आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प:उस्मानाबाद, बीड जिल्ह्यांतील नऊ तालुक्यांना 2023 पर्यंत पाणी मिळणार - जलसंपदामंत्री जयंत पाटील

उस्मानाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • जिल्हाधिकारी कार्यालयात पाटबंधारे विभागाच्या कामकाजाचा आढावा घेताना जलसंपदामंत्री जयंत पाटील.

कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पातील पाणी उस्मानाबाद जिल्ह्यातील आठ तालुक्यांसह बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यास २०२३ पर्यंत पाणी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी माहिती राज्याचे जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील पाटबंधारे विभागाच्या कामकाज आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार विक्रम काळे, सुरेश धस, ज्ञानराज चौगुले, कैलास पाटील, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक के. बी. कुलकर्णी, मुख्य अभियंता दिलीप पवार, अधीक्षक अभियंता भारत शिंगाडे, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, कार्यकारी अभियंता के. ई. घुगे, कार्यकारी अभियंता प्रवीण चावरे आदी उपस्थित होते.

जयंत पाटील म्हणाले की, या सिंचन प्रकल्पासाठी पुढील दोन वर्षांत लागणाऱ्या निधीचे सूक्ष्म नियोजन करा. त्याप्रमाणे आर्थिक नियोजन करून निधी उपलब्ध करून देण्यात येईल, ज्या अडचणी आहेत त्या मला वारंवार सांगा, त्या सर्व अडचणी मी सोडवेल. त्यासाठी अधीक्षक अभियंत्यानी मंत्रालयात येऊन सातत्याने माझ्या संपर्कात राहून या प्रकल्पाशी संबंधित कामे मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करावा, असे निर्देशही मंत्री पाटील यांनी या वेळी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

दरम्यान, कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत १५ फेब्रुवारी २०२१ रोजी दुसऱ्या टप्प्यातील कामे सुरू करण्यास मान्यता दिल्याचे सांगून जलसंपदामंत्री पाटील म्हणाले की, बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यास उपसा सिंचन प्रकल्प तीनमध्ये १.६८ टीएमसी पाणी उपलब्ध होणार आहे. यातून आष्टी तालुक्यातील ८१४७ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे.

खासदारांनी मानले अाभार
जलसंपदामंत्री पाटील यांनी कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या कामाला प्राधान्य देऊन या कामास गती दिल्याबद्दल खा. ओमराजे निंबाळकर यांनी उस्मानाबादकरांच्या वतीने त्यांचे या वेळी पुष्पगुच्छ देऊन आभार मानले.

अामदारांनी केली प्रलंबित कामे पूर्ण करण्याची मागणी
दुधाळवाडी आणि कळंब तालुक्यातील या प्रकल्पातील प्रलंबित कामे प्राधान्याने पूर्ण करण्याची विनंती आमदार कैलास पाटील यांनी केली. त्यावर मंत्री पाटील यांनी या कामासाठी या वर्षी व पुढील वर्षी किती निधी लागेल यांचे नियोजन जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी करून द्यावे, त्यांचे आर्थिक नियोजन करू, असे आश्वासनही दिले. तसेच लोहारा आणि उमरगा तालुक्यातील या योजनेतील कामांना प्राधान्य देण्याची मागणी आमदार चौगुले यांनी केली. त्या वेळी याही कामांना प्राधान्य द्यावे, असेही आदेश मंत्री पाटील यांनी या वेळी दिले.

बातम्या आणखी आहेत...