आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिंता नव्या लाटेची:उस्मानाबाद जिल्ह्यात तरुणाई लक्ष्य; बाधित 48 पैकी 11 टक्के युवकांनी गमावले प्राण, 18 वर्षांतील 10.21 टक्के रुग्ण, मृत्यूचे प्रमाण मात्र शून्यावर

उस्मानाबाद (चंद्रसेन देशमुख)4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दुसऱ्या लाटेमध्ये 10 वर्षांखालील 3.90 टक्के मुले कोरोनाबाधित

कोरोनाची दुसरी लाट उतरणीला लागली असतानाच तिसऱ्या लाटेची भीती कायम आहे. लहान मुलांबाबत संभाव्य लाटेबद्दल अधिक चिंता आहे. वास्तविक, पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत मिळून १८ वर्षांखालील १०.२१ टक्के मुलांना संसर्ग झाला होता. त्यापैकी मोजक्याच जणांना रुग्णालयात भरती करावे लागले. मृत्यूचे प्रमाण शून्यावर आहे. त्यामुळे पालकांनी घाबरण्याची गरज नाही. मात्र सजग राहावे, असे आवाहन बालरोगतज्ज्ञांकडून केले जात आहे. दुसरी लाट १८ ते ४४ वयोगटातील तरुणांसाठी अधिक घातक ठरली. एकूण रुग्णांमध्ये ४८.७० टक्के तरुण आढळले तर यापैकी ११ टक्के रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

लहान मुलांमध्ये कोरोनाविरुद्ध लढण्यासाठीची प्रतिकारशक्ती उत्तम असते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत तरुण वर्ग अधिक टार्गेट झाला आहे. पहिल्या लाटेत ४५ वर्षांवरील तर दुसऱ्या लाटेत १८ ते ४५ वयोगटातील नागरिकांना कोरोना घातक ठरला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ५० हजारांवर काेरोना रुग्ण आढळले आहेत. यामध्ये १८ ते ४५ वयोगटातील २६ हजार १०९ रुग्ण असून, हे प्रमाण एकूण रुग्णांच्या तुलनेत ४८.७० टक्के आहे. ४५ ते ६० वयोगटातील १३ हजार ८२० म्हणजे २५.७८ टक्के रुग्ण आढळले तर ६० वर्षांवरील ८२०७ अर्थात १५.३१ टक्के रुग्ण आढळून आले. १० ते १८ वयोगटातील ३३८५ मुलांना कोरोना संसर्ग झाला. एकूण रुग्णांच्या टक्केवारीत हे प्रमाण ६.३१ टक्के आहे. तर सर्वात संवेदनशील १० वर्षांखालील २०९० मुलांना कोरेानाची बाधा झाली.

लहान मुलांना धोका कमी
९५ टक्के मुलांना लक्षणे जाणवत नाहीत. लक्षणे नसलेल्या किंवा सौम्य लक्षणे असलेल्या मुलांना डॉक्टरांच्या सल्ल्याने घरीच औषधोपचार करता येतील. ५ टक्के मुलांना रुग्णालयात उपचाराची गरज भासू शकते. त्यातील ३ टक्के मुलांना न्यूमोनियाची तीव्र स्वरूपाची लक्षणे जाणवू शकतात. मात्र त्यांच्यातील मृत्यूचे प्रमाण १ टक्क्यांच्या आत असेल. लहान मुलांना कोरोनाचा धेाका कमी असण्याची काही कारणे आहेत. यात लहान मुलांच्या फुप्फुसांच्या पेशीमध्ये एसटू रिसेप्टरची संख्या कमी असते. त्यामुळे विषाणू पेशींमध्ये शिरू शकत नाही. लहान मुलांना आईच्या दुधातून प्रतिकारशक्ती आलेली असते आणि महत्त्वाचे म्हणजे त्यांना लहान वयातच वेगवेगळ्या प्रकारच्या लसी दिलेल्या असतात, त्यातूनही इम्युनिटी तयार झालेली असते. पालकांनी घाबरू नये. डॉ. अभय शहापूरकर, ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ.

निष्काळजीपणा नको
अजूनही काही ठिकाणी मास्कचा वापर केला जात नाही. अनावश्यक गर्दी केली जाते. भीती न बाळगता गुटखा, मावा सेवन करून पिचकाऱ्या मारून इतरांना बाधित करणे, असे प्रकार होत आहेत. अनेक रुग्ण आजार अंगावर काढत आहेत. डॉ. हनुमंत वडगावे, जिल्हा आरोग्य अधिकारी.

दुसऱ्या लाटेमध्ये १० वर्षांखालील ३.९० टक्के मुले कोरोनाबाधित
कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालयांना सुटी देण्यात अाली होती. त्यामुळे मुलांमध्ये संसर्गाचे प्रमाण केवळ दोन टक्के इतकेच होते. २३ नोव्हेंबरपासून आठवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले तर जानेवारी महिन्यात पाचवीच्या पुढील वर्ग भरवण्यात आले. मार्चच्या पहिल्या आठवड्यात दुसरी लाट पसरली आणि शाळांना सुटी देण्यात आली. मात्र तोपर्यंत शाळा स्तरावरच मुलांमध्ये कोरोना संसर्ग दिसून आला होता. एकूण रुग्णांमध्ये १८ वर्षांखालील ५४७५ मुले काेरोनाबाधित आढळली आहेत. तर १० वर्षांखालील २०९० म्हणजे ३.९० टक्के मुलांना कोरोना झाला आहे.

६० वर्षांवरील ७३८ जणांचा मृत्यू; हे प्रमाण ६४ टक्के इतके
पहिल्या लाटेत ६० वर्षांवरील आणि सहव्याधी असलेल्यांना कोरोना घातक ठरला. जिल्ह्यात ६० वर्षांवरील ७३८ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यूमध्ये हे प्रमाण ६४ टक्के इतके आहे. तर दुसऱ्या लाटेत तरुणांमध्ये कोराेनाचे प्रमाण वाढले. एकूण रुग्णांच्या प्रमाणात १८ ते ४५ वर्षांतील २६ हजार १०९ तरुणांना कोरोनाची बाधा झाली. त्यात १२३ जणांचा मृत्यू झाला. एकूण मृत्यूमध्ये हे प्रमाण ११ टक्के आहे. तर ४५ ते ५९ वयोगटातील २९३ जण दगावले आहेत. रोगप्रतिकारशक्ती असताना व सहव्याधी कमी असतानाही तरुणांचे ११ टक्के मृत्यू ही चिंताजनक बाब आहे.

बातम्या आणखी आहेत...