आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानाबाद:ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीला व्हिडिओ कॉल करून तरुणाची लाइव्ह आत्महत्या

उस्मानाबाद7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वाशीमच्या तरुणीवर उस्मानाबादमध्ये गुन्हा

उस्मानाबाद तालुक्यातील एका तरुणाने उस्मानाबाद शहरात ११ डिसेंबरला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणाचा त्याच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून १५ रोजी उलगडा झाला आहे. यामध्ये प्रेयसीकडून पैशासाठी होत असलेल्या ब्लॅकमेलिंगच्या व बदनामीच्या भीतीपोटी सदरील तरुणाने थेट प्रेयसीला व्हिडिओ कॉल करून लाइव्ह आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. याप्रकरणी त्या तरुणीवर उस्मानाबाद शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या धक्कादायक घटनेची माहिती अशी की, आत्महत्या केलेला तरुण एका कंपनीत कामाला हाेता. परंतु, लॉकडाऊन झाल्यापासून तो उस्मानाबाद तालुक्यातील आपल्या गावी परतला होता. याच दरम्यान नातलगाकडे आलेल्या वाशीम जिल्ह्यातील एका तरुणीशी त्याची ओळख झाली व पुढे प्रेमसंबंध निर्माण झाले. यातूनच सदरील तरुणाने त्या तरुणीस मोबाइल फोन व पैसेही दिले होते. परंतु, तरुणीकडून सातत्याने पैशाची मागणी होत असल्याने तरुणाने पैसे देण्यास असमर्थता दाखवली. या वेळी तरुणीने तू शेत वीक, घर वीक नाहीतर जीव दे, परंतु मला पैसे हवेत असे बजावले. पैसे न दिल्यास तुझ्याविरोधात बलात्काराची केस करून तुझ्यासह संपूर्ण कुटुंब बरबाद करीन असे धमकावले. हा सर्व प्रकार तरुणाने घटनेच्या काही दिवस आधीच मोठ्या भावास सांगितला होता. यातून तोडगा काढण्यासाठी १३ रोजी बैठकही बसणार होती. परंतु, तत्पूर्वीच सदरील तरुणाने उस्मानाबादेत थेट तरुणीला व्हिडिओ कॉल करून लाइव्ह आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब ११ डिसेंबरला दुपारी घडली. ही बाब तरुणीनेच तिच्या मावस भावास फोन करून सांगितल्यानंतर घडलेला प्रकार समोर आला. या घटनेच्या मानसिक धक्क्यातून थोडे सावरल्यानंतर तरुणाच्या भावाने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून याप्रकरणी तरुणीविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...