आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:​​​​​​​एचआरसीटी स्कोर 21, बेडही मिळाला नाही; सैनिक पुत्राने 65 वर्षीय आईला शेतात ठेवून केले कोरोना संसर्गातून मुक्त

कळंब2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • डॉक्टरांच्या सल्ल्याने आजारावर औषधोपचार; सकारात्मक विचाराने धीर देऊन कोरोनावर विजय

एचआरसीटी स्कोर २१, रुग्णालयात बेड मिळाला नाही, मग सैनिक पुत्राने आईवर आघात केलेल्या कोरोनारुपी शत्रूला हद्दपार करण्याचा चंग बांधला आणि शेतात ठेवून ६५ वर्षीय आईला कोरोनामुक्त करून एक आदर्श निर्माण केला आहे. हासेगाव केज येथील बालिका यादव (६५) यांना ताप, अंगदुखी, सर्दी अशी लक्षणे सुरू झाली होती. भारतीय सैन्य दलात असलेला त्यांचा मुलगा रामहरी यादव सुटीवर आला. आई आजारी पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. मग त्यांनी उपजिल्हा रुग्णालयात जाऊन कोरोना टेस्ट केली. ८ मे रोजी पॉझिटिव्ह रिपोर्ट आला.

राम यांनी आईचा सिटीस्कॅन केला व त्यामध्ये २१ स्कोर आला. यामुळे चिंतेत भर पडली. रुग्णालयात भरती करण्यासाठी धावपळ करू लागले. पण त्यांना शहरातील खासगी कोविड सेंटरमध्ये कुठेही बेड मिळाला नाही. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये कळंब येथील एका डॉक्टराने ‘आम्ही तुम्हाला फक्त औषध देऊ शकतो’, असे सांगितले. त्यावरील औषधी घेऊन रामहरी यांनी आईला धीर दिला. शेतात जाऊन राहू लागले. आईही खूप जिद्दीच्या आहेत. त्यांनी सकारात्मक विचार केला आणि क्षणाचाही विलंब न लावता हो म्हणाल्या. आणि त्यातूनच त्यांचा सकारात्मक प्रवास सुरू झाला. तेव्हा काही कालावधीतच आई बालिका यादव कोरोनामुक्त झाल्या.

अशी घेतली काळजी
दररोज सकाळी योगासन केले, अनुलोम-विलोम, कपालभाती, कोमट पाणी पिणे आणि डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या वेळेत घेतल्या. दररोज सकारात्मक विचार करत मन आनंदी ठेवले व दररोज लिंबाच्या झाडाखाली विश्रांती घेतली. असे दररोज करून कोरोनाला हद्दपार केले.

आईला दिला धीर
आईला कोरोनाची लागण झाली. त्यावेळी मनात भीती निर्माण झाली होती. मात्र, आईला यातून बाहेर काढायचे हा विचार मनात होता. हा आजार खूप लहान आहे. आपण लवकर दुरुस्त होऊ, आपल्याला डॉक्टरांनी शेतात राहावयास सांगितले आहे, असे सांगून आईला धीर दिला व आईने कोरोनावर मात केली. रामहरी यादव, मुलगा.

मातृभूमीसोबत आईचीही सेवा
सैनिक देशासाठी जगतो आणि देशासाठी प्राण देतो. त्यामुळे आपण सैनिकांचे कायम ऋणी असतो. त्याचप्रमाणे आईचे आरोग्य अबाधित ठेवण्यासाठी या सैनिकाने कोरोना विरोधात लढा देऊन आईला कोरोनामुक्त करुन आदर्श निर्माण केला आहे.

बातम्या आणखी आहेत...