आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा अनलॉक:दुसऱ्या लाटेतील 61 दिवसांचे निर्बंध उठले, उद्यापासून सर्व दुकाने सुरू होणार; शनिवार, रविवारी मात्र बंद

उस्मानाबाद14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सायंकाळी 4 पर्यंतच दुकाने सुरू, अत्यावश्यक सेवेतील दुकाने आठवडाभर उघडण्यास मुभा

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे ५ एप्रिलपासून कडक निर्बंधात असलेल्या जिल्ह्यावरील बंधने बहुतांश प्रमाणात शिथिल होत आहेत. सोमवार, ७ जूनपासून जिल्ह्यातील बाजारपेठ सुरू करण्यास जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली असून, त्यानुसार सोमवार ते शुक्रवार या दिवशी सायंकाळी ४ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने हॉटेल्स, रेस्टॉरंट, व्यायामशाळा, सलून सुरू करण्यात येणार आहेत. तर शनिवार व रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता अन्य आस्थापना बंद ठेवण्यात येतील.

राज्य शासनाच्या शनिवारच्या आदेशानंतर जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी शनिवारी सायंकाळी यासंदर्भातील आदेश जारी केले. त्यामुळे तब्बल ६१ दिवसानंतर जिल्ह्याला मोठा दिलासा मिळत आहे. राज्य शासनाच्या नियमानुसार जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी दर व ऑक्सिजन बेडच्या उपलब्ध संख्येच्या निकषामुळे तिसऱ्या स्तरामध्ये उस्मानाबादची वर्गवारी करण्यात आली आहे. त्यानुसार तूर्त सायंकाळी ४ वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या बाजारपेठा सुरू राहतील. त्यानंतर मात्र संचारबंदी सुरू होईल. आठवड्यातील शनिवार व रविवार, असे दोन दिवस सध्याच्या पद्धतीनुसार बाजारपेठ बंद ठेवण्यात येईल. राज्य शासनाने शनिवारी राज्यातील काही जिल्ह्यात पूर्णपणे अनलॉक जाहीर करताना उस्मानाबासह अन्य जिल्ह्यात यासंबंधी काही बंधने कायम ठेवली आहेत. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने रात्री यासंबंधीचे आदेश निर्गमित केले.

ज्या जिल्ह्यांचा कोरोना पॉझिटिव्हीटी दर पाच ते दहा टक्केदरम्यान व ४० टक्क्यांपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड व्यापलेले असतील, अशा जिल्ह्यांचा तिसऱ्या स्तरात समावेश करण्यात आला आहे. उस्मानाबाद जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी ५ टक्क्यांपेक्षा अधिक असून, ऑक्सिजन बेडची संख्या मात्र नियमानुसार शिल्लक आहे. मात्र, शासनाने पॉझिटिव्हीटीचा निकष लागू करत उस्मानाबाद जिल्ह्याचा समावेश तिसऱ्या स्तरामध्ये केला आहे. त्यानुसार आता काही बंधने राहतील. मात्र, ५ एप्रिलपासून लागू असलेले अनेक निर्बंध आता उठवले जात आहेत. त्यानुसार सायंकाळी चार वाजेपर्यंत बाजारपेठ सुरू राहील, त्यानंतर पाच वाजता मात्र जमावबंदी लागू करण्यात येणार आहे.मिळालेल्या मोकळीकमुळे व्यापारी वर्गात समाधानाचे वातावरण आहे.

हॉटेल्सला पार्सलची परवानगी
सोमवार ते शुक्रवार या कालावधीत ५० टक्के क्षमतेने हॉटेल्स, रेस्टॉरंट सुरू राहतील, मात्र शनिवारी व रविवारी हॉटेल्स बंद राहतील. त्यांना पार्सल देण्यासाठी मुभा देण्यात आली आहे. सार्वजनिक ठिकाणे, खुली मैदाने, चालणे, सायकलींग, उद्याने सकाळी ५ ते ९ पर्यंतच सुरू राहतील, असे प्रशासनाने कळविले आहे.

सात ते चार वाजेपर्यंत बाजारपेठ खुली
अत्यावश्यक तसेच अत्यावश्यक नसलेल्या सर्व प्रकारची दुकाने सकाळी सात ते सायंकाळी चार वाजेपर्यंत सुरू राहील. सोमवार ते शुक्रवार, या पाच दिवसांसाठी अत्यावश्यक श्रेणीत नसलेल्या आस्थापना सुरू राहतील. त्यानंतर शनिवार व रविवारी केवळ अत्यावश्यक सेवा निर्धारित वेळेत सुरू राहतील.

विवाहासाठी निर्बंध कायम, ५० जणच
शासनाच्या नव्या नियमावलीनुसार सार्वजनिक कार्यक्रमांवरील बंधने कायम आहेत. विवाहासाठी ५० व्यक्तींना उपस्थित राहता येईल. तर अंत्यसंस्कारासाठी २० लोकांची मर्यादा असेल. सभा, निवडणुका, बँकांच्या सर्वसाधारण सभांना ५० टक्के नागरिकांच्या उपस्थितीची परवानगी असेल.
राज्य शासनाच्या आदेशानंतर जिल्हा प्रशासनाकडून सूचना जारी

एसटी पूर्ण क्षमतेने धावणार
कोरोना काळात सुरक्षिततेच्या कारणासाठी घालण्यात आलेले निर्बंध उठत असतानाच सार्वजनिक प्रवासी वाहतुकीतील महत्त्वाचा भाग असलेल्या एसटीनेही सोमवारपासून पूर्ण क्षमतेने तसेच जिल्हा, आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या उस्मानाबाद विभाग नियंत्रक अमृता ताम्हणकर यांनी या संदर्भातील आदेश काढले आहेत. त्यांनी म्हटले की, कोरोना प्रतिबंधासाठी सर्व नियम पाळून एसटीची पूर्ण क्षमतेने व टप्प्याटप्प्याने आंतरजिल्हा प्रवासी वाहतूक सुरू करण्यात येत आहे.

बातम्या आणखी आहेत...