आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराघरपोच गॅस सिलिंडरसाठी जास्तीचे पैसे मागितले जात असल्याची ओरड भूम शहरातील नागरिकांमधून होत आहे. मात्र, प्रत्यक्षात तक्रारी होत नसल्याचे दिसून येत आहे. नागरिकांनी जागरूक राहून संबंधीत गॅस कंपनीच्या हेल्पलाइनवर तक्रार नोंदवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. भूम तालुक्यात कुऱ्हाडबंदी झाल्याने गॅस वापरणाऱ्या कुटुंबांच्या संख्येत वाढ झाली आहे. शिवाय शासनाकडूनही विविध योजनांच्या माध्यमातून घरोघरी गॅस जोडण्या देण्यात आल्या आहेत. परंतु काही वर्षापूर्वी स्वस्त असलेले सिलिंडर एक हजार रुपयांच्या पुढे गेले आहे.
येथील रत्नमाला इंडेन गॅस एजन्सीला १५ किलोमीटरपर्यंत घरपोच सिलिंडर टाकी १०७७ रुपयांना देणे बंधनकारक आहे. परंतु एजन्सीकडून घरपोच गॅस सिलिंडरसाठी २० रुपये अधिक तर ग्रामीण भागात ५० रुपये अधिक घेतले जात असल्याची ओरड आहे. गॅस सिलिंडर घरपोच देण्यासाठी वाहतुकदाराला एजन्सीकडून देण्यात येतात.परंतु नागरिकांनी अधिकचे पैसे देऊ नये, तक्रार असल्यास इंडेन गॅस कंपनीच्या हेल्पलाइनवर तक्रार करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
तालुक्यात ग्रामीण भागात गॅसचे नियमबाह्य केंद्र सुरू आहेत. या ठिकाणी गॅसचा मोठ्या प्रमाणात साठा केला जात आहे. हे नियमबाह्य गॅस केंद्रचालक अधिकचे पैसे लुटत आहेत. नागरिकांनी याबाबत हेल्पलाइनवर तक्रार दाखल करण्याचे आवाहन प्रशासनाने केले. घरगुती सिलिंडरसाठी १०७७ रुपये मोजावे लागत आहे.
त्यात घरपोचसाठी अधिकचे पैसे ग्राहकांना मोजावे लागत आहे. शहर व ग्रामीण भागात एजन्सी चालकांनी घरपोच सिलिंडरसाठी ग्राहकांकडून अधिक पैसे घेतले जातात, याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे. दरम्यान, रत्नमाला इंडेन गॅस एजन्सीला विचारले असता ‘वितरण कर्मचाऱ्यांना अधिकचे पैसे घेऊ नका’, अशा सूचना केल्या असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, वितरण कर्मचाऱ्यांना पुरेशा पगार नसून काही कर्मचारी पैसे घेतात, असे एका गॅस वितरण कर्मचाऱ्याने सांगितले.
नकार देऊनही पैसे मागतात
आम्ही अधिकचे पैसे देण्यास अनेकदा नकार देतो. परंतु काहीजण पैसे मागतात. सिलिंडर आणण्यासाठीही जाता येत नाही. त्यामुळे अधिकचे पैसे दिले जातात. - एस. ए. हुंबे, गृहिणी.
दुसरा पर्याय दिसत नाही
कामामुळे स्वत सिलिंडर आणणे जमत नाही. घरपोच मागितल्यास ४० रुपये अधिकचे द्यावे लागते. त्याला दुसरा पर्यायही दिसत नाही. - सलिमबी शेख, गृहिणी.
या क्रमांकावर नोंदवा
तक्रार भूम तालुक्यात इंडेन गॅसचे ग्राहक अधिक प्रमाणात आहेत. या ग्राहकांना तक्रार नोंदवण्यासाठी कंपनीकडून १८००२३३३५५५ हा क्रमांक देण्यात आला आहे. रत्नमाला इंडेन गॅस एजन्सी - ०२४७८ -२७२७१७ या क्रमांकावर तक्रार नोंदवला येणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.