आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराष्ट्रवादीचे नेते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या मुलांसह मुली, जावयांच्या नावाने उस्मानाबाद तालुक्यातील जवळा, आळणी शिवारात ५९.८१ हेक्टर म्हणजे जवळपास दीडशे एकर जमीन खरेदी करण्यात आलेली असून, या जमिनीचे मूल्यांकन २ कोटी ७ लाख रुपये इतके दाखवण्यात आले होते. मात्र, या जमिनीचे खरे मूल्यांकन ३ कोटी २९ लाख रुपये असून, १ कोटी २२ लाखांचे मुद्रांक शुल्क बुडवून झालेले हे खरेदीखत रद्द करावे, जमिनीच्या खरेदी प्रकरणाची चौकशी करावी, घरकाम आणि शेती करणाऱ्या कुटुंबाकडे जमीन खरेदीसाठी इतकी रक्कम कोठून आली, याची सखोल चौकशी करावी, यासाठी ईडीकडे तक्रार करणार असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांनी केली आहे. त्यांनी यापूर्वीही जमिनीसंदर्भात अनेकदा तक्रारी केल्या आहेत.
काळे यांनी उस्मानाबादजवळ नवाब मलिक कुटुंबीयांच्या नावे असलेल्या या जमिनीची पत्रकारांना जागेवर जाऊन माहिती दिली. त्यानंतर त्यांनी भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. त्यांनी यापूर्वीही या जमिनीसंदर्भात तक्रार केली होती. नवाब मलिक यांना बुधवारी ईडीने अटक केल्यानंतर त्यांनी या तक्रारीचा पुनरुच्चार केला. ते म्हणाले, आपण या जमिनीच्या बेकायदेशीर खरेदी प्रकरणावर महसूल अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार केली. मात्र, मलिक यांच्या दबावामुळे जमिनीचा फेर झाला. शिवाय फेर केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली.
यांच्या नावे जमीन खरेदी
२० डिसेंबर २०१३ रोजी नवाब मलिक यांच्या कुटुंबातील मेहजबीन नवाब मलिक, सना नवाब मलिक, बुश्रा संदुश फराज, आमिर नवाब मलिक, निलोफर समीर खान, फराज नवाब मलिक (सर्व. रा.२१८, सी-२, तळमजला, नूर मंजील, कुर्ला, वेस्ट मुंबई) यांनी ही जमीन वसंतराव मुरकुटे, नंदा मुरकुटे, संदीप मुरकुटे, कल्पना मुरकुटे, सूर्यकांत मुरकुटे व रूपाली मुरकुट (रा.बाणेर, पुणे) यांच्याकडून खरेदी केली होती. २ कोटी ७ लाख रुपयांमध्ये या जमिनीचा व्यवहार कागदोपत्री दाखवण्यात आला असला तरी प्रत्यक्षात ८ कोटींपेक्षा अधिक रकमेत हा व्यवहार झाला असावा, असा संशय आहे.
मलिक यांच्या खरेदीखतापूर्वी या जमिनीचे वर्तमानपत्रातून जाहीर प्रगटन देण्यात आले होते. महेश कुलकर्णी नामक व्यक्ती या जमिनीचा व्यवहार करणार होती. मात्र, मलिक कुटुंबीयांनी जाहीर प्रगटनावर जितकी रक्कम आहे, तेवढी देण्याचे कबूल करून ही जमीन खरेदी केली आहे. वास्तविक २ कोटी ७ लाख रुपयांत जमीन खरेदी करण्यात आली असली तरी या आम्ही केलेल्या मूल्यांकनानुसार जमिनीचे मूल्यांकन ३ कोटी २९ लाख रुपये आहे. १ कोटी २२ लाख रुपयांचे मूल्यांकन बुडवून हा व्यवहार झाला आहे. याशिवाय जमिनीमध्ये आलिशान बंगला आहे. मात्र, खरेदीखतामध्ये त्याचा उल्लेख केलेला नाही.
त्यामुळे त्याचेही मूल्यांकन बुडवण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे. जमीन खरेदी करताना संबंधित व्यक्तीकडे पूर्वी जमीन असणे बंधनकारक आहे. मात्र, खरेदीखतासोबत जमीन असल्याचा पुरावा मलिक कुटुंबाने दिलेला नाही. विशेष म्हणजे नवाब मलिक यांची मुले, मुली, जावई या सगळ्यांचा पत्ता एकाच ठिकाणचा देण्यात आला आहे. तसेच सगळ्यांचा व्यवसाय शेती व घरकाम असा दिलेला आहे. घरकाम व शेती करणाऱ्यांकडे कोट्यवधी रुपये जमीन खरेदीसाठी येतात कसे, याचीही सखोल चौकशी करण्याची गरज काळे यांनी व्यक्त केली. आपण यासंदर्भात सर्व पुरावे ईडीकडे देणार असून एकूणच जमीन खरेदी प्रकरणाची चौकशी करावी अशी मागणी करणार आहोत, असे त्यांनी सांगितले. या वेळी भाजपचे अॅड.अनिल काळे, अॅड.िनतीन भोसले, राजसिंह राजेनिंबाळकर, अभय इंगळे, सुनील काकडे, पांडुरंग लाटे आदी उपस्थित होते. दरम्यान, आता या संपूर्ण प्रकरणावर नवाब मलिक कुटुंबीयांकडून कोण बोलते याकडे सर्वांचे लक्ष आहे.
व्यवहार रीतसरच, आरोपांत तथ्य नाही; राष्ट्रवादीकडून खुलासा
मलिक यांच्या कुटुंबीयांनी केलेला जमिनीचा व्यवहार नियमानुसार आहे. नितीन काळे यांच्या तक्रारीवरून यापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी समिती नेमली. त्यात कोणत्याही प्रकारची चूक आढळली नव्हती. त्यामुळेच फेर घेण्यात आला. तरीही काळेंचा तक्रारींचा सपाटा सुरूच आहे. मलिक यांच्या कुटुंबीयांचे मुंबईत मोठे व्यवसाय आहेत. ते दरवर्षी टॅक्सही भरतात. उस्मानाबादसह महाराष्ट्रात भाजप नेत्यांच्या किती आणि कोठे कोठे जमिनी आहेत, याची आम्हाला माहिती आहे. भाजप नेत्यांच्या या जमिनी सांगाव्यात का, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी प्रतिक्रिया देताना काळे यांना विचारला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.