आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खून:पैशाच्या हव्यासापोटी लहान भावाचा खून; मृतदेह शेतात पुरून रचला बनाव

मुरूमएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद येथील एकाचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह मुरूम अक्कलकोट रस्त्याच्या लगत एका शेतात पुरल्याची घटना बुधवारी (दि.२२) दुपारी उघडकीस आली होती.या खून प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे.खून करून बनाव रचणाऱ्या मोठ्या भावानेच पैशाच्या हव्यासापोटी लहान भावाचा खून केल्याची माहिती समोर आल्याने खळबळ उडाली आहे.

सिद्धेश्वर मजगे (३३,रा.उस्मानाबाद) गेल्या अनेक दिवसांपासून उस्मानाबाद येथून बेपत्ता झाले होते. याबाबत उस्मानाबादच्या आनंद नगर पोलीस ठाण्यात नातेवाईकांनी तक्रार दाखल केली होती. दरम्यान मुरूम येथे वास्तव्यास असलेल्या सिद्धेश्वर मजगे याचा भाऊ वीरभद्र याने बनाव रचत सिद्धेश्वर याचा खून करून प्रेत मुरूम अक्कलकोट रस्त्यालगत असलेल्या शेतात पाईपाजवळ पुरल्याची माहिती पोलिसांना दिली होती. यावरून मुरूम पोलिसांनी तालुका दंडाधिकारी,ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी,उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांच्या उपस्थितीत पंचासमक्ष मुरूम अक्कलकोट रस्त्यावर असलेल्या गुलाब हंगरगे यांच्या शेतातील पाईप जवळ उकरून पाहिले असता एक प्रेत कुजलेल्या अवस्थेत आढळून आले होते. मृताची ओळख पटल्यानंतर गुन्हा दाखल करत पोलिसांनी तपासाला गती दिली.

उपलब्ध माहितीवरून पोलिसांनी मृताचा भाऊ वीरभद्र मजगे यास ताब्यात घेत चौकशी सुरू केली.दरम्यान पैश्याच्या हव्यासापोटी आपणच लहान भावाचा खून करून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने प्रेत शेतात पुरून बनाव रचल्याची कबुली मृत सिद्धेश्वर याचा मोठा भाऊ वीरभद्र याने पोलिसांना दिली.यावरून वीरभद्र व्यंकट मजगे (३६) व नरेश भालचंद्र हंबीरे दोघेही (रा.मुरूम) या दोघांवर मुरूम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते यांच्या मार्गदर्शनाखाली मुरूम पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ.आर.एम.जगताप व त्यांच्या सहकाऱ्यांना खुनाचा उलगडा करण्यात यश आले असून वरील दोन्ही आरोपींना शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.