आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्रीडा वैभव:मागासलेपणाचा शिक्का पुसण्यासाठी उस्मानाबादमध्ये राष्ट्रीय खो-खो स्पर्धा

उस्मानाबाद12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यावरील मागासलेपणाचा शिक्का पुसून येथील क्रीडा वैभव देशाला दाखवण्यासाठी आयोजकांनी उस्मानाबादेत राष्ट्रीय स्तरावरील खो-खो स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेतून सर्व क्रीडा प्रकारातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळून त्यांच्यात वरिष्ठ स्तरावरील स्पर्धा खेळण्याची उर्मी निर्माण होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.

उस्मानाबादेत प्रथमच राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा घेण्यात येत आहे. येथील खेळाडू व आयोजकांच्या मते ही स्पर्धा जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी मैलाचा दगड ठरू शकणार आहे. स्पर्धेच्या तयारीसाठी मागील १५ दिवसांपासून सर्वजण प्रयत्न करताहेत. उस्मानाबाद अनेक बाबतीत मागसलेले असल्याची टिका होते. कमीतकमी खेळाच्या बाबतीत तरी मागासलेपणाचा शिक्का पुसण्यासाठी ही स्पर्धा सहाय्यभूत ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त होत आहे.

उस्मानाबादसारखा जिल्हा इतक्या मोठ्या स्पर्धेचे चोख आयोजन करू शकतो, हे संयोजक यातून दाखवणार आहेत. येथील खो-खो खेळातील राष्ट्रीय, राज्य खेळाडूंचा सत्कार केला जाणार आहे. याच्या माध्यमातून जिल्ह्याचे खो-खोतील योगदानही दिसणार आहे. तसेच जुन्या खेळाडूंच्या नावाने प्रेक्षक गॅलरी उभारण्यात आली आहे. त्यांच्या विविध खेळांतील समर्पणाचे प्रतिबिंब यातून दिसणार आहे. यामध्ये उस्मानाबाद जिल्हा कधीही मागास नव्हता व आताही नाही, हे दाखवण्यासाठी संयोजकांनी उस्मानाबादेत या स्पर्धेचे आयोजन केले आहे. जिल्ह्यातील क्रीडा इतिहास नेहमीच प्रसिद्धीपासून दूर आहेत. त्याचे कायमस्वरूपी संकलनही झालेले नाही. मात्र, या स्पर्धेमुळे जिल्ह्यातील क्रीडा इतिहासाला उजाळा मिळण्यासाठी ही स्पर्धा घेतल्याचे संयोजकांनी सांगितले.

स्पर्धेसाठी अगोदर ठरले बारामती ठिकाण राज्य ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे माजी अध्यक्ष अजित पवार यांनी नियोजनाच्या बैठकीत ही स्पर्धा बारामती येथे घेण्याचे ठरवले होते. भारतीय खो-खो महासंघाचे महासचिव चंद्रजित जाधव यांनी उस्मानाबादसाठी आग्रह करून पवार यांना विनंती केली. त्यानंतर स्पर्धेचे यजमानपद जिल्ह्याला मिळाले. स्पर्धेमुळे जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्राला टॉनिक मिळणार, असा दावा संयाेजकांनी केला.

निवासाची व्यवस्था करताना दमछाक आर्थिक नियोजनासाठी कसरत झाली. स्पर्धेसाठी सर्वाधिक खर्च निवासावर झाला आहे. जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या वसतिगृहाची दुरवस्था आहे. व्यापारी संकुल बांधताना विकासकाला यामध्ये फायदा झाला. मात्र, वसतिगृहाचा काहीही उपयोग खेळाडूंना होऊ शकला नाही. तेथे स्वच्छतागृह तसेच अन्य कोणतीही चांगली व्यवस्था नसल्याची खंत महासचिव प्रा. डॉ. चंद्रजित जाधव यांनी व्यक्त केली.

खेळाडूंना मिळेल प्रोत्साहन जिल्ह्यात सध्या विविध क्रीडा प्रकारात नैपुण्य मिळवण्यासाठी खेळाडू प्रयत्न करत आहेत. काहींनी राज्य व राष्ट्रीय स्तरावर मजल मारली आहे. खो - खो स्पर्धेसाठीही मोठ्या प्रमाणात देशभरातील खेळाडू येणार आहेत. त्यांच्याशी येथील खेळाडूंना चर्चा करता यावी, तसेच नवीन तंत्र, नैपुण्य शिकता येण्यासाठी स्पर्धेचे आयोजन महत्त्वाचे ठरणार आहे. येथील खेळाडूंना प्रोत्साहन मिळण्यासाठीच ही स्पर्धा आयोजित केली असल्याचे आयोजकांनी सांगितले.

जिल्हा क्रीडा कार्यालयाचे काहीही सहकार्य नाही जिल्हा क्रीडा कार्यालयाने फक्त मैदान दिल्याचे प्रा. डॉ. चंद्रजित जाधव यांनी सांगितले. मैदानाची स्वच्छता पालिकेच्या स्वच्छता कामकारांनी केली. क्रीडा विभागाने गवतही काढून दिलेे नाही. आयोजकांनाच व्यवस्था करावी लागली.

खो-खो स्पर्धा सर्व उस्मानाबादकरांची
राष्ट्रीय खो-खो स्पर्धा सर्व उस्मानाबादकरांची आहे. ही यशस्वी करण्याची जबाबदारीही त्यांचीच आहे. सर्वांनी स्पर्धेचा आनंद घ्यावा. उस्मानाबादकर किती चांगल्याप्रकारे स्पर्धेचे आयोजन करू शकतात, हे यातून दाखवायचे आहे. उस्मानाबादचे मागासलेपण पुसण्यासाठी ही स्पर्धा मोठी संधी आहे.
प्रा. डॉ. चंद्रजित जाधव, महासचिव, खो-खो महासंघ.

बातम्या आणखी आहेत...