असा उपक्रम राबवण्याची गरज आहे.
अशी आहे वर्ग वाचनालयांची रचना
प्रत्येक वर्गातील विद्यार्थ्यांच्या बौद्धिक स्तराचे अवलोकन करून त्यांना पुस्तके उपलब्ध केली. पहिली, दुसरीच्या वर्गांसाठी चित्रयुक्त पुस्तके आहेत. नंतर पाचवीपर्यंत गोष्टीरुप पुस्तके दिली आहेत. याशिवाय त्यावरील वर्गांसाठी काही सामान्य ज्ञान, इतिहास, महापुरूषांची माहिती सांगणारी पुस्तके आहेत. प्रत्येक वर्गात ८० ते ९० पुस्तकांचा संच असून प्रत्येक पुस्तक वाचावे, यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले जाते.
भाषिक कौशल्य वाढले
ग्रंथालयात नवीन पुस्तके वाचण्यास मिळत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे भाषिक कौशल्ये वाढत असल्याचे शिक्षकांचे निरीक्षण आहे. तसेच नवीन शब्द, वाक्यरचना वाचण्यात आल्याने विद्यार्थ्यांचा अध्ययनस्तर विकसित होत असल्याचेही दिसून येत आहे. शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष दर्लिंग बेलदार, सदस्य शंकर मोरे आदी पालकांकडूनही या ग्रंथालयांचे कौतुक होत आहे.
विद्यार्थीच बनले ग्रंथपाल
प्रत्येक वर्गातील ग्रंथालयाच्या नियोजनासाठी विद्यार्थ्यांनाच ग्रंथपाल बनवण्यात आले. शिकेतोड यांनी प्रत्येकी दोन विद्यार्थ्यांना ग्रंथालयातील रजिस्टर हाताळणे, पुस्तके नेल्याची व परत केल्याची नोंद करणे, विद्यार्थ्यांने पुस्तक न दिल्यास पाठपुरावा करणे, पुस्तक न घेणाऱ्या विद्यार्थ्याला आग्रह करणे आदी बाबी या ग्रंथपालांना शिकवल्या आहेत. यामुळे प्रत्येक वर्गातील ग्रंथालयाचे काम विद्यार्थीच यशस्वीपणे संभाळतात.
अभिव्यक्ती क्षमतेचाही विकास
ग्रंथालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अध्ययन निष्पत्ती विकसित होण्यास मदत होत आहे. भाषिक कौशल्य विकसित होत आहेत. शाळेतील विद्यार्थी उत्तम पुस्तक परिचय लेखन करत आहेत. त्यांच्यातील अभिव्यक्ती क्षमता विकसित होत आहे.'' -समाधान शिकेतोड, ग्रंथालय विभाग प्रमुख.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.