आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील बाबा नगर येथील रहिवासी भागात कोणतीही परवानगी न घेता रातोरात १५० फुटांचा मोबाइल नेटवर्क टॉवर उभारण्यात आला आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. हा मोबाइल टॉवर तत्काळ हटवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. हा मोबाइल टॉवर हटवला नाही तर जनआंदोलन उभारण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.
कळंबमध्ये जिजाऊ नगरकडून बाबा नगरकडे जाणाऱ्या मधल्या मार्गावर कृषी उत्पन्न बाजार समितीने वखार महामंडळाला अन्नधान्य साठवण्यासाठी नाममात्र भाड्यावर जागा दिली आहे. मात्र, वखार महामंडळाने कृषी उत्पन्न बाजार समितीची परवानगी घेतली नाही. कायदेशीर तरतूद नसताना एका खासगी कंपनीला मोबाइल टॉवर उभारण्यासाठी भाड्याने जागा दिली आहे. या टॉवर कंपनीने कळंब नगरपरिषदेचीही परवानगी घेतली नाही.
उलट टॉवर उभारल्यानंतर नगरपरिषदेकडे परवानगीचा अर्ज दाखल केला आहे. यासह तेथील नागरिकांचा विरोध असताना या ठिकाणाहून पाच फुटांवर घर असलेल्या ठिकाणी १५० फुटांचा मोबाइल टॉवर उभारला आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी संतप्त भूमिका घेतली आहे. ‘हे लोक आमच्या जीवाशी खेळत आहे. बेकायदेशीररित्या टॉवर उभारला. आठ दिवसात येथील मोबाइल टॉवर हटवला नाही तर आम्ही जनआंदोलन उभारणार, अशी भूमिका येथील डॉ. रमेश जाधवर, डॉ. सचिन पवार व अन्य नागरिकांनी घेतली आहे.
पोटभाड्यातून मुख्य भाड्याच्या रकमेपेक्षा अधिक रक्कम
कृषी उत्पन्न बाजार समितीने वखार महामंडळाला २६०० रुपये नाममात्र प्रति महिना भाड्याने ही जागा दिली आहे. परंतु त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त ९६०० रुपये प्रति महिना वखार महामंडळ संबंधित मोबाइल टॉवर कंपनीकडून आकारणार आहे. अशा पद्धतीने पोटभाडेकरू ठेऊन चौपट भाडे आकारले जाणार आहे.
परवानगी घेतली नाही, कोर्टात जाणार
आमची परवानगी न घेता वखार महामंडळाने बेकायदेशीररित्या मोबाइल टॉवर उभारला आहे. संबंधित अधिकाऱ्याला विचारले असता वखार परिसरात मोबाइलला नेटवर्क येत नाही. त्यामुळे तेथे टॉवर असणे गरजेचे आहे, असे वखारचे वरिष्ठ अधिकारी सांगत आहेत. मात्र, आम्ही या चुकीच्या गोष्टी विरोधात कोर्टात जाणार आहोत.- दत्तात्रय वाघ, सचिव, बाजार समिती, कळंब.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.