आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामागाील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने कांदा उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. दरवाढीच्या प्रतीक्षेत साठवलेला कांदा पावसामुळे भिजून सडला आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांना हा कांदा उकिरड्यावर फेकण्याची वेळ आली आहे.
गेल्या तीन महिन्यांपासून कांद्याला दर मिळत नसल्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. यंदा अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले. आडतीवर कांदा नेला तर शेतकऱ्यांना भाड्यासाठी स्वत:च्या खिशातून खर्च करावा लागल्याची अनेक उदाहरणे आहेत. यामुळे अनेक शेतकऱ्यांनी शक्यतो दरवाढीसाठी प्रतीक्षा करण्याचे ठरवले होते.
यामुळे शेतातच कांदा साठवण्यात आला होता. काहींनी कांदाचाळीत तर काहींनी तात्पुरते शेड तयार करून कांदा साठवला होता. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस, गारपिटीने थैमान घातले आहे. मार्च, एप्रिल व मे मध्येही अवकाळी पाऊस झाला. याचा फटका फळपिकांना बसला. यात कांदा उत्पादकही भरडल्या गेले आहेत. पावसामुळे त्यांनी साठवलेला कांदा जागेवरच सडला आहे. यामुळे शेतकऱ्यांना कांदा उकिरड्यावर फेकण्याची वेळ आली आहे.
कांदा लागवडीपासून काढणीपर्यंत एकरी ४० ते ५० हजार रुपयांचा खर्च शेतकऱ्यांना आला आहे. यात शेती तयार करणे, लागवड करणे, बियाणे, खते, औषधी फवारणी, खुरपणी काढणी आदींचा समावेश आहे. असा खर्च झालेला असताना शेतकऱ्यांना मात्र लावलेला खर्चही निघणे अवघड झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
दीड एकरात उन्हाळी कांद्याची लागवड केली. खरिपात झालेल्या नुकसानीची कसर उन्हाळी कांद्यातून निघेल, अशी आशा होती. मागील तीन दिवस झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे अर्ध्या एकरातील कांदा शेतातच सडला आहे. नफा तर दूर झालेला खर्चही खिशातून देण्याची वेळ आली आहे.
-सयाजी डोके, कांदा उत्पादक.
नफा दूर, खर्चही खिशातूनच
मागील वर्षी कांदा पिकाला प्रतिक्विंटल दीड हजार ते दोन हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला होता. मात्र, यंदा कांदा दरात मोठी घसरण झाली असून, ३०० ते ४०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळत आहे. यामुळे शेतकरी अस्मानी व सुलतानी अशा दुहेरी संकटात सापडला आहे. अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करूनही भाव वधारण्याचे नाव नाही.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.