आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सशुल्क दर्शनाचा फायदा:तुळजाभवानी मंदिराच्या उत्पन्नात अडीच महिन्यांत नऊ कोटींची भर

प्रदीप अमृतराव | तुळजापूर2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उन्हाळी सुट्या आणि लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर १ एप्रिल ते १८ जून या केवळ अडीच महिन्यांच्या कालावधीत तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या उत्पन्नात तब्बल ९ कोटींची भर पडली आहे. कोरोनानंतर भाविकांची वाढलेली प्रचंड गर्दी आणि मंदिर संस्थानच्या वतीने भाविकांना सुलभ दर्शनासाठी करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळेच मंदिर संस्थानच्या उत्पन्नात मोठी वाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २०२० आणि २०२१ या दोन वर्षांत बहुतांश कालावधीत तुळजाभवानी मंदिर भाविकांसाठी बंद केले होते. या कालावधीत भाविकांना तुळजाभवानी मातेच्या दर्शनापासून वंचित राहावे लागले होते. मात्र, कोरोनाची दुसरी लाट ओसरताच गेल्या वर्षी घटस्थापनेच्या मुहूर्तावर ७ ऑक्टोबर २०२१ रोजी राज्यातील धार्मिक स्थळे खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर मंदिर उघडताच भाविकांनी तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी केली.

भाविकांच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाने जागोजागी पिण्याचे थंड पाणी, त्यासाठी आरओ प्लँट, थंड हवेसाठी जागोजागी एअर कूलर, फॅन आदी सुविधा भाविकांच्या सहकार्याने व देणगीतून उपलब्ध करून दिल्या. यासाठी मंदिर संस्थानचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, व्यवस्थापक तहसीलदार योगिता कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन धार्मिक व्यवस्थापक तथा मंदिराचे जनसंपर्क अधिकारी नागेश शितोळे आणि मंदिरच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेतला. दरम्यान, व्हीआयपीच्या नावाखाली थेट दर्शनाचा फुकट लाभ घेणाऱ्या धनदांडग्यांसाठी व्हीआयपी “स्पेशल पास’ पास सुरू करण्यासारखे धाडसी निर्णय जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी घेतले. याशिवाय भाविकांना सुलभ दर्शनासह इतर सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने भाविकांच्या संख्येत वाढ झाली.

सोयी-सुविधांमध्ये वाढ केल्याने भाविकांच्या संख्येत झाली वाढ जेजुरीच्या धर्तीवर विकास करणार अधिकाधिक सुविधा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे भाविकांतून समाधान व्यक्त होत आहे. त्यातून देवीच्या तिजोरीत देणगी वाढत आहे. जेजुरीच्या धर्तीवर मंदिराचा विकास करण्यात येईल. त्यासाठी पुरातत्त्व खात्याची मदत घेत आहोत. तसेच दिव्यांग, वयोवृद्धांच्या सुलभ दर्शनासाठी विशेष सोय करू. देवीच्या मूर्तीची झीज होऊ नये यासाठी काळजी घेतली जाईल. -कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, मंदिर संस्थान.

गतवर्षीच्या तुलनेत जास्त उत्पन्न : विशेष म्हणजे ३१ मार्च २०२२ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात तुळजाभवानी मंदिर संस्थानला २० कोटी उत्पन्न प्राप्त झाले होते. म्हणजेच गतवर्षीच्या तुलनेत फक्त अडीच महिन्यांत मंदिर संस्थानला जवळपास ५०% उत्पन्न प्राप्त झाले. सशुल्क दर्शनाद्वारे मिळालेले उत्पन्न - ४ कोटी ५६ लाख - सशुल्क दर्शनाच्या माध्यमातून उत्पन्न. - ३ कोटी ३२ लाख - दान पेटीतून प्राप्त उत्पन्न. - ९ कोटी ४ लाख २३ हजार ५०७ - १ एप्रिल ते १८ जून या कालावधीत मंदिर संस्थानचे उत्पन्न. - १९ कोटी ९८ लाख ५० हजार २७२ - १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या उत्पन्नात भर.

बातम्या आणखी आहेत...