आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहिनाभरापूर्वी जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या कामावर आठ हजार मजूर काम करत होते. तसेच ३५० ग्रामपंचायतीत ८०० पेक्षा अधिक कामे सुरु होती. मात्र, एकीकडे २५६ रुपये मिळणारी हजेरी, दुसरीकडे शेतीचे वाढते कामे, त्यात मिळणारी जास्तीची मजुरी त्याच बरोबर शासनाने रोहयोच्या सार्वजनीक कामांवर केलेली दोन वेळची ऑनलाइन हजेरी, यामुळे ३० दिवसात तब्बल पाच हजार ४०६ मजूर घटल्याचे दिसून आले. त्यामुळे सध्या १३१ ग्रामपंचायतीत ४६० कामांवर केवळ दोन हजार ५९४ मजूर कार्यरत असल्याचे दिसून आले. जिल्हा व राज्यात रोजगार हमी योजनेच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे. त्याच्या तक्रारीही होत असताना शासनाने यात अधिक पारदर्शकता निर्माण करण्यासाठी सार्वजनीक कामांवरील मजुरांना दोन वेळ ऑनलाइन हजेरी देणे अनिवार्य केली. त्याचा स्थानिक पातळीवरील प्रशासनाने धसका घेतल्याने मोठ्या प्रमाणातील कामे बंद पडली.
विशेष म्हणजे सार्वजनीक कामांची संख्या घटली आहे. वैयक्तिक कामे मात्र सुरू आहेत. त्यामुळे जिल्ह्यात सध्या काही प्रमाणात का होईना कामे आणि मजूर काम करत असल्याचे दिसून येत आहेत. जिल्ह्यात मागील दोन- तीन महिन्यात रोहयोच्या कामावरील मजुरांची संख्या दहा हजारावर गेली होती. तसेच ग्रामपंचायत संख्या आणि कामांची संख्याही अधिक होती. पण, शासनाच्या नियमामुळे मोठ्या प्रमाणात मजुरांची संख्या कमी होत चालली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात स्थानिक स्तरावर सुरू असलेला मजूरांच्या संख्येबाबत बनावटपणा उघडकीस येणार असून या उपाययोजनांमुळे बोगस कामांना काही प्रमाणात आळाही बसत आहे.
दुष्काळात हजारो ग्रामस्थांना रोजगार
रोहयोतून शासनाने मागेल त्याला काम, म्हणजे ज्यांना आवश्यक आहे, आशा मजुरांच्या हाताला काम देण्याचे नियोजन केले होते. तसेच जेथे काम आवश्यक आहे, तीच कामे करण्यात येत होती. त्यामुळे ऐन दुष्काळात हजारो, लाखो लोकांना रोजगार मिळाला होता. आता मात्र, त्यात अनेकांनी कामे आणि मजूर खोटी दाखवत पैसे लाटण्याचे काम केल्याचे दिसून येत आहेत.
रोहयोच्या कामात स्थानिक स्तरावर घोटाळे
रोहयोच्या कामांमध्ये स्थानिक स्तरावर मोठ्या प्रमाणात घोटाळे होत असतात. नुकताच उस्मानाबाद पंचायत समितीत असे घोटाळे उघड झाले आहेत. स्थानिक पातळीवर ही कामे करायची असल्याने यात अनेकदा मजूर दाखवून यंत्राच्या मदतीने कामे उरकून घेण्यात येतात. तसेच अनेक कामे न करतानाही कामे झाल्याचे भासवण्यात येतात. त्यामुळे अशा कामांवर आता अंकुश आले आहेत. या प्रकारामुळे योजनेचा उद्देशच हरवला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात मजुरांना रोजगार मिळणे कठीण झाले आहे.
बांधकाम, शेतीवर रोहयोपेक्षा अधिक मजुरी
रोहयोच्या कामांवर केवळ २५६ रुपये मजुरी मिळत असते. दुसरीकडे बांधकामावर काम करणाऱ्या मजुरांना ४०० ते ६०० रुपये मजुरी दिली जाते. तसेच शेतीच्या कामावर ३०० ते ४०० रुपये मजुरी मिळत असते. त्यामुळेही रोहयोच्या अनेक कामांवर मजूर उपलब्ध होत नसतात. असे असले तरी, ग्रामपंचायतच्या अनेक हजेरी बुक मध्ये मोठ्या प्रमाणात मजूर असल्याचे दिसून येत होते. त्याची संख्या आता घटली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.