आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​शेतकऱ्यांना लाभदायी:नव्याने उभारणार 223 हवामान केंद्र, तापमान, अतिवृष्टी, वादळाची मिळणार अचूक माहिती

उस्मानाबाद5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात नव्याने २२३ हवामान केंद्र उभारण्यात येणार आहे. त्यासाठी गटविकास अधिकाऱ्यांकडून ग्रामपंचायतींची यादी मागवली. उमरगा तालुक्यातून ४० गावांची यादी मिळाली. या केंद्रांमुळे अतिवृष्टी, वादळ आणि कमी-जास्त तापमानाची माहिती अधिक अचूक मिळेल. परिणामी शेतकऱ्यांना नुकसानीचा अधिक लाभ मिळू शकेल. सध्या जिल्ह्यात पावसासह तापमानाच्या नोंदीसाठी केवळ ४२ हवामान केंद्र आहेत. त्यामुळे अनेक गावात जास्त पाऊस पडूनही नोंद होत नव्हती. नव्याने होणाऱ्या हवामान केंद्रांमुळे शेतकऱ्यांना अधिक लाभ होईल.

यंदा मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन त्याची योग्य नोंद होत नसल्याने शेतकऱ्यांना पीकविमा आणि नुकसान भरपाई मिळण्यास अडचणी येत आहेत. होणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले. दुसरीकडे नुकसान भरपाई मिळण्यासाठी अवश्यक असलेल्या शासकीय नोंदी कमी असल्याने नुकसान होऊनही विमा आणि भरपाई त्या प्रमाणात मिळाली नाही. मात्र, अाता नव्याने होणाऱ्या हवामान केंद्रामुळे पावसाची आणि सर्वच तापमानाची माहिती अद्ययावत मिळणार आहे. त्याचा लाभ शासनासह शेतकऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात होणार आहे. नव्याने होणाऱ्या २२३ केंद्रांसाठी कृषी आयुक्तालयातून कृषी विभाग आणि जिल्हा परिषदेला पत्र पाठवण्यात आले आहेत. तसेच स्वयंचलित केंद्रांसाठी जागा मिळण्यासाठी ग्रामपंचायतींकडून माहिती मागवण्यात आली आहे.

त्यानुसार जिल्हा परिषदेकडून गटविकास अधिकारी आणि त्यांच्याकडून ग्रामपंचायत स्तरावरुन माहिती मागवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. आगामी दोन दिवसात ही माहिती जिल्हा परिषदेला मिळणार आहे. त्यानंतरही पूर्ण अहवाल पुणे येथील कृषी आयुक्तालयात माहिती पाठवून देण्यात येणार आहे. त्यामुळे आगामी काळात म्हणजे काही महिन्यातच ही केंद्र उभारली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

जिल्हाभरात होणार २६५ हवामान केंद्र जिल्ह्यात एकूण ६२२ ग्रामपंचायती आहेत. गावांची संख्या ७३५ असून आठ शहर आहेत. तसेच क्षेत्रफळ ७.५१२४ हजार चौरस किमी आहे. इतक्या मोठ्या क्षेत्रातील पाऊस मोजण्यासाठी केवळ ४२ हवामान केंद्र होती. नव्याने होणाऱ्या केंद्रांमुळे आता जिल्ह्यात तब्बल २६५ हवामान केंद्र होणार आहेत. परिणामी शासन, प्रशासन आणि शेतकऱ्यांना अधिक स्पष्ट माहिती मिळू शकेल.

स्वयंचलित असणार ही हवामान केंद्र नव्याने उभारण्यात येणाऱ्या हवामान केंद्रात सर्व नोंदी या स्वयंचलित असणार आहे. त्यात वाऱ्याचा वेग आणि दिशा याची माहिती मिळणार आहे. त्याचबरोबर तापमान आणि हवेतील आर्द्रता यासह पर्ज्यन्यमानाची नोंदही होणार आहे. एकाच ठिकाणी सर्व माहिती मिळेल. तसेच हे सर्व यंत्र एकमेकांना जोडलेले असणार आहे. त्यामुळे सर्व जिल्ह्याची माहिती एकत्र मिळू शकणार आहे.

बातम्या आणखी आहेत...