आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशासनाकडून गाव, वाडीस्तरापर्यंत कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यानंतरही लस घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात लाभार्थी समोर येत नसल्याचे चित्र आहे. त्यानुसार मराठवाड्यात ३६ लाख ५६२ लाभार्थींनी पहिला डोस घेतला नसल्याचे राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ३० डिसेंबर रोजी प्रसिद्ध केलेल्या अहवालावरून समोर आले. यात सर्वाधिक सात लाख १८ हजार लाभार्थी एकट्या नांदेड जिल्ह्यातील असल्याचे यातून स्पष्ट झाले.
गेल्या २१ महिन्यांपासून राज्यात कोरोना संसर्गाने थैमान घातले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात प्राणहानी, वित्तहानी झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. पहिल्या लाटेनंतर आलेल्या दुसऱ्या लाटेनेही कहर केला होता. दुसरी लाट ओसरत असतानाच आता पुन्हा तिसऱ्या लाटेचे संकेत ओमायक्रॉन आणि डेल्टा, डेल्टा प्लस या संसर्गामुळे येण्याचे संकेत मिळत आहेत. लसीकरणामुळे संसर्गाचे प्रमाण आणि तीव्रता कमी होते. तसेच लस घेतलेल्या रुग्णांना कोरोना झाला तरी ते गंभीर स्वरूपाचे नसतात. त्यामुळे शासन-प्रशासनाकडून लसीकरण करून घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, लसीकरणाबाबत लाभार्थी उदासीन असल्याचे चित्र दिसत आहे. कोरोना संसर्गापासून संरक्षण होण्यासाठी लसीकरण आवश्यक असल्याने शासनाकडून टप्प्याटप्प्याने लाभार्थींना लस देत आहे. आता सोमवारपासून १५ ते १८ वर्षे वयोगटातील युवकांना लसीकरण करण्यात येणार आहे. यात शाळांसह शाळाबाह्य मुलांनाही लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. इतर मोहिमेत मोठ्या प्रमाणात लसीकरणास प्रतिसाद मिळाला होता. तसेच या मोहिमेलाही प्रतिसाद मिळणार असल्याचे संकेत आरोग्य प्रशासनाकडून देण्यात आले आहे. त्याची सर्व तयारी जिल्हास्तरावर पूर्ण करण्यात आली आहे.
काेव्हॅक्सिनचा दुसरा डोस घेण्यास २८ दिवसांचा अवधी : कोविशील्डचा दुसरा डोस घेण्यासाठी ८४ दिवसांचा अवधी जाऊ द्यावा लागतो. मात्र, कोव्हॅक्सिनचा दुसरा डोस घेण्यासाठी २८ दिवसांचा अवधी लागतो. त्यामुळे ज्या नागरिकांनी कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतला त्यांनी आठवणीने वेळेत डोस घेतल्यास अधिक लाभ होतो.
‘हर घर दस्तक’ला प्रतिसाद कमी
शासनाकडून कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेण्यास लाभार्थी समोर येत नसल्याचे दिसून आले. त्यामुळे मुबलक प्रमाणात लस उपलब्ध असूनही लाभार्थी लस घेण्यासाठी तयार होत नसल्याचे समोर आले. परिणामी शासनाकडून मिशन कवचकुंडल, युवांसाठी आणि ‘हर घर दस्तक’ अशा विविध मोहिमा राबवल्या. यास मोठ्या प्रमाणात यश मिळाले असले तरी शंभर टक्के लाभार्थींना लस देता आली नाही. लाभार्थी घरी जाऊनही लस घेण्यास तयार होत नसल्याचे चित्र यातून दिसून आले.
तालुकास्तरावर कॉल सेंटर सुरू
शासनाचा अहवाल प्रसिद्ध होत असताना अनेकांचे लसीकरण झाले आहे. त्यामुळे संख्या कमी-जास्त होऊ शकते. लसीकरण वाढवण्यासाठी तालुकास्तरावर कॉल सेंटर सुरू केलेले आहेत. त्यातून लाभार्थींना दुसरा डोस घेण्यासाठी संपर्क साधला जातो. यात दहापैकी चार जणांनी लस घेतल्याचे कळते. उर्वरित काही जण येतात, काही जण येत नाहीत.लसीकरण करून घेतल्यास संसर्गाची तीव्रता कमी हाेते. तसेच रुग्ण गंभीर होत नाहीत. संसर्ग कमी होण्यासही त्याचा फायदा होतो. - डॉ. कुलदीप मिटकरी, लसीकरण मोहीम अधिकारी.
बदनापूर तालुक्यातील दुधनवाडी येथे लाभार्थींना लस देताना आरोग्य कर्मचारी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.