आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामृग नक्षत्राच्या हजेरीनंतर अधूनमधून येणाऱ्या पावसाने सोमवारी दुपारनंतर मध्यम स्वरुपात शहरात हजेरी लावली. तसेच जिल्ह्यातील लोहारा आणि नळदुर्ग येथेही सायंकाळी जोरदार हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला असून उकाडाही थोडा कमी झाला. शहरात दुपारी तीन वाजेनंतर सुरु झालेला पाऊस सात वाजेपर्यंत दोन टप्प्यात पडला. दोन्ही वेळी प्रारंभी वाढलेला पाऊस काही वेळानंतर संथ होऊन नंतर कायम तसाच पडत राहिला. त्याच बरोबर हवेचा ही २२ किमी प्रती तास वेग दिसून आला.
त्यामुळे वातावरणात काही प्रमाणात गारवा निर्माण झाला आहे. शहरासह येडशी येथे रिमझिम स्वरुपाचा पाऊस पडला. तसेच तेर मध्येही सायंकाळी पावसाने हजेरी लावली होती. याच बरोबर ईट मध्येही मध्यम स्वरुपाचा पाऊस पडला. लोहाऱ्यात पावसाची दमदार हजेरी : लोहारा शहर व परिसरात सोमवारी सायंकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली. सायंकाळी ५.३० च्या सुमारास जवळपास वीस मिनिटे पाऊस झाला. तर रात्री ७ च्या सुमारास काही काळ मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. यावर्षी पाऊस समाधानकारक व वेळेवर होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता.
त्यामुळे शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होता. परंतु अर्धा जून महिना संपला तरीही तालुक्यात पेरणीयोग्य पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत होते.पाऊस वेळेवर होईल आणि पेरणी करता येईल म्हणून शेतकऱ्यांनी पेरणीपूर्व कामे उरकून घेतली आणि जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी होते. परंतु ८ जून ला झालेल्या पावसा व्यतिरिक्त अद्याप जोरदार पाऊस झाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा पावसाकडे लागून राहिल्या होत्या. अखेर आज त्या भागात जोरदार पाऊस झाला. त्यानंतर विश्रांती घेतलेल्या पावसाने रात्री ७ च्या सुमारास पुन्हा एकदा हजेरी लावली. पावसा दरम्यान विजेचा लपंडाव सुरूच होता. रात्री उशिरापर्यंत कमी जास्त प्रमाणात पाऊस सुरूच होता. सोमवारी पावसाने हजेरी लावल्यामुळे पुढील काही दिवस असाच पाऊस होईल व पेरणी करता येईल अशी आशा शेतकऱ्यांमध्ये आहे.
नळदुर्ग: तासभर वादळी पाऊस
नळदुर्ग शहरात सायंकाळी सहाच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने झोडपले. दिवसभर प्रचंड उष्णता आणि सायंकाळी पावसाने दिलासा मिळाला. यावेळी विजांचा कडकडाट सुरू होता. एक तासापेक्षा जास्त पाऊस झाला. नळदुर्ग परिसरामध्ये गेल्या काही दिवसांपासून दररोज पावसाचे वातावरण तयार होत होते. मात्र पाऊस येत नसल्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य माणूस हवालदिल होऊन पावसाच्या प्रतीक्षेत होता. आजच्या जोरदार पावसामुळे समोर काही दिसत नसल्यामुळे वाहनचालकांना रस्त्यावर वाहन चालविताना लाईट चालू करून मार्ग काढण्याची वेळ आली होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.