आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निषेध:महागाई, इंधन दरवाढीविरोधात काँग्रेससह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन; केंद्र सरकारच्या धोरणाचा निषेध

उमरगा4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या निर्देशानुसार महागाई मुक्त भारत अभियानांतर्गत पेट्रोल-डिझेल, गॅस सिलिंडरच्या दरवाढीविरोधात उमरगा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवारी (दि.१) काँग्रेस भवन कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

निवेजनात म्हटले आहे की, केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस व खाद्यतेलाच्या किमती भरमसाठ वाढवल्या आहेत. पेट्रोलने ११३ रुपये लिटरचा टप्पा पार केला असून डिझेल ९२ रुपये लिटर झाले आहे. स्वयंपाकाचा गॅसही एक हजार रुपयांजवळ पोहोचला आहे. या महागाईमुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे. मोदी सरकारने ही दरवाढ मागे घ्यावी, अन्यथा भविष्यात तीव्र आंदोलनाचा इशारा काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष बसवराज पाटील यांनी दिला. दरम्यान पुणे-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर रिकामे गॅस सिलिंडर व दुचाकी रस्त्यावर आडवी करत हार घालून निषेध करण्यात आला. यावेळी घोषणा, टाळ, मृदंग, हलगी, ढोल ताशांच्या आवाजाने परिसर दुमदुमला. यावेळी ॲड. धीरज पाटील, दिलीप भालेराव यांची भाषणे झाली. आंदोलनात युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष शरण पाटील, प्रदेश काँग्रेस सचिव दिलीप भालेराव, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ॲड. धीरज पाटील, उपाध्यक्ष विजयकुमार सोनवणे, तालुकाध्यक्ष ॲड. सुभाष राजोळे, जिप माजी सभापती किसन कांबळे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर पवार, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश आष्टे, विठ्ठल बदोले, विजय वाघमारे, उमरगा जनता बँक उपाध्यक्ष ॲड. व्ही. एस. आळंगे, अनिल सगर, नगरसेवक एम. ओ. पाटील, विक्रम मस्के, महेश माशाळकर, योगेश राठोड, याकुब लदाफ, ॲड. एस. पी. इनामदार, महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष संगीता कडगंचे, काँग्रेस महिला सेवादलाच्या अध्यक्ष संगीता पाटील, पंस सदस्या सुवर्णा भालेराव, युवक काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष तनया कडगंचे, काँग्रेस व युवक काँग्रेसचे शेकडो कार्यकर्ते आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. भालेराव यांनी आभार मानले.

दुचाकी व रिकाम्या सिलिंडरला पुष्पहार
पुणे-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर इंधन व स्वयंपाक गॅसची दरवाढ कमी करण्याच्या मागणीकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रीय महामार्गावर रिकामे सिलिंडर व दुचाकी आडवी टाकून पुषहार घालून निषेध करण्यात आला. तर टाळ, मृदंग, हलगी आणि ढोल ताशाच्या आवाजाने परिसर दणाणून गेला होता. मोदी सरकार विरोधात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. महागाई विरोधात लक्षवेधी फलक, आंदोलनस्थळी उभारण्यात आलेल्या मंडपातील महागाईचा भस्मासूर, पगार कपात, नोकरी, जाण्याची भीती, त्यात सतत पेट्रोल डिझेलची दरवाढ, सर्वसामान्य माणसाने जगायचे कसे तर काय रे बाबा मोदी सरकार, कसला तुमचा खेळ, स्वस्त झाले मरण आणि महागले पेट्रोल आदी फलकांनी नागरिकांचे लक्ष वेधले.

कळंबमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे केक कापून आंदोलन
कळंब । वाढती महागाई व इंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी (दि.१) केक कापून आंदोलन करण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, महागाई व इंधन दरवाढीमुळे सामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. याच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख यांचे आदेशानुसार राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने कळंबमध्ये महागाई व इंधन दरवाढीविरोधात आंदोलन करण्यात आले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक एप्रिल रोजी वाढदिवस असल्यामुळे महागाईच्या विरोधात केक कापण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस तारेख मिर्झा व पदाधिकारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...