आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बडगा:इंदापूर शिवारात अफू शेतीवर छापा; 4 क्विंटल पीक जप्त, दोघे अटकेत; वाशी तालुक्यात उस्मानाबाद गुन्हे शाखेची कारवाई

तेरखेडा6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आणखी कुणाकडे अफूचे पीक आढळल्यास होणार कारवाई
  • उस्मानाबाद जिल्ह्यातील इंदापूरमध्ये छापा टाकून 4 क्विंटल अफूचे पीक जप्त करण्यात आले. ​​​​​​​

वाशी तालुक्यात दोन ठिकाणी अफूची शेती असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. यात चार क्विंटल अफूचे पीक आढळून आले. याप्रकरणी दोन व्यक्तींवर वाशी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे.

प्राप्त माहितीनुसार, वाशी परिसरात स्थानिक गुन्हे शाखेच्या उस्मानाबाद पथकाने शुक्रवारी दुपारी छापा मारून परिसरातील नरसिंह वेताळ यांच्या शेतात अडीच क्विंटल अफूचे पीक जप्त केले. तसेच इंदापूर ग्रामपंचायत कार्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या अंदाजे १०० मीटर परिसरातच विश्वंभर पारडे यांच्या शेतात दीड क्विंटल अफूचे पीक आढळून आले. वेताळ व पारडे यांच्यावर एनडीपीएस कायदा १५ अन्वये कारवाई करण्यात आली.

तसेच परिसरातील कोणाकडेही अफूचे पीक सापडल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असे वाशी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक खनाळ यांनी सांगितले. इंदापूर परिसर हा कांदा उत्पादनाचा भाग म्हणून ओळखला जातो. कांद्याचे फूल आणि अफूच्या पिकाच्या फुलामध्ये साम्य असते. कांद्याचे पीक फुलोऱ्यात असताना अफूचे फूलही या पिकात लपून जाते. त्यामुळे काही शेतकरी अफूची शेती करत असल्याचे सांगण्यात येते. दरम्यान अफूची लागवड केल्याप्रकरणी दोघांना वाशी पोलिसांनी अटक केली आहे.

खसखस म्हणून लागवड केल्याचा दावा
यापूर्वीही काही शेतकऱ्यांकडे या पिकामुळे कारवाया करण्यात आलेल्या आहेत. मात्र, ही अफूची वनस्पती नसून खसखस म्हणून त्याची लागवड केली जात असल्याचा दावा केला जातो. पीक उभे असताना त्यावर अणकुचीदार शस्त्राने छटा मारल्यास त्यातून पांढरा द्रव स्रवतो. त्यावर प्रक्रिया करून अफू तयार केली जाते, असे सांगतात. मात्र, या भागातील लोक याबद्दल अनभिज्ञ आहेत. केवळ खसखसचे उत्पादन घेता यावे, या उद्देशानेच ही लागवड केली जात असल्याचे काही जणांचे म्हणणे आहे.

बातम्या आणखी आहेत...