आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उदासीनता:कांदा चाळीला खर्च 2 लाख, अनुदान 87 हजार, तरीही वेळेत अनुदान नाही; ईटसह परिसरातील शेतकऱ्यांनी योजनेतून उभारल्या कांदा चाळी

ईट10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्य शासनाच्या कांदा चाळ योजनेतून ईटसह परिसरातील शेतकऱ्यांनी कांदा चाळी उभ्या केल्या. यासाठी साधारणत: दोन लाखांपेक्षा अधिक खर्च येतो. परंतु त्याकरिता मिळणारे अनुदान केवळ ८७ हजार ५०० रुपये आहे. कांदा चाळ पूर्ण करून दोन महिन्यांचा कालावधी लोटला तरीही अनुदान मिळाले नाही, त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. शासनाकडून अनुदानावर आधारित अनेक योजना राबविल्या जातात. यातून लाभ मिळवण्यासाठी लाभार्थ्यांना अगोदर स्वत: पूर्ण खर्च करावा लागतो, त्यानंतर अनुदान दिले जाते. यामुळे बरेच शेतकरी अशा योजनांच्या लाभापासून दूर राहणे पसंत करतात. जे शेतकरी या योजनेत सहभागी होऊन उसनवारी किंवा कर्ज काढून काम पूर्ण करून घेतात, त्यांना काम पूर्ण झाल्यावरही अनुदानाच्या रकमेकरिता दीर्घ प्रतीक्षा करावी लागते.

अशीच परिस्थिती सध्या कांदा चाळीच्या लाभार्थींची झाली आहे. ईटसह परिसरातील पखरूड, डोकेवाडी, गिरवली, आंद्रुड, नागेवाडी, लांजेश्वर आदी गावातील शेतकरयांनी उसनवारीवर कांदा चाळी पूर्ण केल्या. आता कांदाचाळ पूर्ण होऊन दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लोटला आहे. परंतु अनुदान मिळाले नाही. कृषी विभागाकडून मार्च अखेरपर्यंत अनुदान मिळेल, असे आश्वासन मिळाले होते. आता मे महिना सुरू झाला तरी अनुदानाचा पत्ता नाही. कृषी विभाग केवळ योजना थोपवण्याचे काम करून कागद काळे करतो. पण, शेतकरी मात्र अनुदानाअभावी कंगाल होत असल्याची त्यांना जाणीव नाही, असा आरोप शेतकरी करत आहेत. त्यामुळे तातडीने अनुदान बँक खात्यात जमा करण्याची मागणी होत आहे.

महागाईमुळे बांधकाम खर्चही वाढला
राज्य शासनाने कृषी विभागाच्या माध्यमातून विदर्भात कांदा चाळ योजना मोठ्या प्रमाणात राबवली. या योजनेतून १५ बाय ४० चौरस फूट कांदा चाळ बांधण्यासाठी १ लाख ६० हजार रुपये खर्च येईल. त्यापैकी ८७ हजार ५०० रुपये अनुदान मिळेल, असे सांगण्यात आले होते. पण, वाढत्या महागाईमुळे स्टील, सिमेंट, वाळू, गिट्टी व मजुरी वाढल्याने कांदाचाळीचा खर्च दोन लाखाच्यावर गेला. इतकेच नाही तर कांदाचाळ पूर्ण झाल्यावरही अनुदान मिळाले नाही.

खरिपाच्या तयारीत अडथळे
शेतकऱ्यांनी अनुदान मिळेल म्हणून खरिपाच्या बी-बियाणे व खतासाठी हाताशी ठेवलेले पैसे कांदा चाळीसाठी वापरले. शासनाकडून अनुदान मिळाले नाही तर खरिपाचा हंगाम धोक्यात येण्याची शक्यता आहे. शासनाने तातडीने अनुदान वितरित करून शेतकऱ्यांची विवंचनेतून मुक्तता करण्याची मागणी होत आहे.

दोन महिन्यांपासून प्रतीक्षा
कांदा चाळ पूर्ण होऊन दोन महिने झाले. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी कांदा चाळीची पाहणी केली. परंतु अजूनही अनुदान जमा झाले नाही. अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता तुमची कांदा चाळ २०२०-२१ मधील आहे, त्यामुळे उशीर झाला, असे सांगण्यात आले.
- लता ज्योतीराम डोके, शेतकरी, ईट.

लवकरच अनुदान मिळणार
क्षेत्रीय स्तरावरून अनुदान मागणी प्रस्ताव एप्रिलपूर्वी सादर केले आहेत. काही लाभार्थींचे अनुदान जमा नाही, त्यासाठी जिल्हास्तरावर पाठपुरावा सुरू आहे व सर्व प्रकरणे अनुदान देण्याच्या शेवटच्या टप्प्यात आहेत. शेतकऱ्यांच्या खात्यावर लवकरच अनुदान जमा होईल.
- निखिल रायकर, कृषी मंडळ अधिकारी, ईट.

बातम्या आणखी आहेत...