आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजारपेठेत चैतन्य:मांगल्याची गुढी; कापड 40, सराफा 35 तर वाहनांच्या बाजारात 25 टक्के वाढीची चिन्हं

उस्मानाबाद4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दोन वर्षांच्या कालखंडानंतर गुढीपाडवा साजरा होणार धुमधडाक्यात

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना
नैसर्गिक अनुकूलता, कोरोनाचा संपलेला प्रभाव आदी कारणांमुळे गुढीपाडव्यानिमित्त बाजारपेठेत चैतन्यमय वातावरण आहे. यावेळी गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत कापड व्यापारात ४०, दागिने खरिदीत ३५ तर दुचाकींच्या विक्रीमध्ये २५ ते ३० टक्के वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. विशेष म्हणजे विविध व्यापाऱ्यांना ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध याेजनाही सुरू करण्यात आल्या आहेत. गुढीपाडव्याचा मुहूर्त साधण्यासाठी नागरिकही उत्सुक आहेत.
गेल्या खरीप हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. यामध्ये खरिपातील पिके वाया गेली असली तरी रब्बी पिकांना फायदा होण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. शिवारातील विहिरी व कुलनलिकांना सध्या बऱ्यापैकी पाणी आहे. तसेच विविध तलाव, बंधारे, तळी तुडूंब आहेत. यामुळे शेतकऱ्यांना रब्बीच्या पिकांसाठी चांगला फायदा झाला. तसेच उसाची लावणही यावेळी मोठ्याप्रमाणात झाली. काही शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा फायदा घेत फळ, भाजीपाल्यांच्या शेतीवर भर दिला.

यामुळे अनेक शेतकऱ्यांजवळ दोन वर्षात झालेल्या नुकसानीच्या तुलनेत बऱ्यापैकी पैसा आला आहे. तसेच लहान व मोठ्या व्यापाऱ्यांचाही अलिकडच्या काळात चांगला व्यापार झाला असून खासगी व सरकारी आस्थापाना पूर्वीप्रमाणे जोमात आहेत. यामुळे सर्वच वर्गात सध्या तरी आनंदाचे वातावरण आहे. याचा परिणाम गुढीपाडव्याच्या सणावर सकारात्मक झाला. घरावर गुढी उभारण्यासोबतच नवीन वस्तू खरेदी करण्यासाठी हा मोठा मूहूर्त आहे. पाडव्याच्या मुहूर्तावरील खरेदीसाठीची विचारणा पाहता विविध व्यापारांमध्ये मोठी उलाढाल अपेक्षित आहे. गुढीपाडव्याला कापड खरेदीचाही मोठा मान आहे. यामुळे व्यापाऱ्यांच्या मतानुसार कापड खरेदीमध्ये ४० टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता आहे. यासाठी अनेक नागरिक विचारणा करत असून व्यापाऱ्यांनीही जय्यत तयारी केली आहे. गुढीपाडव्याला बहुतांश कुटुंबीय सोन्याचे दागिने खरेदी करतात. यासाठी देण्यात आलेल्या ऑर्डर व विचारणांचा विचार करता ३५ टक्के विक्रीत वाढ होण्याचा अंदाज आहे. अनेकांनी आगावू दागिन्यांच्या आर्डर दिल्या असून कारागिरांकडून याचे बनवण्याचे काम सुरू आहे. एकूणच बाजारपेठेत दमदार वातावरण निर्माण झाले आहे.

दरात मोठी वाढ: सर्वच वस्तू, साहित्य, वाहने व दागिन्यांच्या दरात यावेळी मोठी वाढ आहे. यामध्ये सोन्याच्या दरात दोन वर्षाच्या तुलने झालेली वाढ सर्वश्रूत आहे. दुचाकीच्या दरामध्येही २० टक्क्यांनी वाढ झाली असून फाडीव व तयार कापडामध्येही २५ टक्क्यांपर्यंत वाढ आहे. इंधनातील दरवाढ, युक्रेन -रशियाचे युद्ध आदी कारणांमुळे दरात वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. व्यापाऱ्यांकडून विविध स्किम: ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध स्किम तयार करण्यात आल्या आहेत. यामध्ये कापड खरेदीवर गिफ्ट कार्ड, इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये एकावर एक फ्री, लकी ड्रॉ, सोने खरेदीवरील सुट अशा योजना ग्राहकांना देण्यात येत आहेत. एकाच वस्तूंची विक्री करणारे अनेक दुकानदार असल्यामुळे स्पर्धा अधिक आहे.

वाहन बाजार बहरणार
वाहनांचाही बाजार यावर्षी चांगलाच बहरणार आहे. दुचाकी, चारचाकी वाहनांची मोठ्या प्रमाणात नोंदणी झाली आहे. पेट्रोल व डिझेलचे दर वाढलेले असले तरी वाहनांच्या खरेदीवर कोणताही परिणाम झालेला दिसून आला नाही. उलट यावर्षी वाहन विक्रीमध्ये २५ ते ३० टक्क्यांनी वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यासाठी विविध वाहन विक्रेत्यांनी ग्राहकांना आकर्षक, डिस्काउंटही दिले आहे.

नवीन पद्धतीचे कपडे
सध्या बाजारात नवीन पद्धतीचे कपडे उपलब्ध आहेत. यामध्ये नवीन फॅशनही आहे. विशेष म्हणजे यावेळी ब्रँडेड कंपनीच्या कपड्यांना नागरिकांची अधिक मागणी दिसत आहे. प्रशांत कठारे, कापड व्यापारी.

इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्येही तेजी
इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या विक्रीतही यावेळी तेजी असणार असल्याचे चित्र आहे. यामध्ये सध्या तीव्र उन्हामुळे फॅन, फ्रिज, कुलर, वातानुकुलित यंत्रणेला अधिक मागणी आहे. अनेक नागरिक गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर याच्या खरेदीसाठी तत्पर आहेत. शहरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंची दुकाने सजली आहेत. नागरिकांनी येथेही मोठ्या प्रमाणात विचारणा केली आहे.

दरासह मागणीही मोठी
सध्या सोन्याच्या दागिन्यांच्या दरात गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत माेठी वाढ झाली आहे. मात्र, यामुळे मागणी कमी झाली नाही. उलट गतवर्षीच्या तुलनेत मागणीत ३५ टक्के वाढच आहे. सुनील वेदपाठक, सुवर्णकार.

वाहनांच्या खरेदीवर इंधन दरवाढीचा परिणाम नाही
वाहनांच्या खरेदीवर इंधन दरवाढीचा काहीही परिणाम झालेला नाही. नागरिकांच्या हातात पैसा असून त्यांच्याकडून विविध वाहनांची मोठी मागणी होत आहे. त्या दृष्टीने आम्ही वाहने उपलब्ध केली आहेत. रुपेश मोदाणी, शोरूमचालक, उस्मानाबाद.

बातम्या आणखी आहेत...