आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थ्यांचे ‘टाइम टेबल’:आता ‘म’ मोबाइलचा नाही तर मराठीचा, ‘ट’ टीव्हीचा नाही तर ट्युनिंगचा; खेळासोबतच अभ्यासाचाही आनंद

नितीन फलटणकर | जकेकूरवाडी, (उमरगा, जि. उस्मानाबाद)2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जिद्दीने परिवर्तन। उस्मानाबादच्या जकेकूरवाडीची कथा, महिनाभरापूर्वीच्या निर्णयाने बदललं मुलांचं आयुष्य

संध्याकाळचे ६ वाजले तसा अचानक गावात सायरन वाजू लागला. घराबाहेर खेळणारी मुलं वेगाने घराकडे पळू लागली. पालकही आपापल्या मुलांना शोधण्यासाठी घराबाहेर पडले. गावात एकच पळापळ सुरू झाली.

जणू युद्धजन्य परिस्थिती. कोरोनानंतर खरंच अशी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्याने उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील जकेकूरवाडी ग्रामस्थांना एक महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागला. ही पळापळ याच निर्णयामुळे होती. या निर्णयानंतर गावातील मुलांचे खेळासोबतच अभ्यासाचेही ‘टाइम टेबल’ फिक्स झाले आहेत. आता या मुलांसाठी ‘म’ मोबाइलचा नाही तर तो मराठीचा झालाय. ‘ट’ हा टीव्हीचा उरला नाही तो आता पालकांशी वाढलेल्या संवादानंतर ‘ट्युनिंग’चा झालाय.

उमरग्यापासून १० किलोमीटर अंतरावर जकेकूरवाडी हे ३३० उंबऱ्यांचे गाव. लोकसंख्या २२०० च्या जवळपास. त्यात मुलं आणि तरुणांचा भरणा अधिक. गावात ४५० ते ५०० च्या जवळपास मुलं. कोरोनाकाळात मोबाइलचे प्रस्थ वाढले. मुलं त्याच्या आहारी गेली. २४ तास हातात फक्त मोबाइलच. अभ्यासच विसरली होती. विद्यार्थ्यांचे ‘टाइम टेबल’ : आता ‘म’ मोबाइलचा नाही तर मराठीचा, ‘ट’ टीव्हीचा नाही तर ट्युनिंगचा; खेळासोबतच अभ्यासाचाही आनंद सोशल साइटवर सर्फिंग, त्यावरून गावात वाद. मुलं काहीच अभ्यास करत नसल्याने पालक हैराण. यावर तोडगा शोधला गावच्या सरपंचांनी. अमर सूर्यवंशी. जेमतेम ३५ तला सरपंच. गावातच लहानाचा मोठा झालेला. घरचा व्यवसाय. एमए, बीएडपर्यंतच शिक्षण. पण गावाची अवस्था त्याला अस्वस्थ करत होती. मग सरपंचांनी एक युक्ती लढवली. गावात दररोज संध्याकाळी ६ ते रात्री ८ हे दोन तास मोबाइल अन् टीव्ही बंद. गावकऱ्यांना एकत्रित केले. संकल्पना सांगितली. गावकऱ्यांना ती आवडली. नोव्हेंबर महिन्यात झालेल्या ग्रामसभेत एकमताने तसा ठराव मंजूर झाला अन् रोज गाव दोन तास ‘नो मोबाइल अन् नो टीव्ही अवर्स’ पाळते. यातून मुलांमध्ये अभ्यासाची गोडी तर वाढलीच आहे, शिवाय पालक आणि मुलांमध्ये संवादही वाढला आहे.

मुलांना अन् पालकांना आठवण करून देण्यासाठी रोज संध्याकाळी ६ वाजता ग्रामपंचायत कार्यालयातून सायरन वाजवला जातो. त्या लगोलग सर्व मुले आणि पालक टीव्ही आणि मोबाइल बंद करतात. मुले गृहपाठाला लागतात. पालक त्यांचा अभ्यास घेतात. मुलांच्या हातातून मोबाइल काढण्यासाठी यापेक्षा नामी युक्ती काहीच सुचली नाही. एक पिढी वाचवण्यासाठी हे करावं लागलं, असं सरपंच सांगतात.

३० पर्यंतचे पाढे पाठ, आता IAS ची स्वप्नं
सायरन वाजला की कधी एकदा घरी जाऊन अभ्यासाला बसतो असं होतं. आधी वाटायचं खूप खेळायला मिळावं. आता वाटतं अभ्यासातही मजा आहे. दोन तास अभ्यास केला तर काय बिघडतं, असं ही मुलं सांगतात. त्यांना आता आयएएसची तयारी करायचीय.

गुटखा विकाल तर ५ हजार, खाल्ला तर ५०० रुपये दंड
गावात व्यसन वाढत होतं. टपऱ्यांवर मुलंही दिसायला लागली. यावर उपाय म्हणून गावकऱ्यांनी गावातील टपऱ्याच हटवल्या. सरपंचांच्या संकल्पनेतून गाव पानटपरीमुक्त केलं. गुटखा, सुपारी विकेल त्याला ५ हजारांचा आणि कुणी खाताना दिसलं तर ५०० रुपयांचा दंड लावला जातो. कुणाकडे पाहुणे येणार असतील तर त्यांनाही आधीच पुड्या-काड्या बाहेर फेकून या, असं सांगितलं जातं.

निर्णयाचं सार्थक झालं
गावात लोकसहभागातून अनेक बदल करतोय. आता मुलांसाठी वाचनालयही उभं राहतंय.'
- अमर सूर्यवंशी, सरपंच

मुलांमध्ये अभ्यासाची ओढ वाढली. मुलं अभ्यासाला लागलीत.' - दत्तात्रय सूर्यवंशी, पालक

आता मुलं सांगतात, काल रात्री दोन तासांत काय अभ्यास केला ते.' - रघुवीर अर्णे, शिक्षक, झेडपी

बातम्या आणखी आहेत...