आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानाबादेत मराठा समाजाचा 19 तारखेला मोर्चा:50 टक्क्यांच्या आत आरक्षणाची मागणी; मोर्चाच्या पार्श्वभूमीवर गावागावात बैठका

शीतलकुमार घोंगडे । कळंब22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मूक मोर्चा,आंदोलने होऊनही मराठा समाजाला शाश्वत आरक्षण मिळालेेले नाही. तसेच शासनाने वारंवार घोषणा करूनही वेगवेगळ्या मागण्या पूर्ण न केल्यामुळे कळंबमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने पुन्हा एकदा आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. येत्या 19 तारखेला कळंब उपविभागीय कार्यालयावर हा मोर्चा निघणार असून, या मोर्चात तालुक्यातील 40 हजारांवर मराठे सहभागी होतील, असे सांगण्यात येत आहे. त्यासाठी गावागावात बैठका घेतल्या जात आहेत.

मराठा समाजाला संविधानिक दृष्ट्या कायद्याच्या चौकटीत टिकणारे मराठा आरक्षण हे "ओबीसी" प्रवर्गातूनच दिले जावे या मागणीसाठी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले असून,यासाठी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत आहे. समाजावर होत असलेला अन्याय, शिक्षण क्षेत्रात होत असलेली मराठा समाजाची पिछेहाट, आरक्षणाच्या संदर्भात असलेल्या कायदेशीर तरतुदी यामुळे नोकरीतले प्रमाण घटत असून,यामुळे समाजातील विद्यार्थी-शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे. त्यांच्यावर आत्महत्येची वेळ येत आहे. समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी 5 वर्षांपूर्वी राज्यातील सकल मराठा समाजाने शांततामय मार्गाने 58 मोर्चे काढले.त्यानंतर ठोक मोर्चेही काढण्यात आले. मात्र अद्यापही आरक्षण मिळाले नाही. कायदेशीर दृष्ट्या मराठा समाजाला केवळ ओबीसी प्रवर्गातून दिलेले आरक्षण टिकू शकते, या मुळ मुद्द्यावर समाजाची एक वाक्यता झाली असून,मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातूनच आरक्षण द्यावे यावर एकमत झाल्याचे संयोजकांनी सांगितले आहे.दरम्यान, या मोर्चाच्या माध्यमातून पुन्हा कळंब तालुक्यात मराठे इतिहास घडविणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

स्वयंसेवकांची तयारी

महामोर्चाच्या अनुषंगाने युध्दपातळीवर तयारी करण्यात येत आहेत. मराठा समाजातील प्रत्येक युवक हातात पडेल ते काम करत आहे. त्यासाठी स्वयंसेवकांची फळी उभारण्यात आली आहे. प्रत्येकजण महामोर्चाचा संदेश गावागावात पोहोचवण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत आहे.त्यामुळे तिसऱ्या टप्प्यातील अंादोलनाचा हा जिल्ह्यातला हा सर्वात मोठा मोर्चा असेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

6 डिसेंबर 2016 नंतर दुसऱ्यांदा दिसणार विक्रमी गर्दी,

कळंब तालुक्याला निजामाच्या काळापासून आंदोलने व चळवळी झालेल्या आहेत. त्यामुळे तालुक्याला चळवळीचा इतिहास आहे. मात्र कळंब तालुक्याच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच ६ डिसेंबर २०१६ ला कळंबच्या इतिहासातील पहिला आणि सर्वात मोठा मराठा समाजाचा महामोर्चा निघाला असल्याचे वयोवृध्द सांगतात. आता दुसऱ्यांदा तेच मराठे दुसरे रेकॉर्ड तयार करतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

शिस्तीत मोर्चा, पण शहर दणाणणार

मराठा मोर्चामध्ये विद्यार्थिनी अग्रभागी असतील. त्यानंतर महिला व त्यानंतर मुले, तरूण, असे नियोजन सुरू आहे. मात्र, सुरूवातीच्या मोर्चाप्रमाणे आता मौन पाळले जाणार नाही तर हक्काच्या मागण्यांसाठी जोरदार घोषणा दिल्या जातील,त्यामुळे शहर दणाणून जाणार आहे.

आता 50 टक्क्यांच्या आत आरक्षणाची मागणी

मराठा समाजाच्या मागणीमध्ये आता प्रमुख बदल झाला आहे. या बदलानुसार मराठा समाजाला ओबीसीमधूनच 50 टक्क्याच्या आत आरक्षण द्यावे, अशी मागणी करण्यात येणार आहे. कायद्याच्या चौकटीत हे आरक्षण असेल. त्यावर मराठा समाजाचा हक्क आहे, असा दावा समाजाकडून केला जात आहे.

स्वखर्चाने प्रचार

गावागावात जनजागृती करण्यासाठी स्वयंसेवकांच्या टीम दररोज दाखल होत आहेत तर ७ वाहनांच्या स्पिकरवरून मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे या संपूर्ण नियोजनासाठी समाजाकडून एकही रूपया न घेता स्वयंसेवकांच्या स्वखर्चातून कार्य सुरू आहे. प्रत्येक घटकाने वेगवेगळी जबाबदारी स्विकारली असून, त्यामुळे रक्कम संकलित करण्यात येणार नाही, असे नियोजन ठरले आहे. कुणी वाहनांची, कुणी डिजीटल होर्डिंग्ज, पाणी, प्रचारसाहित्य आदींची जबाबदारी स्विकारली असल्याचे संयाेजकांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...