आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उमरगा बाजारपेठ:ज्येष्ठा गौरी सणानिमित्त बाजारपेठ फुलली, फराळ साहित्य खरेदीसाठी गर्दी

उमरगाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ज्येष्ठा गौरी सणानिमित्त बाजारामध्ये विविध वस्तूंच्या मागणीमध्ये वाढ झाली असून फराळाच्या पदार्थांच्या खरेदीसाठी महिलांनी गर्दी केली. यासोबतच आरास करण्यासाठीच्याही वस्तूंची खरेदी मोठ्या प्रमाणात करण्यात आली.

गौरीचे आगमन शनिवारी झाले आहे. आगमनाच्या दिवशी शुभ मुहूर्त पाहून मुखवट्यांची आणि लक्ष्मींच्या हातांची पूजा करण्यात आली . शनिवारी रात्री गौरी उभ्या केल्या. गौरी किंवा महालक्ष्मी व त्यांची मुले पिलवंड म्हणून उभा केली जातात. काही ठिकाणी धातूच्या लक्ष्मीचे पूजन केले जाते. काही ठिकाणी मातीची लक्ष्मी बनवितात तर काही जण धान्याच्या राशीवर पितळी तांब्याच्या गौरी बसवितात. गौरींच्या समोर सजावट केली जाते. वेगवेगळ्या खेळणी, फुलांची सजावट, हार, प्लास्टिकच्या फुलांच्या माळा, मोत्यांचा हार, थर्माकोल, नक्षीकाम केलेले मखर, पाट, चौरंग यांची रेलचेल पाहायला मिळते. गौरीच्या समोर फराळाचे पदार्थ नैवेद्य म्हणून ठेवले जातात .

घरात फराळ बनविण्यासाठी दोन तीन दिवस लागतात म्हणून अनेक जण बाजारातून विकत फराळाचे पदार्थ घेऊन आले. उमरगा शहरातील छत्रपती शिवाजी चौकातील मुख्य बाजारपेठेत फराळाच्या दुकानांचे स्टॉल लावण्यात आले आहेत. यामध्ये डिंकलाडू, जिलेबी, बुंदीचे लाडू, करंज्या, चकल्या, चिवडा, शेव, बालुशाही, शंकरपाळे, म्हैसूरपाक, अनारसे असे विविध फराळाचे पदार्थ विक्रीसाठी ठेवले होते. याची मोठी विक्री झाली.

१६० रुपये दर
विविध रंगाची जिलेबी, करंज्या ग्राहकांचे लक्ष वेधून घेत होत्या. लाडू व अन्य गोडपदार्थ १६० रुपये किलोने विकले. अनारसे २८० रुपये किलोने विकले जात आहेत. वाढत्या महागाईमुळे मोजकेच फराळाचे पदार्थ नेऊन सण साजरा करण्यावर गृहीणींचा भर आहे.

सर्वच साहित्याच्या किमतीत वाढ
महागाई वाढल्यामुळे फराळाच्या पदार्थाची मोजकीच विक्री होत आहे . ग्राहक मोजकेच पदार्थ घेताहेत. तेल, बेसण आदीत दरवाढीमुळे फराळाच्या पदार्थांची किंमत वाढवावी लागली. याचा विक्रीवर परिणामझाला आहे . -रब्बानी सय्यद, विक्रेता.

तयार फराळावर भर
यंदा गौराईचा सण उत्साहाने करत आहोत. परंतू, महागाई वाढल्याने घरी पदार्थ बनवण्यापेक्षा मोजकेच पण तयार फराळाचे पदार्थ घेवून जावे लागत आहे. -शीतल जाधव, गृहिणी, उमरगा.

बातम्या आणखी आहेत...