आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धाराशिव कारखान्यावर IT ची धाड:पहाटे 5:30 पासून 12 अधिकारी करत आहेत चौकशी, राज्यात इतर ठिकाणीही कारवाईची शक्यता

उस्मानाबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद जिल्ह्यातील धाराशिव साखर कारखान्यावर आयकर विभागाची धाड पडली आहे. गुरूवारी पहाटेच्या सुमारास ही धाड पडली. अभिजीत पाटील हे या कारखान्याचे अध्यक्ष आहेत. पंढरपुरच्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचेही ते अध्यक्ष आहेत. या कारवाईची सध्या उस्मानाबाद जिल्ह्यात मोठी चर्चा होत आहे.

अशी पडली धाड, वाचा घटनाक्रम

दिव्य मराठीला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहाटे साडेपाच ते सहाच्या सुमारास दोन कारमधून काही अधिकारी कारखान्याच्या परिसरात आले. हिंदीतून बोलणाऱ्या या अधिकाऱ्यांनी अकाऊंट विभागात चौकशीला सुरूवात केली. कारखान्याच्या परिसरात येणाऱ्या वाहनांविषयीही ते कसून चौकशी करत होते. कारखान्याच्या परिसरात एक स्कूल बस आली असता या बसच्या पाठिमागेही त्यांनी आपली कार पाठवली. या अधिकाऱ्यांनी सर्व रजिस्टर मागवले असून प्रत्येक नोंदीची ते बारकाईने चौकशी करत आहेत.

चार दिवस ठाण मांडणार
सूत्रांच्या माहितीनुसार, हे अधिकारी चार दिवस इथे ठाण मांडून असणार आहेत. चार दिवस आम्ही कुठेही जाणार नाही असे ते म्हणाल्याचे सूत्रांनी सांगितले. महत्त्वाच्या कर्मचाऱ्यांना त्यांनी आतच ठेवले असून कुणी लघूशंकेला गेले तरी एक अधिकारी त्यांच्यासोबत असतो असे सूत्र म्हणाले.

एकूण बारा अधिकारी
दोन कारमधून एकूण बारा कर्मचारी आल्याचीही माहिती सूत्रांनी दिली. हे अधिकारी प्रत्येक गोष्टीची अतिशय बारकाईने आणि कसून चौकशी करत आहेत.

अभिजीत पाटलांचा फोन बंद

आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकताच सर्व कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचे फोन बंद केले. दिव्य मराठीने अभिजीत पाटील यांच्याशी संपर्क साधून त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला परंतु, त्यांचा फोन देखील बंद आहे.

इतर कारखान्यांवरही कारवाई
अभिजीत पाटील यांच्याकडे एकूण 5 कारखाने आहेत. धाराशिव कारखान्यासह पंढरपूर, उस्मानाबादेतील त्यांच्या इतर कारखान्यांवरही कारवाई सुरू असल्याचे समजते आहे.

साखर सम्राट अशी ओळख
अभिजीत पाटील हे पंढरपुरातील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष असून साखर सम्राट अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीच्या भालके गटावर मात देत 21 पैकी 20 जागा जिंकल्या होत्या. त्यांच्याकडे एकूण 5 कारखाने आहेत.

बातम्या आणखी आहेत...