आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकासावर मंथन:नाल्यांतील सांडपाण्यामुळे मांजरा नदी दूषित, पाणी इतरत्र सोडण्याची सूचना

कळंबएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील विविध नाल्यांचे पाणी मांजरा नदीत जात आहे. त्यामुळे नदी दूषित होत असल्याने हे पाणी इतरत्र सोडावे, असा अभिप्राय शहर विकास योजना सुधारीत आराखड्याच्या बैठकीत मांडण्यात आला. यावर नगररचनाकारांनी मुख्याधिकाऱ्यांना पाहणी करुन उपाययोजना करण्याची सूचना केली आहे.

विकास आराखड्यात शहराची २० वर्षांच्या भविष्याची दिशा निश्चित होणार आहे. शहराची नियोजनबद्ध नवनिर्मिती, विकास, वाणिज्य, औद्योगिक, सार्वजनिक, मोकळी जमीन, संरक्षित जमीन, शाळा, क्रीडांगणे, रुग्णालये, हॉस्पिटल, बाजार, ग्रंथालये आदींचे नियोजन आराखड्यात ठरतात. कळंब शहराची विकास योजना सुधारीत करण्यासंदर्भात बैठक घेण्यात आली. यामध्ये शहर विकासासंबंधी अनेक अभिप्राय मांडण्यात आले आहेत. या अभिप्रायांचा कळंब शहर विकास योजना सुधारीत आराखड्यात समावेश करण्यात येणार आहे, असे नगर रचनाकार अधिकारी नारायण कुलकर्णी, मुख्याधिकारी शैला डाके यांनी सांगितले. यावेळी कार्यालयीन अधीक्षक दिपक हरकर, तन्मय कुलकर्णी, संजय हाजगुडे, गोविंद रणदिवे यांनी सहकार्य केले.

बैठकीत शहर सुधारणेबाबत अनेक ठराव मांडले
गावठाणात अनेक घरे उभारली आहेत. तेथील नागरिकांना रस्त्यासह मुलभूत सुविधा उपलब्ध करुन द्याव्या, मांजरा नदीकाठ विकसीत करावा, असा अभिप्राय माजी नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा. श्रीधर भवर यांना मांडला. शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत चालला असून शहरातील अनेक भागात नाल्या नाहीत. अपुरे रस्ते आहेत, असा अभिप्राय नगरसेवक लक्ष्मण कापसे यांनी मांडला. शहरातील केज रोड ते ढोकी रोडला जोडलेल्या बायपास रोडची रुंदी कमी आहे. ती शहर विकास योजना आराखड्यानुसार करावी व रस्त्यावरील अतिक्रमण काढावे, असा अभिप्राय भाजप शहराध्यक्ष संदीप बावीकर यांनी मांडला.

पार्किंग, डंपिंग ग्राउंड, वाचनालये बगिचे, व्यापारी संकुल उभारा
कळंबची लोकसंख्या वाढत आहे. त्यामुळे डंपिंग ग्राउंड करावे, शहरात विविध ठिकाणी प्लॉटिंग झालेली असून तेथील आरक्षित क्षेत्रात वाचनालय अथवा बगीचे उभारावे, आरक्षित क्षेत्र ताब्यात घ्यावे, कल्पना नगरातील रस्ते मुख्य रोडला जोडावे, आठवडी बाजार परिसरात व्यापारी संकुल उभारावे, वाहने पार्किंगची सोय करावी, असा अभिप्राय सामाजिक कार्यकर्ते मंगेश आष्टेकर यांनी मांडला.

बातम्या आणखी आहेत...