आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानाबाद:नरेंद्र मोदी यांचे मुख्यमंत्रिपद शिवसेनाप्रमुखांमुळे वाचले, शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांचा दावा

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना गोध्रा हत्याकांडानंतर उसळलेल्या दंगलीमुळे त्यांचे पद जाण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मोदींना पाठिंबा दिला. यामुळे त्यांचे पद वाचले, असा दावा शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबादला सभा होत आहे. सभेला अधिक गर्दी जमवण्यासाठी संपूर्ण मराठवाड्यातून शिवसैनिक सभेसाठी यावेत याचे नियोजन केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर माजी खासदार खैरे यांनी शुक्रवारी बैठक घेतली त्या वेळी ते बोलत होते. या वेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार तथा जिल्हाप्रमुख कैलास पाटील, संपर्कप्रमुख अनिल खोचरे, उस्मानाबादचे माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांची उपस्थिती होती.

खैरे म्हणाले की, गुजरात दंगलीनंतर शिवसेनाप्रमुखांनी पाठिंबा दिला नसता तर आज मोदी कोठे असले असते. याच भाजपने शिवसेनेला धोका दिला. बैठकीत ठरल्याप्रमाणे भाजपने शिवसेनेला मानाचे स्थान दिले नाही. त्या बैठकीचा मी साक्षीदार आहे. सर्व काही ठरलेले असतानाही सहकार्य करण्यात आले नाही. रावसाहेब दानवे त्या वेळी युतीचे नेते होते. असे असतानाही मला पाडण्यासाठी त्यांनी जावयाला मदत केल्याचा आरोप त्यांनी केला.

मुख्यमंत्रिपदामुळे शांत आहे : मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर आरोप करणारे भाजपचे किरीट सोमय्या यांचा उल्लेख शक्ती कपूर असा करून खैरे म्हणाले, मुख्यमंत्रिपद शिवसेनेकडे आहे म्हणून शांत आहे, अन्यथा सोमय्या यांना त्यांची जागा दाखवली असती. भाजपची बी टीम एमआयएम असून सी टीम भोंगेवाले आहेत. डी टीम राणाची असल्याचेही ते म्हणाले.

‘उपनेते’ असा उल्लेख करताच म्हणाले, ‘नेते’ म्हणा...
सुरुवातीला खासदार राजेनिंबाळकर यांनी भाषणात खैरे यांचा उल्लेख उपनेते म्हणून केला. तेव्हा खैरे यांनी स्वत:हून “नेते म्हणा’ असे सांगितले. तेव्हा राजेनिंबाळकर यांनी पुन्हा शिवसेना नेते म्हणून त्यांचा उल्लेख केला. मात्र, त्या वेळी खैरे यांनी समोर बसलेल्या शिवसैनिकांच्या गर्दीकडे पाहत सूचकपणे भुवया उडवत नाराजी व्यक्त केली.

बातम्या आणखी आहेत...