आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावर्ग दोनच्या जमिनींसंदर्भात अखेर ४ महिन्यांनी शासनाकडून दिशानिर्देश आले आहेत. त्यानुसार इनाम जमीन वर्ग एक करण्यासाठी मदतमाश (इनाम) जमिनींबाबत यापूर्वीच (ऑगस्ट २०१५ राजपत्र ) केलेल्या सुधारणेनुसार अंमलबजावणी करावी, असे सूचित करण्यात आले आहे. राजपत्रानुसार इनाम जमिनी नियमानुकूल करण्यासाठी शासनाकडे ५० टक्के नजराणा रक्कम आणि शर्तभंग (अकृषक) झाल्यास दंड म्हणून २५ टक्के अशी एकूण ७५ टक्के रक्कम भरावी लागणार आहे. उस्मानाबादेत मदतमाश आणि खिदमतमाश प्रकारातील ७० टक्क्याहून अधिक जमीन असून, बहुतांश जमीन अकृषक (एनए) झालेली आहे. राज्य शासनाकडून वर्ग दोन संदर्भात दिलासा न मिळाल्यामुळे वर्ग दोनच्या जमिनींवर प्लॉट घेतलेल्या, घर बांधकाम केलेल्या मालमत्ताधारकांना मोठा आर्थिक भूर्दंड बसणार आहे.
गेल्यावर्षी (२०२२) मे महिन्यात उस्मानाबाद जिल्ह्यात ई चावडी वाचन कार्यक्रम राबवण्यात आल्यानंतर गावागावातील ईनाम ,वतन ,देवस्थान, कूळ, सिलिंग, वक्फ आदी प्रकारातील जमिनी वर्ग एक प्रकारात असल्याचे समोर आले. वास्तविक पाहता उपरोक्त प्रकारातील सर्व जमिनींच्या सातबारांवर भोगवटादार वर्ग २, असा उल्लेख अभिप्रेत आहे. मात्र, महसूल खात्यातील काही अधिकाऱ्यांनी संगनमताने सातबारांवर वर्ग एकच्या नोंदी घेऊन शहरी भागातील अशा जमिनी हस्तांतर तसेच अकृषक(एनए) करण्यासाठी परवानग्याही दिल्या. अशा जमिनींवर प्लॉट पाडून त्याची विक्री करण्यात आली. प्रशासनाने अलीकडच्या काळात या प्रकारातील जमिनींचा शोध सुरू केला. १० महिन्यात २३ हजार एकर जमीन वर्ग दोन करण्यात आली.
अजूनही ही प्रक्रिया सुरूच आहे. मात्र, दुसरीकडे शहरी भागातील वर्ग दाेनच्या जमिनींवर प्लॉट घेतलेले, घर बांधलेले मालमत्ताधारक धास्तावले आहेत.कारण पूर्वी वर्ग एक असलेल्या सातबारावर आता वर्ग दोन, असा उल्लेख केल गेला असून, त्यामुळे आता प्लॉट, घरांची खरेदी-विक्री करता येत नाही. व्यवहार करण्यासाठी शासनाची परवानगी घ्यावी लागते. परवानगीसाठी बाजारमूल्याच्या ५० टक्के नजराणा व दंड म्हणून २५ टक्के रक्कम शासनाकडे जमा करावी लागते.अनेकांच्या मालमत्तेचे मूल्य कोट्यवधी रूपये आहे. प्लॉटेचही मूल्य लाखोंमध्ये आहे, अशा मालमत्ताधारकांची आता आर्थिक कोंडी झाली आहे.
वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एकमध्ये घ्याव्यात, मालमत्ताधारकांना, जमीनधारकांना दिलासा द्यावा, या मागणीसाठी २७ जानेवारीला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. यानंतर शासनाकडून मोर्चेकऱ्यांची दखल घेतली जाईल, अशी शक्यता होती. मात्र, मोर्चाचा परिणाम दिसत नाही. शासनाने जिल्हाधिकाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात यापूर्वीच २०१५ च्या राजपत्रानुसार इनाम जमिनी नियमानुकूल करण्यासाठी पध्दत अनुसरावी, असे सूचित केले आहे.यातून शासनाला कोट्यवधींचा महसूल मिळणार आहे.
जिल्ह्यात २३ हजार एकर जमीन वर्ग-२ मध्ये, शासन होणार श्रीमंत
शासन म्हणते, खिदमतमाश जमिनी नियमित होऊच शकणार नाहीत, उस्मानाबादेत सुमारे ७० टक्के वर्ग दोनच्या जमिनींवर घरे आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी २९ सप्टेंबर २०२२ रोजी मागवलेल्या मार्गदर्शनावर शासनाचे ४ महिन्यांनी दिशानिर्देश आले. ऑगस्ट २०१५ राजपत्रानुसार इनाम जमिनी नियमानुकूल होणार असून नागरिकांना कोट्यवधी नजराणा रक्कम भरावी लागेल. २३ हजार एकर जमिनींच्या ७/१२ वर वर्ग-२ ची नोंद आहे.
पत्राला शासनाचे उत्तर..जुन्याचेच पालन करा
तत्कालीन जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी वर्ग दोनच्या जमिनींसंदर्भात २९ सप्टेंबर २०२२ रोजी शासनाकडे पत्र पाठवून मार्गदर्शन मागवले होते. त्यात महाराष्ट्र शासन राजपत्र ८ मार्च २०१९ मधील तरतुदीनुसार कब्जे हक्काच्या धारणाधिकार भोगवटादार वर्ग १ मध्ये रूपांतरीत करण्यासाठी १० टक्के रक्कम अधिमूल्य म्हणून आकारण्यात यावी, असे निर्देश आहेत. त्याच पध्दतीने शासनाचा महसूल वाढवण्यासाठी इनाम जमिनींचा अनधिकृत वापर होणार नाही या दृष्टीने कब्जेदारांच्या तरतुदी इनाम जमिनी बाबत लागू करता येतील किंवा कसे, मार्गदर्शन करावे, असे नमूद करण्यात आले होते. त्यावर राज्य शासनाकडून २ फेब्रुवारी (२०२३) रोजी जिल्हाधिकाऱ्यांना दिशानिर्देश आले मदतमाश जमिनींबाबत यापूर्वीच सुधारणा केली असून,(ऑगस्ट २०१५) हैदराबाद इनामे व रोख अनुदाने रद्द करण्यासाठी अधिनियम १९५४ कलम ६(३ अ) व (३ ब) मधील तरतूदी स्वयंस्पष्ट आहेत, यास्तव हैदराबाद इनामे व रोख अनुदाने रद्द करण्याबाबत अधिनियम १९५४ मध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.