आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निसर्गाच्या भरवशावर:कलदेव निंबाळा परिसरात मध्यम पाऊस, उडीद, मूग पेरणीला सुरुवात; तालुक्यात 76 हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचा अंदाज

उमरगाएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

रोहिणी नक्षत्रातील शेवटच्या टप्प्यात व मृग नक्षत्रात शेवटी झालेल्या सरासरी ६६.३६ मिलिमीटर व येणाऱ्या पावसाच्या भरवशावर तालुक्यात काही भागातील शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीला सुरुवात केली आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणीचे साहित्य खरेदी करुन ठेवले आहे. मागील दोन दिवसांपासून आभाळ भरुन येत आहे, मात्र हेवेत विरुन जात असल्याने शेतकऱ्यांची निराशा होत आहे. उमरगा तालुक्यातील पाच मंडळ मृग नक्षत्राचा सरासरी ६६.३६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. वातावरण बदलाने पाऊस येण्याची आशा लागली आहे. कलदेव निंबाळा शिवारातील शेतकऱ्यांनी आर्द्रा नक्षत्रातील पावसाच्या भरवशावर आगोटी पेरणीला सुरुवात केली आहे. तालुक्यात मृग नक्षत्रात पेरणीयोग्य पाऊस झाला नसली तरी येणाऱ्या पावसाच्या भरवशावर काही शेतकऱ्यांनी मूग व उडीद पेरला आहे. या पिकांनी मृग नक्षत्रात पेरणी झाल्यास चांगले उत्पन्न होते.

तालुक्यात पाच मंडळ विभागात केवळ ६६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. यंदा खरीप हंगामातील सर्व क्षेत्रावर पेरणी होणार असल्याने शेतकऱ्यांना येणाऱ्या नक्षत्राकडून मोठी अपेक्षा आहे. खरीप हंगामात पेरणी क्षेत्रापैकी दोन टक्के क्षेत्रावर सद्यस्थितीत सोयाबीन, मूग, उडीद पिकांची आगोटी पेरणी सुरू झाली आहे. ९५ टक्के शेतकऱ्यांनी खते व बियाण्यांची खरेदी केली आहे. यंदा पेरणीच्या ८७ हजार क्षेत्रापैकी ७६,५०० हेक्टर क्षेत्र पेरणीसाठी सज्ज झाले आहे. सोयाबीनच्या अपेक्षित क्षेत्रापेक्षा यंदा वाढ होण्याची शक्यता आहे. १८ हजार हेक्टर तूर, ५ हजार हेक्टर मूग, १० हजार हेक्टर उडीद व ५ हजार हेक्टर सूर्यफूल आणि उर्वरित क्षेत्रावर खरीप ज्वारी, बाजरी, मका, तीळ आदी पिकांनी पेरणी होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तवली आहे. विविध पिकांचे क्षेत्र हे पावसावर अवलंबुन आहे. जून संपत आला तरी अद्याप मृगाचा पाऊस झाला नाही. पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहून झाल्यावर मध्यम स्वरुपाचा पाऊस झाल्याने कलदेव निंबाळा परिसरात सोयाबीन, उड़ीद, मूग आदी पेरणीला शेतकऱ्यांनी सुरुवात केली आहे. ट्रॅक्टरच्या मदतीने पेरणीचे क्षेत्र अधिक आहे.

रोगराई कमी, उत्पन्न अधिक
बहुतांश शेतकऱ्यांनी बियाणे, खते खरेदी करुन ठेवली होती. या भागात पेरणीयोग्य पाऊस झाल्यामुळे पेरणीची लगबग सुरू झाली आहे. मृगाची पेरणी पिकांसाठी महत्वाची असते. सोयाबीन, मूग, उडदाची आगोटी पेरणी झाल्यास रोगराईचे प्रमाण कमी होत उत्पन्नात वाढ होते. त्यामुळे पेरणीला सुरुवात केली. - शंकरराव पवार, शेतकरी.

विशिष्ट खते, बियाण्यांचा आग्रह नको
तालुक्यातील शेतकऱ्यांनी ७५ ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्यावरच बीबीएफ पद्धतीने पेरणी करावी. शेताच्या उताराला आडव्या दिशेने पेरणी करावी. बियाण्यांची बीज प्रक्रिया करावी. विशिष्ट कंपनीचे खत व बियाण्यांचा आग्रह न धरता पेरणी करावी. बियाणे खरेदीची पावती जपून ठेवावी.
- सागर बारवकर, तालुका कृषी अधिकारी.