आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फुलांचे नंदनवन:उसाला पर्याय शोधत फुलवले गुलाबाचे नंदनवन, वर्षात 3 लाखांचे उत्पन्न

डोंजा / शिवाजी सूर्यवंशी23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

विजेची समस्या, वेळेवर तोड न मिळणे, मजुरांच्या हेकेखोरपणाला कंटाळून उसाची शेती मोडून डोंजा (ता. परंडा) येथील युवा शेतकरी पांडुरंग तांबे यांनी ४० गुंठे गुलाब लावून एका वर्षात तीन लाखांचे उत्पन्न घेतले. यशामुळे त्यांनी पाच एकरापर्यंत गुलाबशेतीचा विस्तार केला.तांबे यांनी अभ्यास, ज्ञान घेण्याची आस, कष्ट व पिकांचे नियोजन करून यश मिळवले. अगोदर त्यांनीही उसावर भर दिला होता. परंतु, त्यातील अडचणींमुळे पर्याय शोधत वडिलोर्जित ७ एकर शेतीला फुलांचे नंदनवन फुलवले. शेतकरी मित्रांचे अनुभव, सहली, कृषी प्रदर्शने, मासिके वाचून, शेतीतील अनुभव घेत फुलशेतीला सुरुवात केली. ज्ञानवृद्धीतून गुलाबशेतीचे नियोजन करत वर्षभरापूर्वी २० गुंठ्यांवरच लागवड केली. नंतर तीन महिन्यात त्यांनी याचा विस्तार ४० गुंठ्यांपर्यंत केला. यामधून त्यांनी सुमारे तीन लाख रुपयांचे उत्पन्न घेतले आहे. मार्केटचे मोठे ठिकाण म्हणजे पुणे व आैरंगाबाद दूर अंतरावर असल्याने पांडुरंग यांनी सुरुवातीला स्वतः तोडणी व पॅकिंग करून दररोज सकाळी फुले मंडईला देण्याऐवजी मुख्य विक्रेत्यांना पुरवले. हंगाम नसलेल्या काळात ५० ते ७० रुपये प्रति शेकडा तर हंगामात लग्नसराई, सणांच्या दिवसात १०० ते २०० प्रति शेकडा भाव मिळाला. सरासरी भाव प्रति फूल एक रुपये हमखास मिळाला. अजूनही नेटाने त्यांची शेती सुरूच आहे.

पुण्यातील नर्सरीत अनुभव
तांबे यांनी पुणे येथील गुलाबाच्या नर्सरीत लागवड व उत्पादनाचा अनुभव घेतला. सुरुवातीला पुण्याजवळच शेती भाड्याने घेत फुलांचे उत्पन्न घेण्याचा अनुभव घेतला. यामुळे त्यांचा चांगला सराव झाला आहे. तांबे धान्यांकुर शेतकरी उत्पादक कंपनीशी सलग्न आहेत. याचाही त्यांना मार्गदर्शनासाठी फायदा झाला.

७०० जातींची लागवड
बोर्ड, डिवाईड, सोफिया, काश्मिरी, तोडीगंडा, बोरंडो, पॉपलर, मिनिक्युअर, बटनगुलाब, रेडआय आदी देशी व विदेशी ७०० गुलांबांच्या रोपांची लागवड तांबे यांनी केली आहे. प्रत्येक गुलाबाच्या जातीच्या फुलांचा आकार, रंग, गंध वेगवेगळा आहे. काही फुले आरोग्यासाठीही पूरक असल्याचे तांबे यांनी सांगितले.

५० हजार रुपये खर्च
वर्षातील २०० दिवस ६५० कलमांना प्रति कलम सरासरी दोन फुले आली तरी हजार फुले मिळाली. गतवर्षी २०० दिवसात एक लाख फुले मिळाली. रोपे लावण्यासाठी वाफे करण्यापासून खते, कलम, कीटनाशके, पाणी, ठिबक, प्रवास भाडे, स्वतःची मजुरी असा, ५० हजार खर्च आला. ४० गुंठ्यामध्ये तीन लाखांचे उत्पन्न मिळाले.

अशी केली लागवड: दोन उभ्या ओळीतील अंतर साडेचार फूट आहे. झाडांतील अंतर दीड फूट ठेवले. ठिबक सिंचन केले, यातून खतेही देता येतात. हवा खेळती राहून झाडांचे योग्य पोषण होते. उत्पन्नामधेही वाढ होते. फुलांचा दर्जाही चांगला राहतो.

बातम्या आणखी आहेत...