आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभरघोष उत्पन्नाचे स्रोत असूनही शेतकरी तुती लागवड करत नाहीत. त्यामुळे प्रशासनाने १० हजार हेक्टरवर तुती लागवडीचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्याप्रमाणे शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्यात येणार आहे. सध्या केवळ ८०० हेक्टरवर लागवड असून ही वाढवण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांनी दिली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, जिल्हा रेशीम विकास अधिकारी ए.व्ही. वाकुरे, वरिष्ठ तांत्रिक सहायक पी. व्ही. इंगळे, तांत्रिक सहायक एस. झेड. बंडगर आदी उपस्थित होते. डॉ. ओंबासे म्हणाले की, जिल्ह्यात तुतीला चांगले पोषण वातावरण आहे. केवळ २१ दिवसात रेशीम उत्पन्न घेता येते. यंदा मोठ्या प्रमाणात तुतीची लागवड शेतकऱ्यांनी करावी यासाठी दि. १ ते १५ नोव्हेंबर दरम्यान ग्रामपंचायतींची निवड करून प्रत्येक दिवशी किमान एक याप्रमाणे ग्रामपंचायतींमध्ये निवडलेल्या टीम मार्फत लागवड कामाबाबत प्रचार व प्रसिद्धी करण्यात येणार आहे.
दि.१४ ते १६ नोव्हेंबर दरम्यान ग्रामपंचायतींमध्ये विशेष ग्रामसभांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच दि. १७ ते १९ नोव्हेंबर दरम्यान ग्रामपंचायतीं मध्ये विशेष कॅम्प लावून शासनाने नेमून दिलेल्या अटी व शर्तीचे पालन करून लाभार्थ्यांची निवड करून यादी तयार करण्यात येणार आहे.दि.२१ ते २३ नोव्हेंबर दरम्यान तुती लागवडीसाठी लाभार्थींचे अर्जाची छाननी करून रेशीम कार्यालयात तांत्रिक मान्यतेसाठी सादर करण्यात येतील. दि.२४ ते २७ नोव्हेंबर दरम्यान तुती लागवड कामासाठी प्रस्तावांना तांत्रिक मान्यता देण्यात येईल व दि.२८ ते ३० नोव्हेंबर दरम्यान लागवड कामांच्या प्रस्तावांना प्रशासकीय मान्यता देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रात्यक्षिकांतून माहिती पत्रकार परिषदेत तुती लागवडी पासून रेशिम उत्पादकापर्यंत माहिती सांगण्यात आली. यावेळी कोष तयार करणाऱ्या अळ्यांची अवस्था, देखभाल याविषयीही माहिती सांगण्यात आली. कोष उत्पादनानंतर त्याची विक्री व प्रत्यक्षात धागा उत्पादनाबाबत माहिती सांगण्यात आली.
फळबागांचेही क्षेत्र वाढणार रोजगार हमी योजनेचे जिल्हा परिषदेतील गटविकास अधिकारी चकोर यांनी फळबाग योजनेची माहिती सांगितली. त्यांनी २२ प्रकारची फळे घेण्याबाबत असलेल्या योजनेबाबत आगामी काळात यासंदर्भातही ग्रामपंचायत स्तरावरही माहिती उपलब्ध ठेवण्यात येणार आहे. ग्राम रोजगार सेवकांना याबाबत निर्देश दिले आहेत, असेही डॉ. सचिन ओंबासे म्हणाले.
रेशीम उद्योगासाठी साडेतीन लाख रुपयांचे अनुदान रेशीम उद्योगासाठी पहिल्या वर्षी अकुशल व कुशल कामगार, कीटक संगोपन साहित्य खरेदी, नर्सरी, जैविके व औषधे खरेदीसाठी दोन लाख १९ हजार ९३० रुपये तर दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी अनुक्रमे ६१ हजार ४८५ रुपये असे तीन वर्षात तीन लाख ४२ हजार ९०० रुपये संबंधित लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जातील. यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन डॉ. सचिन ओंबासे यांनी केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.