आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा"आता कमी करा टेन्शन, देऊन टाका पेन्शन, नाहीतर जवळ आलेय इलेक्शन'', "शिक्षक, पदवीधर मतदारसंघ झांकी है, २०२४ अभी बाकी है'', अशा घोषणातून सरकारला इशारा देत जिल्हाभरातील कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. मंगळवारी (दि.१४) शहरात काढलेला मोर्चा आतापर्यंतचा शासकीय कर्मचाऱ्यांचा सर्वात मोठा मोर्चा ठरला. आयोजकांनी केलेल्या दाव्यानुसार जिल्हाभरातून मोर्चात सुमारे १५ हजार महिला, पुरूष कर्मचारी, शिक्षक सहभागी झाले. मोर्चात कर्मचाऱ्यांच्या जवळपास ४२ संघटना सहभागी झाल्या. जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसह अन्य मागण्यांसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाची हाक दिली आहे. याला जिल्ह्यात जोरदार प्रतिसाद मिळाला.
आंदोलनाची सुरुवात जोरदार मोर्चा काढून केली. श्री तुळजाभवानी क्रीडा संकुलापासून मोर्चाला सुरुवात झाली. मोर्चाला इतकी गर्दी होती की, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पोहोचल्यानंतरही स्टेडियममधून मोर्चेकऱ्यांच्या रांगा बाहेर पडत होत्या. सर्व आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे संथ गतीने सरकत होते. स्टेडियमपासून तेथे पोहचण्यासाठी आंदोलकांना दीड तासांचा अवधी लागला. मोर्चेकऱ्यांनी राज्य व केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली. जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आल्यानंतर मोर्चाचे सभेत रुपांतर झाले. मोर्चात आरोग्य, महसूल, जिल्हा परिषद, शिक्षण, बांधकाम, राज्य शासकीय कर्मचारी, जलसंपदा, अंगणवाडी, उमेद, भूमी अभिलेख आदींसह सर्व विविध विभागातील कर्मचारी सहभागी झाले. भाजपला थेट इशारा : शिक्षक व पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत भाजप आघाडीच्या उमेदवारांना पराभव पत्करावा लागला. आगामी २०२४ मध्ये पराभव टाळायचा असेल तर जुनी पेन्शन लागू करा, अशा इशारा वक्त्यांकडून देण्यात येत होता. मोर्चानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झालेल्या सभेत भाषण करणाऱ्या अनेक पदाधिकाऱ्यांचा रोख २०२४ च्या निवडणुकांवरच होता. जुन्या पेन्शनसाठी पहिल्यांदाच एल्गार आतापर्यंत जुन्या पेन्शनसाठी कोणत्याही संघटनेने इतक्या गांभीर्याने आंदोलन केले नाही.
उलट जुनी पेन्शन संघर्ष समितीच्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन अन्य मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. अन्य मागण्या पदरात पाडून घेतल्यावर जुन्या पेन्शनच्या मागणीचा प्रत्येक आंदोलनात विसरच पडत गेला. परंतु, यावेळी जुन्या पेन्शनची योजना प्राधान्याने पुढे करण्यात येत आहे.शासकीय कार्यालयामध्ये केवळ अधिकारीच शासकीय कार्यालयामध्ये केवळ अधिकारीच होते. वर्ग दोन, तीन व चारचे सर्व कर्मचारी संपात सहभागी झाल्याने कार्यालयीन कामकाज ठप्प झाले. ग्रामीण भागातील नागरिकांना मोर्चाची माहिती असल्यामुळे पहिल्या दिवशी काही ताण पडला नाही. मात्र, तहसील कार्यालयात विविध महसुली प्रकरणांच्या सुनावण्या झाल्या नाहीत.
याचा शेतकऱ्यांना मात्र, विनाकारण भुर्दंड बसला.शिक्षकांमध्ये पहिल्याच दिवशी फूट मोर्चात अनेक शिक्षक नेते सहभागी झाले होते. यातील अनेक नेत्यांनी जोषात भाषण ठोकत सर्व शिक्षक संपात सहभागी झाल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, १२ वीची परीक्षा सर्व २० केंद्रांवर सुरळीत पार पडली. यामध्ये ६६ पर्यवेक्षक, २० रनर, २० केंद्रप्रमुख तसेच १० मुख्य पर्यवेक्षक केंद्रावर हजर होते.
संबळाच्या तालावर धरला ठेका
मोर्चात अनेक कर्मचारी हलगी, संबळ घेऊन पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले. कर्मचाऱ्यांनीही हलगीच्या तालावर ठेका धरला. अनेक कर्मचारी व कर्मचारी संघटनेचे पदाधिकारीही हलगीच्या तालावर नृत्य करत होते. शासकीय कार्यालयात रूक्षपणे काम करणाऱ्या अनेक कर्मचाऱ्यांनी मोर्चामध्ये नृत्याचा आनंद लुटला.
नर्स, डॉक्टरांचा संप, रुग्णांची गैरसोय
जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसह नर्स, डॉक्टर संपात सहभागी झाल्यामुळे उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांची गैरसोय झाली. त्वचारोग तज्ञासह इतर डॉक्टर दालनात नसल्याने अनेक रुग्णांना उपचार मिळाले नाहीत. केस पेपर काढण्याच्या ठिकाणी कोणीच नव्हते. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांनी संताप व्यक्त केला. अनेक रुग्णांनी डॉक्टर कधी येणार याबाबत कर्मचाऱ्यांना विचारणा केली. मात्र, संप असल्याने येथे कोणीच नसल्याचे सांगितले. तसेच आयुर्वेदिक महाविद्यालयातील कर्मचारीही संपात सहभागी झाले. मात्र, रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी तेथील काही डॉक्टरांनी स्वत: प्रिस्क्रिप्शन देऊन रुग्णांना औषध गोळ्या दिल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.