आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निष्ठूर काळ:नात्यांसाठी तुटतो जीव : मुलाच्या विरहामुळे आईने, पत्नीच्या मृत्यूनंतर पतीने सोडला प्राण

उस्मानाबाद8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसरी लाट भयंकर झाली आहे. रुग्णालयात उपचार घेणारा आपला रुग्ण ठणठणीत होऊन परत येईल की नाही, अशी भीती प्रत्येकाला वाटत आहे. यात आजारामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या जास्त असताना आपला माणूस गेल्याच्या धसक्याने अनेकजण जीव सोडत आहेत. हृदय पिळवटून टाकणाऱ्या अशाच दोन घटना उस्मानाबाद शहरासह तालुक्यात घडल्या. उस्मानाबादेत कोरोनामुळे पत्नीचा मृत्यू झाल्याने अर्धातासातच पतीने प्राण सोडले तर तालुक्यातील हिंगळजवाडी येथे मुलाच्या मृत्यूचा धक्का बसल्याने आईनेही जगाचा निरोप घेतला.

काळजी घ्या,घाबरू नका
कोरेानाची दुसरी लाट अतिभयंकर आहे. संसर्ग झाल्यानंतर चालताबोलता माणसे निघून जात आहेत. अशा परिस्थितीत मनोधैर्य खचून धसक्यानेही जीव जात आहेत. कोरेाना झाल्याचे समजताच अनेकांना हृदयविकाराचे झटके आले आहेत. वास्तविक पाहता कोरेानातून नीट होण्याचेच प्रमाण अधिक आहे, हे लक्षात घेऊन एकमेकांना धीर देण्याची गरज आहे. कोराेनातून वाचण्यासाठी काळजी जरूर घ्या, मात्र घाबरून जाऊ नका, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

५ मिनिटांच्या फरकाने दांपत्याने घेतला अखेरचा श्वास
उस्मानाबाद । अल्पशा आजाराने जखडलेल्या पती-पत्नीने एकाच दिवशी पाच मिनिटांच्या फरकाने प्राण सोडले. हा प्रकार शहरातील एका खासगी रुग्णालयात बुधवारी (दि.२८) सायंकाळी घडला.त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

कोरेानाने अनेकांची नाती विखुरली आहेत. क्षणात होत्याचे नव्हते होत आहे.चालता-बोलता माणसांना काळ हिरावून नेत आहे. त्यामुळे अनपेक्षित, अकल्पित घडणाऱ्या या प्रकारांनी नागरिकांची मन:स्थिती अस्थिर होत आहे. आठ दिवसांपूर्वी शहरातील एका कुटंुबात एकाच दिवशी पती-पत्नीचे निधन झाले तर मुलगाही रुग्णालयात उपचार घेत असल्याने अंत्यविधीसाठीही कुटंुबातील व्यक्ती उपस्थित राहू शकत नव्हती. शहरातील शिक्षक कॉलनीतील व्यवसायिक व मनमिळावू व्यक्तीमत्व असलेल्या उमेश वडगावकर व त्यांच्या पत्नी ज्योती यांना १५ दिवसांपूर्वी आजार झाल्याने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान बुधवारी सायंकाळी दोघांचाही अवघ्या पाच मिनिटांच्या फरकाने मृत्यू झाला.

मुलगा गेल्याचे समजताच आईला हृदयविकाराचा झटका
तेर । मुलाच्या निधनाचे वृत समजताच आईने आपला प्राण सोडला. हृदय पिळवटून टाकणारी ही घटना हिंगळजवाडी (ता. उस्मानाबाद) येथे गुरुवारी घडली. हिंगळजवाडी येथील रमाकांत ऊर्फ पापा मधुकर नाईकनवरे (५०) यांचे गुरुवारी सकाळी कोरोनाने जिल्हा रुग्णालयात निधन झाले. मुलाच्या मृत्यूची माहिती समजताच आई सुशिला मधुकर नाईकनवरे (७०) यांचेही हृदयविकाराच्या झटक्याने काही वेळातच निधन झाले. या दोघा माय लेकरांवर हिंगळजवाडी येथील शेतात एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. उस्मानाबाद तालुक्यातील ग्रामीण भागातही आता कोरेानाचा उद्रेक वाढला असून, दररोज रुग्णसंख्या वाढतच आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत गंभीर आजार असलेले रुग्ण दगावत होते.

आता दुसऱ्या लाटेत वृद्धासह तरुणही दगावत आहेत. हिंगळजवाडी येथील पापा नाईकनवरे कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना गुरुवारी मृत्यू झाला. मुलाच्या निधनाची माहिती त्यांच्या मातोश्रीला समजताच त्यांनीही घरी जीव सोडला. या हृदय हेलावून टाकणाऱ्या घटनेने तेर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

बातम्या आणखी आहेत...