आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:मंगळवारी सर्वात कमी तापमान, पारा 9.9 अंशावर

उस्मानाबाद5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावर्षी हिवाळा सुरू झाल्यापासून मंगळवारी (दि. २२) हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. तब्बल पारा ९.९ अंशापर्यंत घसरला आहे. जिल्ह्यात पडलेला मोठा पाऊस व उत्तर भारतातून जोरात वाहणाऱ्या वाऱ्यामुळे तापमानात सातत्याने घट होत असल्याचे सागण्यात येत आहे.

दिवाळीच्या अगोदर काही दिवस परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला होता. पाऊस थांबल्यानंतर जिल्ह्यात तापमानात मोठी घट झाली. नंतर सातत्याने वातावरणात गारवा पसरत गेला. दिवाळीला थंडी अधिकच वाढली होती. पंरतु, मध्यंतरी तापमान १५ अंशाच्या दरम्यान रेंगाळत होते. यामुळे काहीशी थंडी कमी झाली होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सातत्याने तापमानात घट होत असताना दिसत आहे. गेल्या चार ते पाच दिवसांपासून तापमान ११ ते १२ अंशावर स्थिरावले होते. मात्र, पुन्हा आणखी तापमानात घट होत असल्याचे दिसून येत आहे. मंगळवारी तर या हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. आजच्या दिवशी पारा ९.९ अंशावर आला होता. यामुळे सर्वात अधिक थंडी जिल्ह्यात निर्माण झाली. सर्वत्र हुडहुडी भरत होती.

नागरिकांना थंडीपासून बचाव करण्यासाठी शेकोटीसह गरम कपड्यांचा आधार घ्यावा लागत आहे. मंगळवारी सर्वात कमी तापमान नोंदवले असले तरी यापेक्षा अधिक प्रमाणात तापमानात घट होऊन आणखी थंडी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शक्यतो डिसेंबरच्या मध्यावर अशी थंडी जिल्ह्यात पडत असते. मात्र, यावर्षी नोव्हेंबरमध्येच अशी थंडी जाणवत आहे.

शाळकरी विद्यार्थ्यांना त्रास
काही ठिकाणी सकाळच्या सत्रात शाळा भरताता. विद्यार्थ्याना पहाटे उठून शाळेत जावे लागते. यावर्षी गारठा वाढल्याने विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो. काही विद्यार्थी तर आजारी पडतात. यामुळे शाळांच्या वेळामध्ये बदल करण्याची गरज आहे.

यामुळे थंडी वाढली : उत्तेर भारतात बर्फ पडल्याने तिकडून थंड वारे वाहत आहेत. या थंड वाऱ्यांचा प्रभाव असेपर्यंत जिल्ह्यात थंडीची तीव्रता कायमच राहणार आहे. तसेच जिल्ह्यातील सर्वच भागात यावर्षी मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली होती. यामुळे सर्वच भागातील तलाव व अन्य जलस्रोतांमध्ये पाणी आहे. यामुळेही थंडावा निर्माण होण्यासाठी मदत मिळत आहे, अस तज्ञांनी सांगितले.

गरम कपड्यांना मागणी
शहरात स्वेटर, मफलर, जर्किन, कानटोपी आदी विक्रेते दाखल झाले आहेत. त्यांनी लावलेल्या स्टॉलवर ग्राहकांची सातत्याने गर्दी होत आहे. दरम्यान, स्थानिक कापड दुकानांमध्येही गरम कपडे खरेदी करण्यासाठी गर्दी पडली आहे.

बातम्या आणखी आहेत...