आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतीवर बोझा प्रकरण:जमिनीवरील बोझा कमी करण्याचा आदेश, अखेर ‘त्या’ शेतकऱ्याला मिळाला न्याय

कळंब6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेगा इंजिनिअरिंग कंपनीने शेतात उत्खनन केले नसतानाही एका शेतकऱ्याच्या शेतावर बोझा चढवल्याप्रकरणी महसूल विभागाच्या पथकाने प्रत्यक्ष पाहणी केली असता त्या शेतकऱ्याच्या सर्व्हे नंबरमध्ये उत्खनन झाले नसल्याचे निदर्शनास आले होते, या प्रकरणी सुनावणी होऊन प्रभारी तहसीलदारांनी जमिनीवरील बोझा कमी करण्याचा अंतरिम आदेश दिला असून ‘त्या’ शेतकऱ्याला अखेर न्याय मिळाला आहे. खामगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून यातील केज ते कळंब-येरमळा-कुसळंब या ६१ किलोमीटरचे काम मेगा इंजिनिअरिंग कंपनी करत आहे. याकरीता महसूल प्रशासनाकडून परवानगी घेऊन गौणखनीज उत्खनन करण्यात आले होते. परवानगीपेक्षा जास्त उत्खनन झाल्यामुळे महसूल प्रशासनाने उत्खनन केलेल्या सर्व्ह नंबरची पुन्हा तपासणी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. मंजुरीपेक्षा जास्त गौण खनिज उत्खनन केल्याप्रकरणी महसूल प्रशासनाने मेगा इंजनिअरिंग कंपनीला रॉयल्टी भरण्यास सांगितले होते.

मेगा इंजिनिअरिंग कंपनीने तालुक्यातील मस्सा (खं), हासेगाव (के) व येरमाळा येथील सर्व्हे नंबरमधून गौण खनिज उत्खनन केल्याप्रकरणी तहसीलदार विद्या शिंदे यांनी तत्कालीन तहसीलदारांच्या जुन्या आदेशानुसार मस्सा (खं), हासेगाव (के) व येरमाळा येथील सर्व्हे नंबरवर बोझा चढवला आहे.

मस्सा (खं) येथील ज्योतीराम वरपे यांच्या सर्व्ह नंबर ७१९ मधील १.१३ हेक्टरमध्ये उत्खनन न करता यावर ४० कोटी ७६ लाख रुपयांचा बोझा टाकला होता. यासंदर्भात त्या शेतकऱ्याने प्रशासनाकडे तक्रार केली. फेरतपासणीचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. त्यानुसार प्रमुख पथक प्रमुख प्रभारी तहसीलदार मुस्तफा खोंदे व सदस्यांनी २४ जानेवारी २०२२ रोजी मस्सा (खं) गावात जाऊन सर्व्हे नंबर ७१९ ची प्रत्येक पाहणी केली, यात या सर्व्हे नंबरमध्ये उत्खनन झाले नसल्याचे निदर्शनास आले होते.

चौकशी करून आदेश
मस्सा (खं) येथील सर्व्हे नंबर ७१९ मधील बोझा प्रकरणी चौकशी करुन दोन्ही बाजुच्या कागदपत्रांची तपासणी केली. त्यानंतर दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून सर्व्हे नंबर ७१९ मधील बोझा कमी करण्याचा अंतरिम आदेश ७ मार्च रोजी देण्यात आला आहे. -मुस्तफा खोंदे, प्रभारी तहसीलदार,

सततच्या पाठपुराव्याला यश
मस्सा (खं) येथील सर्व्हे नंबर ७१९ मधील बोझा प्रकरणी आंदोलनासह निवेदनही देण्यात आले होते. वरपे यांनी सतत पाठपुरावा केला होता. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय दुधगावकर यांनीही लक्ष घातले होते.

तहसीलदारांकडे बोझा कमी करण्याची केली होती मागणी
याप्रकरणी तहसीलदार विद्या शिंदे यांनी १४ फेब्रुवारीला सुनावणी ठेवली होती. त्यावेळी तहसीलदार रजेवर असल्यामुळे २ मार्चला सुनावणी ठेवण्यात आली होती. यात वरपे यांनी एक पत्र दिले असून या कंपनीचा व आमचा काहीही संबंध नसून बोझा कमी करण्याची मागणी पत्रातून करण्यात आली होती.

बातम्या आणखी आहेत...