आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराग्रामपंचायत निवडणूक प्रक्रियेत कामचुकारपणा करणाऱ्या तालुक्यातील ८१ अधिकारी व कर्मचाऱ्यांना निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार गणेश माळी यांनी कारवाई का करू नये म्हणून कारणे दाखवा नोटीस बजावली.यात १६ जणांनी खुलासे सादर केले. उर्वरित कर्मचाऱ्यांवर काय कारवाई होणार, याकडे लक्ष लागले आहे.
जिल्ह्यात सर्वच तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अर्ज भरून घेणे, छाननी, वाहन व्यवस्था, तक्रार निवारण आदी कामांसाठी निवडणूक अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. उस्मानाबाद तालुक्यातील ४५ ग्रामपंचायतींची निवडणूक होणार असून उमेदवारी अर्ज भरणे व छाननीची प्रक्रिया झाली आहे.
त्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी, बीएलओ हे अर्जाची छाननी, निवडणूक अर्जावरील आक्षेप स्विकारण्यासह अन्य कामांसाठी विविध विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती केल्या आहेत. त्यासाठी २५० टीम केल्या असून एका टीममध्ये ४ जणांचा समावेश करण्यात आला आहे. सुमारे एक हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती या कामासाठी करण्यात आलेली आहे. यासाठी वेळोवेळी प्रशासनाच्या वतीने प्रशिक्षणही देण्यात आले आहे.
असेच प्रशिक्षण रविवारी आयोजित करण्यात आले होते. मात्र, ८१ जणांनी आवश्यक असलेल्या प्रशिक्षणाला दांडी मारली. कोणतीही परवानगी न घेता ते सर्वजण अनाधिकृतपणे गैरहजर राहून याकडे पाठ फिरविली. यामुळे तहसीलदार माळी यांनी त्यांना गुन्हा दाखल का करु नये, तसेच शिस्तभंगाची कारवाई का करण्यात येऊ नये म्हणून कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
२४ तासात खुलासा सादर करण्याचे आदेश
आपण कर्तव्यात कसूर केल्याचे दिसून येत आहे. निवडणुकीचे काम कालमर्यादेत करणे अपेक्षित आहे. परंतु आपण लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ मधील कलम १३४ नुसार नियमाचा भंग केला आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम १९७१ मधील नियम-३ चे उल्लंघन करणारे वर्तन आहे. त्यामुळे प्रशासकीय व लोक प्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ चे कलम १३४ नुसार फौजदारी कार्यवाही का करण्यात येऊ नये? याचा खुलासा ही नोटीस प्राप्त होताच २४ तासांच्या आत करावा, असे नोटीसमध्ये बजावण्यात आले आहे.
१५ जणांकडून खुलासा, अन्य जणांवर टांगती तलवार
खुलासा सादर करण्यास विलंब झाल्यास किंवा खुलासा समाधानकारक नसल्यास प्रकरणांत नियमानुसार कार्यवाही केली जाईल, याची तंबी देण्यात आली होती. त्यापैकी १५ जणांनी आजारी, दिव्यांग व अन्यत्र कामात असल्याची कारणे दिली. त्यांचे म्हणणे दाखल करून घेतले आहे. मात्र, अद्याप अनेकांनी खुलासा दाखल केलेला नाही. यामुळे त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे.
प्रत्येक वेळी केवळ नोटीस, क्वचित प्रसंगीच कारवाई
प्रत्येक वेळी निवडणूक निर्णय अधिकारी यांनी असे कृत्य करणाऱ्यांना केवळ नोटीस बजावल्या आहेत. क्वचित प्रसंगीच कारवाया करण्यात आल्या आहेत. यामुळे निवडणूक कामांमध्ये कुचराई करण्याची संख्या अधिकच आहे. किमान यावेळी तरी कारवाई होणार की नोटीस देऊन सोडण्यात येणार, याकडे अन्य सर्व कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
निवडणुकीसाठी सर्वच कार्यालयांतील कर्मचारी वर्ग
निवडणूक संदर्भातील कामांसाठी अन्य सर्वच खात्यातील अधिकारी व कर्मचारी वर्ग करण्यात येतात. त्यासाठी वेळोवेळी प्रशिक्षणही देण्यात येते. रविवारी केंद्रप्रमुख व मतदान केंद्रातील एक ते चार कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण होते. गैरहजर असलेल्यांकडून मतदानात चुका होऊ शकतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.