आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्चस्व कायम:उस्मानाबाद तालुक्यावर आमदार राणा पाटलांची पकड कायम

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यावर भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची पकड कायम राहिली आहे. असे असले तरी अनेक ठिकाणी भाजपचा गड ढासळला आहे. भाजपकडून तालुक्यातील २३ तर शिवसेनेकडून १८ ग्रामपंचातींवर सत्ता आल्याचा दावा केला आहे. दरम्यान, आमदार राणा पाटील व शिवसेने ठाकरे गटाचे कैलास पाटील यांनी आपल्या अनुक्रमे तेर व सारोळा गावात वर्चस्व कायम राखले आहे.

गतवेळी आमदार राणा पाटील राष्ट्रवादी पक्षात होते तेव्हाही उस्मानाबाद तालुक्यातील ग्रामपंचायतींवर त्यांचाच वरचष्मा राहिला होता. भाजपमध्ये गेल्यानंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये काय होणार याकडे सर्वांचे लक्ष होते. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार २३ ग्रामपंचायतींवर त्यांनी सत्ता मिळवली असल्याचा दावा करण्यात आला आहे. यामध्ये गोपाळवाडी, कोंबडवाडी, अंबेजवळगा, टाकळी (बे.), रुईभर, करजखेडा, तेर, दुधगाव, येडशी, जवळा (दु), इर्ला, पळसवाडी, तोरंबा, खानापूर, मेंढा, देवळाली, बामणी उमरेगव्हाण, कामेगाव, समुद्रवाणी, महाळंगी - पंचगव्हाण, शिंगोली, वरुडा या गावांमध्ये भाजपचा वरचष्मा असल्याचा दावा आमदार पाटील यांनी केला. येडशीच्या उमेदवार डाॅ. सोनिया प्रशांत पवार अपक्ष आहेत. परंतु, त्यांचे पती भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष होते. त्यांनी बंड केले होते. त्यांचे पती प्रशांत पवारही सदस्यपदावर विजयी झाले आहेत

खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी शिवसेन ठाकरे गटाच्या ताब्यात उस्मानाबाद तालुक्यातील १८ ग्रामपंचायती आल्याचा दावा केला आहे. तसेच अन्य घटक पक्षांची युती, आघाडी करून ११ ग्रामपंचायती महाविकास आघाडी म्हणून ताब्यात घेतल्याचेही म्हटले आहे. मात्र, त्यांनी त्यांच्या प्रसिद्धी पत्रकात गावांची नावे नमुद केली नाहीत.

दोघांच्या दाव्यानुसार एकूण निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतींचा आकडा ५२ होतो. वास्तविक पहाता केवळ ४५ गावांमध्ये निवडणूक होती. नेमका कोणता सरपंच कोणत्या गटातील हे काही दिवसातच समोर येईल. तेर येथे राणा पाटील समर्थक सरपंच व अधिक सदस्य निवडूण आले. कैलास पाटील यांनी आपल्या सारोळा गावात निर्विवाद वर्चस्व मिळवले.

भाजपच्या मातबरांना दणका
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व आमदार राणा पाटलांचे समर्थक नेताजी पाटील यांच्या पॅनलला उतमी कायापूर येथे शिवसेना ठाकरे गटाचे प्रशांत बोंदर यांच्या पॅनलने धुळ चारली. तेथे प्रशांत यांच्या पत्नी दिपाली बोंदर निवडूण आल्या.

तसेच त्यांच्या गटाचे ७ पैकी ४ सदस्यही आले. पाडोळीत (आ.) अॅड. व्यंकट गुंड यांच्या पॅनलचा राष्ट्रवादीच्या एकंडे गटाने धुव्वा उडवला. रुईभर येथे जिल्हा परिषद सदस्या राजनंदिनी कोळगे व माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास कोळगे यांच्या भावजयीला पराभवाचा धक्का बसला. तेथे भाजपच्याच भगिरथ लोमटे गटाने बाजी मारली.

बातम्या आणखी आहेत...